‘हवामान बदल हे थोतांड आहे,’ असे काही जणांना वाटत असले, तरी प्रत्यक्षात हवामान बदलांचे परिणाम आपण अनुभवतो आहोत. हवामान बदलांचा संबंध हा मानवी स्वास्थ्याशीही असतो, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याच क्षेत्रात काम करणारे कॉनराड स्टीफन हे कर्मयोगी वैज्ञानिक होते. हिमनदीतज्ज्ञ, भूगोलाचे प्राध्यापक व निसर्गप्रेमी अशी त्यांची ओळख. त्यांना खरे तर अभिनेता व्हायचे होते पण वडिलांनी त्यांना कामधंदा बघण्यास सांगितले. प्रत्यक्षात त्यांनी संशोधनाची वाट धरली ती कायमचीच.

हवामान बदलांचा अभ्यास करतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गेली ४० वर्षे त्यांनी या विषयावर संशोधन केले. त्यातील मुख्य भाग ग्रीनलॅण्डमधील हवामान बदलांचा होता. ग्रीनलॅण्डमधील बर्फाचे थर हवामानातील बदलांमुळे वेगाने वितळत चालले आहेत हे त्यांनी दाखवून दिले. स्विस फेडरल इन्स्टिटय़ूट फॉर फॉरेस्ट, स्नो अ‍ॅण्ड लॅण्डस्केप रीसर्च या संस्थेचे ते संचालक. स्विस कॅम्प या त्यांनीच ३० वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या केंद्राजवळ बर्फाच्या घळीत पडून त्यांचा मृत्यू झाला. या भागात हवामान प्रतिकूल असतानाही तेथे राहून ते संशोधन करीत होते. याला तपश्चर्याच म्हणावे लागेल..

हवामान बदलांनीच झालेल्या परिस्थितीमुळे त्यांचा बळी गेला. स्टीफन हे हवामान बदलांचे परिणाम हिरिरीने मांडत होते. राजकीय नेत्यांनाही त्यांनी ते पटवून दिले होते. त्यांच्या संशोधन केंद्रात प्रतिकूल हवामानात ते केवळ चार तास झोपत असत. काळीज गोठवणाऱ्या थंडीत असे संशोधन करणे म्हणजे त्यासाठी निग्रही मन हवे; ते त्यांच्याकडे होते. स्वित्झर्लंडमधील संस्थेतून त्यांनी पीएच.डी. केली होती. नंतर ते कोलोरॅडो विद्यापीठात प्राध्यापक झाले. पुढे याच विद्यापीठाच्या पर्यावरण संशोधन संस्थेचे प्रमुख झाले. यानंतरची प्राध्यापकी त्यांनी ईटीएच झुरिच या संस्थेत केली. मात्र स्विस फेडरल इन्स्टिटय़ूट फॉर फॉरेस्ट, स्नो अ‍ॅण्ड लॅण्डस्केप रीसर्च या संस्थेचे संचालक ही त्यांची खरी ओळख ठरली.

कठोर परिश्रम करूनही त्यांच्या चेहऱ्यावरची स्मितरेषा कधी लपली नाही. हिमसृष्टीच्या कथा त्यांनी अनेकदा पत्रकारांशी बोलताना जिवंत केल्या. त्यात अनेकदा त्यांनी हिमनद्यांच्या वितळण्याबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यांनी ग्रीनलॅण्डमध्ये २० संशोधन केंद्रांचे जाळे निर्माण केले. त्यांच्या मते १० हजार वषॉंत ग्रीनलॅण्डचे बर्फ वितळून जाईल पण अंटाक्र्टिकाचे बर्फ वितळून नाहीसे होण्यास वेळ लागेल तोवर या दोन्ही भागांचे हिमाच्छादन राखण्यासाठी सावध झाले पाहिजे.

निसर्गाच्या जवळ जाऊन त्याची राखण करणारा हा वाटाडय़ा आता आपल्यात नाही याची खंत सर्वानाच असणार आहे.