एकेकाळी एड्स या विषाणूजन्य रोगाची मोठी भीती समाजात होती,त्याची जनुकीय रचना सतत बदलत असल्याने त्यावर औषध शोधणे हे आव्हान होते. या काळात एचआयव्ही विषाणूची जनुकीय रचना, तो प्रतिकारशक्ती प्रणालीवर ज्या पद्धतीने हल्ला करतो त्याचे विश्लेषण, त्याचे निदान व उपचार हे सगळेच घटक महत्त्वाचे होते. त्यात महत्त्वाची भूमिका  पार पाडली होती ती फ्लॉसी वाँग-स्ताल यांनी. एड्सचा रेणवीय अभ्यास करणाऱ्या या महिला विषाणूशास्त्रज्ञ गेल्या आठवडय़ात निवर्तल्या.

हाँगकाँगमधून त्या अमेरिकेत विद्यार्थी म्हणून आल्या. त्यांनी जीवाणूशास्त्रात पदवी, तर रेणवीय जीवशास्त्रात विद्यावाचस्पती पदवी घेतली. पुढे बेथेसडा येथील कर्करोग संशोधन केंद्रातील ‘गॅलो प्रयोगशाळे’त   सुमारे १७  वर्षे त्यांनी कर्करोगावर संशोधन केले. मानवी डीएनएत बदल करून पेशींवर हल्ले करणाऱ्या रेट्रो विषाणूंवर त्यांनी बरेच संशोधन केले होते. इन्फ्लुएंझासारख्या साध्या विषाणूला मानवी  शरीरातील प्रतिकारशक्ती पेशी लगेच ओळखून हल्ला करतात पण रेट्रो विषाणूंना ओळखताना त्यांची गडबड होते त्यामुळे एड्सच्या एचआयव्ही विषाणूवर मात करणे आव्हान होते. चाळीस वर्षांपूर्वी विज्ञान क्षेत्रात महिलांना फारसे स्थान नसताना वाँग यांनी सुरुवात केली. २००३ मध्ये त्यांनी जिनॉमिक्स अ‍ॅण्ड प्रोटिऑमिक्समधील संशोधन लेखात नवीन प्रकारच्या रेट्रो विषाणूंचा उल्लेख केला होता. १९८० च्या सुमारास एचआयव्ही विषाणूवर त्यांनी सखोल संशोधन करून त्याची जनुकीय कुंडली मांडली. त्यातून एड्स विषाणू निदानाच्या अधिक प्रगत चाचण्या शक्य झाल्या. आजच्या काळात एड्सवर एकच औषध नाही तर काही औषधे मिळून उपचार केले जातात, तो दृष्टिकोन त्यांच्याच संशोधनातून पुढे आला. त्यांचा जन्म चीनमधील ग्वांगझाऊचा.  चिनी कम्युनिस्ट क्रांतीनंतर त्यांचे आईवडील हाँगकाँगमध्ये आले. त्यांचे शिक्षण इंग्रजीतूनच झाले. आईवडिलांनी त्यांच्या उच्च शिक्षणाला उत्तेजन दिले.

अमेरिकेत, सान दियागोत आल्यावर त्यांनी एड्स संशोधन केंद्राची धुरा हाती घेतली. जनुक उपचार व इतर पद्धतींवर संशोधन केले. आयथरएक्स कंपनीत काम करताना त्यांनी हेपॅटिटिस सी बाबत काम केले. आजच्या काळात करोना विरोधात आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या प्रयत्नांना बळ देण्यात आले,  तसेच काम त्या काळात एड्स बाबतच्या संशोधनात डॉ. वाँग स्टाल यांनी केले होते. अजूनही एड्सवर ठोस उपाय सापडलेला नाही. तो शोधण्याच्या कामात त्यांचे संशोधन सतत मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.