26 November 2020

News Flash

डॉ. मोहम्मद असदुल्लाह

विद्यार्थीदशेपासूनच मो. असदुल्लाह सातत्याने लेखन करीत आहेत.

मराठी आणि उर्दू या तशा दोन टोकांवरील दोन भाषा. पण, दोन्ही भाषांना एक प्रदीर्घ आणि रंजक इतिहास लाभला आहे. याच इतिहासाची पाने चाळून त्यात जे जे काही वंदनीय-अभिनंदनीय आहे ते अनुवादाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचावे, या एकमेव उदात्त हेतूने डॉ. मोहम्मद असदुल्लाह यांनी या दोन्ही भाषांच्या दरम्यान एक सशक्त पूल बांधला आहे.  मराठी भाषेचे प्रतिभावंत लेखक, चिंतनशील अभ्यासक आणि मराठी व उर्दू साहित्याची देवाणघेवाण व्हावी, यासाठी सतत झटणारे उर्दू साहित्याचे ललित लेखक ही डॉ. मोहम्मद असदुल्लाह यांची मूळ ओळख. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नागपूर केंद्राच्या वतीने देण्यात येणारा सामाजिक क्षेत्रातील यशवंतराव चव्हाण गौरव पुरस्कार डॉ. मोहम्मद असदुल्लाह यांना नुकताच जाहीर झाला आहे. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपल्या व्यासंगाचा वेगळा ठसा साहित्य क्षेत्रात व सामाजिक कार्यात  उमटवला आहे.

वरुडसारख्या आडवळणी गावात जन्मलेले व तेथेच शिक्षण घेतलेले डॉ. असदुल्लाह यांची कारकीर्द तशी संघर्षपूर्ण. अशा संघर्षांतही त्यांनी आपली आवड जिवापाड जपली. मराठीतील दर्जेदार विनोदी वाङ्मयाचे उर्दू भाषेत आणि उर्दू भाषेतील वाङ्मयाचे मराठीत भाषांतर त्यांनी केले. आज स्वत:च्या उर्दू वाङ्मय निर्मितीत ते आघाडीवर असून त्यांच्या अनेक कथा, कविता विनोदी लेख भारतातील नव्हे तर पाकिस्तान, अमेरिका येथून प्रकाशित होणाऱ्या अनेक नियतकालिकातून प्रसिद्ध झाले आहे. विद्यार्थीदशेपासूनच मो. असदुल्लाह सातत्याने लेखन करीत आहेत.

मराठी माध्यमातून मो. असदुल्ला यांनी बी.ए. केले. नंतर उर्दू वाङ्मयात बी. ए. केले. मातृभाषा उर्दू व उर्दू साहित्याचा अभ्यास, पण शिक्षणाचे माध्यम मराठी. यामुळे त्यांनी उर्दू व मराठीवर सारखेच प्रभुत्व मिळवले. ‘जमाल ए हमनशी’ हे १९८५ मध्ये प्रकाशित झालेले व जाणकारांनी गौरवलेले मो. असदुल्लाह यांचे पहिले पुस्तक.  यात त्यांनी श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर, राम गणेश गडकरी, चिं.वि. जोशी, प्र.के. अत्रे, पु.ल. देशपांडे, वि.आ. बुवा, जयवंत दळवी, बाळ सामंत  या लेखकांची ओळख उर्दू भाषकांना करून दिली. १९९१ मध्ये  त्यांचा ‘बूढे के रोल में’ हा लघुनिबंध संग्रह प्रकाशित झाला. यातील तीन लघुनिबंध पाकिस्तानात प्रकाशित झालेल्या एका प्रातिनिधिक संग्रहात समाविष्ट करण्यात आले.

‘बालभारती’च्या उर्दू भाषा समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांना उर्दू अकादमीसह सेतू माधवराव पगडी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आतापर्यंत त्यांची हास्यव्यंग समीक्षा व बालसाहित्याची एकूण १६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. उर्दू भाषेतील अनेक एकांकिकांचे लेखन त्यांनी केले असून त्याचे दिग्दर्शनही केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2020 1:44 am

Web Title: dr muhammad asadullah profile zws 70
Next Stories
1 फा. कालरेस वालेस
2 डॉ. उगुर साहीन, डॉ. उझ्लेम तुरेसी
3 चंद्रप्रकाश भाम्बरी
Just Now!
X