शोषित वर्गाच्या जाणिवांची भाषा मराठी साहित्य विश्वात मानाचे स्थान मिळवत होती, दलित साहित्याला नवे धुमारे फुटू लागले होते. अनेक कादंबऱ्या, कथा, नाटकांमधून जाती-धर्माच्या पलीकडे माणूसपण अधिक महत्त्वाचे असते असे अधोरेखित होत होते. या काळातील साहित्य भारतीय वाचकांपर्यंत हिंदी भाषेतून पोहोचले पाहिजे, याचा आग्रह बाळगणाऱ्यांमध्ये ज्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे ते म्हणजे सूर्यनारायण रणसुभे. भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळातील हिंदी साहित्याचा अभ्यास करून ‘पीएच.डी.’ मिळविल्यानंतर हिंदू-मुस्लिमांमधील प्रश्नांची उकल करणारा विचारवंत. गांधी-मार्क्‍स-आंबेडकर यांचा एकत्रित अभ्यास करून या तिघांच्या विचारांत अजिबात अंतर्विरोध नाहीत, असे ठाम प्रतिपादन करणाऱ्या रणसुभे यांना केंद्रीय हिंदी संस्थेच्या वतीने दिला जाणारा गंगाशरण सिंह पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला. हिंदी भाषेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पाच लाख रुपयांचा पुरस्कार दिला जातो.

तसे हिंदी भाषेतील बरेचसे साहित्य मराठीत उपलब्ध आहे. पण मराठीतील साहित्य देशभर पोहोचविण्याचा दुवा म्हणून ज्यांनी काम केले, दोन भाषांतील साकव म्हणून जे आयुष्यभर झटले त्यामध्ये रणसुभे यांचे नाव मोठे. गुलबर्गा जिल्हय़ात आई-वडील मजुरी करायचे. गरिबीमुळे विज्ञानाची आवड असणाऱ्या रणसुभे यांनी शिष्यवृत्ती मिळाली म्हणून हिंदी भाषा शिकण्याचे ठरविले. अलाहाबादला शिक्षण घेतले तर अधिकची ५० रुपये शिष्यवृत्ती मिळायची. गरिबीमध्ये जगणाऱ्या आई-वडिलांना पैसे पाठवायचे म्हणून शिकणाऱ्या रणसुभे यांच्यावर तेव्हा समाजवादी विचारांचा पगडा होता. पुढे हिंदी भाषेत पीएच.डी. करताना फाळणीच्या काळातील हिंदी साहित्य याचा अभ्यास त्यांनी मांडला. त्याचे अनेक पदर उलगडून दाखविले. शिक्षणानंतर लातूर येथे दयानंद महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले. लेखन-वाचनात रमलेल्या या माणसाने ६० पुस्तकांचा अनुवाद केला. ‘अक्करमाशी’, ‘उचल्या’, ‘आठवणींचे पक्षी’ हे दलित साहित्य हिंदी भाषिकांसाठी अनुवादित केले. ही पुस्तके वाचल्यानंतर हिंदी प्रदेशातील दलित साहित्यिकांना त्यांच्या शोषणाच्या कथा, आत्मकथा लिहाव्याशा वाटल्या. तेथेही दलित साहित्य जन्माला येऊ लागले. त्यामुळे शोषितांचा आवाज भाषिक अर्थाने जोडणारा नवा साकव रणसुभे यांनी निर्माण केला. मार्क्‍सवाद आणि आंबेडकर हे त्यांच्या अभ्यासाचे आणि चिंतनाचे विषय. या व्यक्तींच्या विचारविश्वातील अनेक पुस्तके अनुवादित व्हायला हवी, असे ठरवून त्यांनी केलेले काम देशपातळीवर नावाजले गेले. त्यांना महाराष्ट्र हिंदी अकादमीचा माधव मुक्तिबोध, यशपाल यांचे ‘झूठा सच’ या मराठीत अनुवादित केलेल्या पुस्तकास सौहार्द पुरस्कार मिळाले आहेत. देशपातळीवर भाषेचा सेतू उभा करताना विचारांवरील निष्ठा वृद्धिंगत करणारा हाडाचा शिक्षक, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे..

vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान