X

गौतम ठक्कर

गौतमभाई बँकेत होते. सेंट्रल बँक ऑफ इंडियात, साधारण राष्ट्रीयीकरणाच्या वेळी त्यांना नोकरी लागली.

गुजरातमध्ये २००२ पासून सुरू असलेल्या मानवतावादी चळवळीबद्दल सहानुभूती असणाऱ्यांना गौतम ठक्कर यांचे नाव माहीत असते, ते त्यांच्या उत्साहामुळे. वयाची पर्वा न करता सहज कार्यकर्त्यांसारखे वावरणारे आणि प्रत्यक्षात काही संस्थांचे पदाधिकारी असणारे हे गौतम ठक्कर परवाच्याच शनिवारी निवर्तले. हयात असते तर त्यांनी मंगळवारी -११ सप्टेंबर रोजी- आपला ७४वा वाढदिवस साजरा केला असता.. एरवी त्यांचा वाढदिवस खुद्द त्यांच्याही लक्षात नसे; पण त्यांच्या निधनाने ही तारीख अधोरेखित केली.

अहमदाबाद, बडोदे आणि कच्छ या भागांत ‘पीयूसीएल’च्या (पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज) कामात तसेच अनेक  चळवळींत त्यांनी गेल्या चार दशकांहून अधिक काळ पाहिला होता. त्यांची कामाची पद्धत अगदी शिस्तबद्ध. कागदोपत्री चोख. त्यामुळेच मध्यंतरी परदेशी मदत घेणाऱ्या काही हजार स्वयंसेवी संस्थांची आर्थिक नाकेबंदी झाली, तेव्हा ‘आमच्या गुजरात विभागाला कोणताही परदेशी निधी मिळत नाही’ असा ठाम दावा ते करू शकले होते.

गौतमभाई बँकेत होते. सेंट्रल बँक ऑफ इंडियात, साधारण राष्ट्रीयीकरणाच्या वेळी त्यांना नोकरी लागली. बँकेतील कर्मचारी संघटनेच्या कामात ओढले गेले. पुढे बँक कर्मचारी संघटनेच्या गुजरात शाखेचे अध्यक्षही झाले. आणीबाणीच्या काळात प्रत्यक्ष राजकीय-सामाजिक चळवळींत उतरले. पुढल्या काळात, रजनी कोठारी अध्यक्ष असलेल्या ‘पीयूसीएल’च्या कामाने ते प्रभावित झाले.

सामाजिक चळवळींचा वारसा गौतमभाईंच्या घरातच होता. वडील स्वातंत्र्यसैनिक, अख्खे कुटुंब खादीधारी. मात्र गौतमभाईंना संघर्षांच्या नव्या वाटा दिसत गेल्या. गोध्रा जळितानंतर अल्पसंख्याकांचे शिरकाण त्यांनी पाहिले आणि मानवतावादाला पायदळी तुडवणारे केवळ प्रचाराच्या जोरावर ‘लोकप्रियता’ टिकवू शकतात, याचीही खंत त्यांना वाटू लागली. तेव्हापासून अनेक कार्यक्रमांत, ‘स्वर्णिम’ गुजरातच्या ‘मॉडेल’मागचे कुपोषण, शिक्षणाचा अभाव, दलित अत्याचार असे भयावह वास्तव उलगडून सांगण्याचा वसाच त्यांनी घेतला. दोन गुजराती पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. पैकी पहिले पीयूसीएलची गुजरातमधील ४० वर्षांची वाटचाल सांगणारे. हल्ली भाजपशी नाते सांगणाऱ्या ‘साधना’ या गुजराती नियतकालिकाबद्दल चार बरे शब्द त्या पुस्तकात होते, यावरून वाद निर्माण झाला तेव्हा ‘आणीबाणीविरोधात आम्ही सारे एकत्र लढत असताना, ‘साधना’ने केलेले काम प्रशंसनीयच होते,’ असे सांगून टीकाकारांनाच त्यांनी धडा घालून दिला होता. दुसऱ्या – गुजरातमधील असंघटित कामगारांच्या चळवळीविषयीच्या – पुस्तकाचे प्रकाशन ८ सप्टेंबरला होणार असतानाच, हृदयविकारावरील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या गौतमभाईंनी तेथेच अखेरचा श्वास घेतला.