17 September 2019

News Flash

डॅनी कोहेन

आजच्या काळात आपण कुठल्याही कार्यक्रमाचे ‘लाइव्ह स्ट्रीमिंग’ बघू शकतो, त्याचे श्रेय कोहेन यांनाच जाते.

प्रत्यक्षात विमान न उडवताही ते चालवण्याचे प्रशिक्षण घेण्याची जी सोय सध्या उपलब्ध आहे, त्याचे श्रेय संगणक वैज्ञानिक डॅनी कोहेन यांना जाते. विमान चालवण्याचे प्रशिक्षण सादृश्यीकरणाच्या माध्यमातून सोपे करणारे कोहेन गत आठवडय़ात निवर्तले. १९६०-७० च्या दशकांत कोहेन यांनी संगणक आरेखनावर मोठे काम करून विमान चालवण्याच्या प्रक्रियेचे सादृश्यीकरण केले होते. विमान चालवण्याची प्रक्रिया सादृश्यीकरणाच्या माध्यमातून विकसित करूनच ते थांबले नाहीत, तर तीच प्रणाली वापरून ते वैमानिकही बनले!

१९७० मध्ये त्यांनी इंटरनेट दूरध्वनी यंत्रणेवर दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात काम केले. ‘अर्पानेट’अंतर्गत त्यांना अमेरिकी संरक्षण खात्याने इंटरनेट दूरध्वनी यंत्रणेवर काम करण्यास सांगितले होते. त्यांनी हा विश्वास सार्थ ठरवून इंटरनेट दूरध्वनीचा प्रयोग यशस्वी केला होता. त्यानंतर १९७८ मध्ये कोहेन यांच्या प्रयत्नातून पहिला ‘कॉन्फरन्स कॉल’ शक्य झाला, यालाच ‘व्हॉइसओव्हर आयपी तंत्रज्ञान’ असे म्हटले जाते. आजच्या काळात आपण कुठल्याही कार्यक्रमाचे ‘लाइव्ह स्ट्रीमिंग’ बघू शकतो, त्याचे श्रेय कोहेन यांनाच जाते.

डॉ. कोहेन यांचा जन्म इस्रायलमधील हैफात येथे झाला. शाळेत असल्यापासूनच कोहेन यांना संगणकात रस होता. संगणक म्हणजे ‘इलेक्ट्रॉनिक मेंदू’ असतो, असे एका लेखात वाचलेले वाक्यच त्यांना पुढे गणितात पदवी घेतल्यानंतर संगणक-विज्ञानाकडे वळवण्यास कारणीभूत ठरले. इस्राएलमधून अमेरिकेत आल्यानंतर त्यांनी ‘एमआयटी’ या प्रख्यात संस्थेत काम केले. हार्वर्ड विद्यापीठात त्यांनी ‘काम्प्युटर ग्राफिक्स’ या तंत्राचे जनक मानले जाणाऱ्या इव्हान सदरलँड यांचे संगणक आरेखनावर केलेले सादरीकरण पाहिले. त्यातून त्यांना विमान प्रशिक्षणाच्या सादृश्यीकरणाची कल्पना सुचली. हार्वर्डमध्ये येऊन ती त्यांनी तयार केली. संगणक एकमेकांना जोडून त्यांनी ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’चा पाया घातला होता. या पद्धतीत मोठय़ा प्रमाणावर माहितीची साठवण, प्रक्रिया व व्यवस्थापन शक्य असते. नंतर ‘सन मायक्रोसिस्टीम्स’ या (‘जावा’ ही संगणकीय प्रणाली भाषा रचणाऱ्या) संस्थेत ते काम करीत होते. जगातील पहिल्या ‘डिजिटल लायब्ररी’ची संकल्पनाही त्यांनी प्रत्यक्षात आणली होती. ‘इंटरनेट हॉल ऑफ फेम’मध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता. नर्मविनोदी स्वभावाच्या कोहेन यांनी ‘प्रा. जे. फिनेगन’ या नावाने निर्थक संशोधनाची खिल्ली उडवणारे लेखन केले होते. त्यांच्या निधनाने खूप सारे कुतूहल आणि तितकीच कूटप्रश्न सोडवण्याची क्षमता असलेला डिजिटल क्रांतीचा एक शिलेदार काळाच्या पडद्याआड गेला आहे.

First Published on August 22, 2019 1:14 am

Web Title: computer scientist danny cohen zws 70