24 September 2020

News Flash

डॉ. रवींद्रनाथ टोणगांवकर

स्वातंत्र्यसैनिक वडील आणि शिक्षिका आई, तसेच साने गुरुजी, विनोबा भावे यांच्या विचार-कार्याचा प्रभाव त्यांच्यावर होता.

डॉ. रवींद्रनाथ टोणगांवकर

राज्याच्या एका टोकाकडील ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातला जन्म, ग्रामीण भागात सुरुवातीचे शिक्षण, मग नामांकित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश, तिथे मिळविलेले शैक्षणिक यश आणि त्यामुळे चालून आलेल्या उत्तम भवितव्याच्या शक्यता.. अशी आरंभीची वाटचाल असलेली व्यक्ती- विशेषत: पाच दशकांपूर्वी- शहराकडे वळण्याऐवजी गावाकडे का जाईल? परंतु डॉ. रवींद्रनाथ टोणगांवकर यांनी गावाची.. धुळे जिल्ह्यच्या आदिवासी भागातील ‘दोंडाईचा’ची निवड केली. पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सवरेपचार रुग्णालयात उत्तम शैक्षणिक कामगिरीकरिता दिले जाणारे ‘डॉ. जी. एम. फडके पारितोषिक’ पटकाविलेल्या डॉ. टोणगावकरांनी प्राध्यापकी वा शहरात डॉक्टरकी करण्याऐवजी त्यांचे जन्मगाव दोंडाईचा येथे वैद्यकीय सेवा सुरू केली. आधुनिक सुविधांपासून दूरच असलेल्या दोंडाईचा येथे त्यांनी १९६७ साली दवाखाना थाटला, तेव्हा डॉक्टर पत्नीशिवाय त्यांच्या मदतीला कुणीही नव्हते आणि धुळे वगळता आसपासच्या प्रदेशात तेव्हा एकही रुग्णालय नव्हते. अशा परिस्थितीत अनंत अडचणींना तोंड देत, हाती घेतलेले वैद्यकीय सेवेचे व्रत गेली पाच दशके- अगदी अलीकडे करोनासंसर्ग होईपर्यंत- त्यांनी निष्ठेने पार पाडले. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्रामीण शल्यविशारद म्हणून ख्यातकीर्त  झाले. त्यामुळेच सोमवारी त्यांची निधनवार्ता आली, तेव्हा वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींप्रमाणेच खानदेशवासीयांनीही हळहळ व्यक्त केली.

स्वातंत्र्यसैनिक वडील आणि शिक्षिका आई, तसेच साने गुरुजी, विनोबा भावे यांच्या विचार-कार्याचा प्रभाव त्यांच्यावर होता. त्यामुळेच त्यांनी ग्रामीण भाग कर्मभूमी म्हणून निवडणे हे तसे नवल नव्हते. या ग्रामीण भागात आधुनिक वैद्यकीय साधने प्रथमच आणणाऱ्या डॉ. टोणगांवकरांनी वंचित-गरीब समूहास माफक दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली. खानदेशवासीयांमध्ये ते ‘नाना’ म्हणून प्रसिद्ध होते. वैद्यकीय सेवेबरोबरच त्यांनी आव्हानात्मक स्थितीत आपले वैद्यकीय ज्ञानही विस्तारत ठेवले. हर्नियाच्या शस्त्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट कापडाची (जाळी) किंमत जास्त असल्याने ती शस्त्रक्रिया महागडी ठरत असे. डॉ. टोणगांवकरांनी या शस्त्रक्रियेत मच्छरदाणीच्या स्वस्त कापडाचा वापर सुचवला. हे संशोधन जगभरात मान्यता पावले. आता २८ देशांत या स्वस्त कापडाचा वापर शस्त्रक्रियेत होत आहे; त्यामुळे तिचा खर्च जनसामान्यांच्या आवाक्यात आला. त्यांच्या पुढाकाराने इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रूरल सर्जरी या संस्थेची स्थापना झाली आणि ते तिचे अध्यक्षही झाले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यातही ते सक्रिय होते. त्यांचा हा प्रवास ‘दोंडाईच्याचा डॉक्टर’ या आत्मकथनात वाचायला मिळतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 12:01 am

Web Title: dr rabindranath tongaonkar profile abn 97
Next Stories
1 मीना देशपांडे
2 प्रा. गोविंद स्वरूप
3 गुरू मंगलाप्रसाद मोहंती
Just Now!
X