‘तियापरी श्रोता। अनुभवावी हे कथा।। अतिहळुवारपण चित्ता आणूनियां।।’ या ज्ञानेश्वरांच्या ओवीप्रमाणेच ऐकावी-वाचावी अशी डॉ. जुल्फी शेख यांची आयुष्यकथा. पूर्व विदर्भातील एका गावात मुस्लीम कुटुंबात जन्मलेल्या आणि ‘हब्बी-रब्बी जल्लला..’ म्हणत वाढलेल्या डॉ. जुल्फी शेख यांना ‘अध्यात्म विद्य्ोचें दाविलेंसें रुप। चैतन्याचा दीप उजळिला।।’ हे माऊलीचे शब्दही तितक्याच उत्कटतेने खुणावतात आणि ते झपाटल्यागत ज्ञानेश्वरीची पारायणे करत सुटतात. ही पारायणेही इतकी व्रतस्थ, की संत ज्ञानेश्वरांच्या साहित्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला त्यांना डी. लिट. या सर्वोच्च पदवीने सन्मानित करावे लागते. अशी पदवी मिळवणाऱ्या त्या देशातील एकमेव महिला होत्या. केवळ संत ज्ञानेश्वरच नाहीत, तर एकूणच संत साहित्य त्यांनी त्यातल्या जीवनमूल्यांच्या संदर्भासह वाचकांपुढे मांडले. डॉ. जुल्फी शेख या संवेदनशील कवयित्रीही होत्या. ‘मी कोण? मी फाळणी! विदुषकांनी माझे नामकरण केले, माझ्या ललाटावर फाळणी नावाचे सवतपण उमटवून चेहऱ्यांची माझ्या प्लॅस्टिक सर्जरी केली’ असे थेट हृदयाला भिडणारे शब्द ही त्यांच्या कवितांची ओळख होती. आपल्या आणि आपल्या समूहाच्या भाळी जो परकेपणाचा ठसा उमटवला गेलाय तो किती वेदनादायी आहे, हे त्यांना अशा कवितांमधून ओरडून सांगावेसे वाटायचे. अक्षरवेध, मी कोण? (काव्यसंग्रह), मृत्युंजय (काव्यसमीक्षा), बहादूरशहा जफर यांची राष्ट्रभक्ती, रुमच्या कथा (बालवाङ्मय) आदी साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे. ‘शहा मुंतोजी ब्राह्मणी यांच्या काव्याचे मूल्यमापन’ या विषयावर त्यांना पीएच. डी. मिळाली होती. ‘श्री ज्ञानेश्वर आणि शहा मृत्यूंजय यांच्या काव्याचा तौलनिक अभ्यास’ या शोधनिबंधासाठी नागपूर विद्यापीठाने त्यांना डी. लिट. देऊन गौरवले होते. वर्धा जिल्ह्य़ात देवळी येथे झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. मुस्लीम मराठी कविता, श्री ज्ञानेश्वरांचा वाङ्मयीन वारसा, नवे प्रवाह, नवे स्वरूप इत्यादी महत्त्वाचे ग्रंथ त्यांच्या खाती जमा आहेत. उर्दू, अरबी व हिंदी गझलांचा त्यांचा व्यासंग होता. ‘गालीब-ए-गजम्ल’ (पत्रानुवाद ) हा त्यांचा ग्रंथ सखोल अभ्यासकाची ओळख करून देणारा आहे. त्यांनी आपली लेखणी व वाणीने नेहमी हिंदू-मुस्लिमांमध्ये भेदभावाच्या भिंती उभ्या करणाऱ्यांवर कठोर प्रहार केला. त्या आपले आयुष्य अतिशय वैशिष्टय़पूर्ण रीतीने जगल्या. परंतु  कर्करोगाने त्यांना गाठले अन् मृदु वाणीच्या आणि शालीन व्यक्तिमत्त्वाच्या या कवयित्रीला वयाच्या ६६ व्या वर्षी आपल्यातून हिरावून नेले.

Ajit Pawar, Raj Thackeray,
राज ठाकरे यांच्या बिनशर्त पाठिंब्याबाबत अजित पवार काय म्हणाले?
Hasan Mushrif On Sanjay Mandalik
“…तर संजय मंडलिकांचा पराभव करणं प्रत्यक्षात ईश्वरालाही शक्य होणार नाही”, हसन मुश्रीफ यांचे विधान चर्चेत
Uday Samant Nagpur
“रत्नागिरी – सिंधुदुर्गवर आमचाच हक्क” – उदय सामंत
Ramdas Athawale
महायुतीमध्ये आम्ही नाराज, पुढील तीन दिवसांत निर्णय घेऊ, रामदास आठवलेंचा इशारा