उद्योजकीय दूरदृष्टी, संशोधकाची बुद्धिमत्ता व समाजभावी दातृत्व असे गुण एखाद्याच्या अंगी असणे दुर्मीळच, पण सध्या स्वित्र्झलडमध्ये कार्यरत असलेले राजेंद्रकुमार जोशी यांनी हा त्रिवेणीसंगम साधला आहे.  भारत सरकारचा प्रवासी भारतीय सन्मान त्यांना नुकताच स्वित्र्झलडमधील भारतीय वकिलातीकरवी प्रदान करण्यात आला. भारतात आता तरुणांची संख्या मोठी असणार आहे, पण हे मनुष्यबळ प्रशिक्षित नसेल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही, हे ओळखून त्यांनी राजस्थानात जयपूर येथे ५०० कोटी रु. खर्च करून ऑगस्ट २०१७ मध्ये ‘भारतीय कौशल्य विकास विद्यापीठ’ उभारले. स्वित्र्झलडच्या कौशल्य विकासातून आदर्श घेऊन सुरू केलेले हे विद्यापीठ ‘एक विद्यार्थी- एक यंत्र’ तसेच ‘स्विस डय़ुअल सिस्टीम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या- ‘वर्ग व प्रयोगशाळा/ कार्यशाळांप्रमाणेच प्रत्यक्ष कारखान्यात विद्यार्थ्यांनी काम करणे’ या तत्त्वावर चालते.

राजेंद्र यांचा जन्म १३ सप्टेंबर १९३४ रोजी राजस्थानच्याच सिकर जिल्ह्य़ातील दुदलोड येथे झाला. वडील वैद्य महावीरप्रसाद जोशी व आई जावित्रीदेवी यांच्या समवेत लहानपणीच ते सादूलपूरला आले, तेथेच त्यांचे शालेय शिक्षण झाले. बिट्स पिलानी येथून औषधनिर्माणशास्त्रात पदवी घेऊन त्यांनी स्लोवाकियात कोमन्स्कीर ब्रातिस्लाव्हा विद्यापीठातून पीएचडी केली. मग १९६९ पासून स्वित्र्झलडमध्ये संशोधन साहाय्यक म्हणून ते काम करू लागले. वैद्यकीय रसायनशास्त्रात त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वित्र्झलडमध्येच फुमाफार्म ही औषध कंपनी स्थापण्यात मोठा वाटा उचलला. सोरायसिस, मल्टिपल स्क्लेरॉसिसवर (बहुअवयव विकलांगता) त्यांनी औषधे तयार केली आहेत.  या विकारावर तोंडावाटे घेण्याचे औषध तयार करून त्यांनी अनेक रुग्णांच्या आशा उंचावल्या. झुरिच येथील फार्मासिस्ट उर्सुला यांच्याशी त्यांचा विवाह झाला. या दोघांनी नंतर या क्षेत्रात आणखी जोमाने काम केले. या दोघांनी ‘राजेंद्र व उर्सुला जोशी फाऊंडेशन’ची स्थापना केली. त्यासाठी स्वित्र्झलडचे मार्गदर्शन मिळवले. आता आणखी अनेक व्यवसायांतील कौशल्ये शिकवणारी केंद्रे ते सुरू करणार आहेत; त्यात वैद्यकीय साहाय्यक, प्रशासन साहाय्यक यांचा समावेश आहे. उत्पादन क्षेत्रातील वस्तू तयार करण्यासाठीही ते प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करणार आहेत. स्वित्र्झलडच्या धर्तीवर त्यांनी कौशल्य विकासाचे उत्तम प्रारूप जयपूरमध्ये उभे करून दाखवले. त्यांनी नालंदा विद्यापीठाला सहा कोटी रुपयांची देणगीही अलीकडेच दिली होती. त्यातून इतिहास अभ्यासाचे अध्यासन सुरू करण्यात आले आहे. राजेंद्र व उर्सुला जोशी शिक्षण संस्थेमार्फत त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी सुविधा निर्माण केली आहे.