News Flash

कॉ. यशवंत चव्हाण

कोल्हापूर संस्थानातील चव्हाण यांचा जन्म. त्या संस्थानात त्यांचे वडील न्यायाधीश होते.

कॉ. यशवंत चव्हाण 

पक्षाची भूमिका वास्तवापासून फारकत घेणारी असेल किंवा जनभावनेची दखल घेणारी नसेल, तर त्याविरोधात स्पष्टपणे बोलणारी, भूमिका घेणारी माणसे फार कमी असतात. त्यातील कॉ. यशवंत चव्हाण हे एक महत्त्वाचे नाव. श्रमिकांच्या चळवळीत अग्रभागी असणारे आणि वास्तववादी राजकीय भूमिका घेणारे, पुरोगामी- डाव्या विचारांची पाठराखण करणारे कॉ. यशवंत चव्हाण वयाच्या ९८ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेले.

कोल्हापूर संस्थानातील चव्हाण यांचा जन्म. त्या संस्थानात त्यांचे वडील न्यायाधीश होते. भारतात स्वातंत्र्य चळवळीने वेग घेतला असतानाच कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. रशियन राज्यक्रांतीनंतर साम्यवादाकडे आकर्षित होऊन  यशवंत चव्हाण भारतीय कम्युनिस्ट पक्षात दाखल झाले. चलेजाव आंदोलनात सहभागी व्हावे की नाही, यावरून कम्युनिस्ट पक्षात मतभेद निर्माण झाले होते. चलेजाव आंदोलनाचे समर्थन करणाऱ्या काही नेत्यांसह कॉ. चव्हाण यांना १९४२ मध्येच पक्षाबाहेर पडावे लागले. ‘चलेजाव’ चळवळीत सक्रिय भाग घेतल्यामुळे काही काळ त्यांना भूमिगत राहावे लागले. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात त्यांनी भाग घेतला. चव्हाण यांना नेमस्त नेते मानले जायचे. केंद्रीय नेत्यांची मने वळवून हा प्रश्न सोडवावा, अशी त्यांची भूमिका आक्रमक नेत्यांना पसंत पडली नव्हती. डॉ. आंबेडकर यांचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा मिळविण्यासाठी ज्या नेत्यांनी प्रयत्न केले, त्यात यशवंत चव्हाणही होते.

कम्युनिस्ट पक्षातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी नवजीवन संघटना स्थापन केली. त्यातून पुढे लाल निशाण पक्षाची निर्मिती झाली. राजकीय पक्षात असूनही त्यांनी रस्त्यावरच्या चळवळीला, जनआंदोलनाला महत्त्व दिले. १९७८ चा सरकारी कर्मचाऱ्यांचा संप असो की १९८२ चा गिरणी कामगारांचा संप, कॉ. चव्हाण कामगारांच्या आंदोलनात अग्रभागी राहिले. राजकीय भूमिका घेतानाही त्यांनी वास्तवाचाच विचार केला. १९९० च्या मंडल आणि राम मंदिराच्या आंदोलनाने भारतातील राजकारणाने वेगळेच वळण घेतले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत भाजपचे बळ वाढू लागले, त्या वेळी प्रतिगामी-जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी सर्व पुरोगामी- डाव्या- आंबेडकरवादी पक्षांनी काँग्रेसच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नसला तरी, महाराष्ट्रात मात्र धर्मनिरपेक्षतेची भूमिका घेऊन त्यांनी काँग्रेसशी अनेकदा निवडणूक समझोता केला. त्यामुळे लाल निशाण पक्षातही मतभेद झाले. अगदी अलीकडे  त्यांनी ‘लाल निशाण पक्ष’ जाहीरपणे भारतीय कम्युनिस्ट पक्षात विलीन केला व आपल्या कार्यकर्त्यांसह मुख्य प्रवाहात सामील झाले. त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत पुरोगामी, धर्मनिरपेक्ष व समतावादी विचारांची बांधिलकी सोडली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 1:41 am

Web Title: communist leader yashwant chavan
Next Stories
1 चंडी लाहिरी
2 सुदीप लखटाकिया
3 दूधनाथ सिंह
Just Now!
X