06 July 2020

News Flash

डॉ. सुधीर रसाळ

 डॉ. रसाळ यांचे शालेय व पदवीपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या शाळा-महाविद्यालयांत झाले

डॉ. सुधीर रसाळ

मराठवाडय़ाच्या पत्रकारितेचा मानबिंदू अशी ओळख असणाऱ्या संपादक अनंतराव भालेराव यांच्या जन्मशताब्दी वर्षांची सांगता होत असताना, त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा मानाचा पुरस्कार मराठीतील अग्रणी समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना जाहीर होणे ही वाङ्मयीन क्षेत्रासाठी आनंदाची वार्ता म्हणावी लागेल. मराठी कविता प्रांतातील समीक्षा क्षेत्रात डॉ. रसाळ हे नाव आता सर्वदूर मान्यता पावलेले आहे; पण त्यासाठी त्यांनी जपलेली स्वतंत्र प्रतिमा, वस्तुनिष्ठता महत्त्वाची मानली जाते.

डॉ. रसाळ यांचे शालेय व पदवीपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या शाळा-महाविद्यालयांत झाले. त्यांचे वडील न. मा. कुलकर्णी हे हाडाचे, विद्यार्थिप्रिय शिक्षक होते. घरातूनच मिळालेला अध्यापनाचा वारसा पुढे नेताना गुणात्मक विचारांची शिदोरी त्यांनी शैक्षणिक, साहित्य-संस्कृती व संस्थात्मक कार्याच्या क्षेत्रात विलक्षण निष्ठेने वितरित केली. निझामी राजवटीच्या अस्तानंतर मराठवाडय़ातील त्यांचे समकालीन साहित्यिक कथा, काव्य, कादंबरी आदी ललितपर लेखनाकडे वळाले असल्याचे दिसत असताना तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेनंतर औरंगाबादेत आलेल्या प्रा. वा. ल. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रसाळ यांच्या साहित्याभ्यासाने समीक्षेची वाट निवडली. साठीच्या दशकांत समीक्षक-विचारवंत म्हणून नरहर कुरुंदकर यांची ओळख सिद्ध होत असतानाच्या काळात दुसऱ्या बाजूला डॉ. रसाळ यांनीही सखोल अभ्यास आणि चिंतनातून समीक्षेसंदर्भातील बैठक पक्की केली. त्यातून झालेले लेखन आणि साकारलेले त्यांचे समीक्षापर ग्रंथ हा अवघा मराठी साहित्य संस्कृतीचा ऐवज झाला आहे. ‘कविता आणि प्रतिमा’ या त्यांच्या ग्रंथाचा उल्लेख या अनुषंगाने अनिवार्य ठरतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इंग्रजी आणि मराठी विभागांना ज्या नामांकित ज्ञानवंतांची परंपरा लाभली, त्यात डॉ. रसाळ हे एक ठळक नाव. अध्यापनासोबतच संस्थात्मक कार्य व संपादनाची जबाबदारी पार पाडताना त्यांनी त्यातही आपली शिस्त, व्यासंग, स्पष्टता दाखवून दिली. ‘प्रतिष्ठान’ नियतकालिक नावारूपास आणताना त्यांची व्यापक संपादकीय दृष्टी अधोरेखित झाली. साहित्य संस्थांमधील पदाधिकाऱ्यांचे वर्तन आणि कृती कशी असावी, याचा वस्तुपाठ घालून देतानाच योग्य वेळी या संस्थांतून मुक्त होण्याची दक्षता त्यांनी घेतली.

अनंत भालेराव यांच्या ‘मांदियाळी’ पुस्तकाला त्यांनी लिहिलेली विवेचक प्रस्तावना असो किंवा अलीकडचे त्यांचे ‘लोभस’ हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक; या लिखाणातून त्यांच्यातील समीक्षकापलीकडचा चिकित्सक लेखक उभा राहतो. आजही लेखन, वाचनमग्न असलेल्या डॉ. रसाळ यांना मिळालेला ‘अनंत भालेराव स्मृती पुरस्कार’ मानाचा तुराच म्हणावा लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2019 12:03 am

Web Title: dr sudhir rasal profile abn 97
Next Stories
1 अरविंद इनामदार
2 फा. रोमाल्ड डिसूझा
3 नॉर्मन मायर्स
Just Now!
X