भारतीय हॉकीच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार ठरलेले तसेच दोन ऑलिम्पिक पदकांचे मानकरी ठरलेले रघबीर सिंग भोला यांनी वयाच्या ९२व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुलतान ते दिल्ली असा प्रवास करत उच्चशिक्षित असलेल्या भोला यांनी भारतीय वायुसेना आणि भारतीय हॉकीची जवळपास अडीच दशके सेवा केली. खेळाडू म्हणून नव्हे तर राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय पंच, अनेक आंतरराष्ट्रीय दौऱ्यांमध्ये व्यवस्थापक, १९९०च्या दशकापर्यंत सरकारी निरीक्षक अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडली. म्हणूनच हॉकीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल भोला यांना २००० साली अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले.

भोला यांचे कुटुंब मुलतानमध्ये (आताचे पाकिस्तानमधील शहर) स्थायिक होते. खानेवाल येथील सरकारी शाळेत शिक्षण घेतानाच भोला यांना हॉकीची आवड निर्माण झाली. खानेवाल येथील अद्ययावत सोयीसुविधांमुळे भोला यांना हॉकीचे तंत्र आत्मसात करता आले. आंतरशालेय स्पर्धामध्ये छाप पाडल्यानंतर ते उच्चशिक्षणासाठी दिल्लीत दाखल झाले. विद्युत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच त्यांना हॉकीची आवड स्वस्थ बसू देत नव्हती.

वायुसेनेच्या बेंगळूरु येथील तांत्रिकी महाविद्यालयात सराव करीत असतानाच त्यांची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी सेनादलाच्या संघात निवड झाली आणि सेनादलाने पहिल्यांदाच राष्ट्रीय हॉकी स्पर्धेवर मोहोर उमटवली. तेथूनच भोला यांच्या राष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात झाली. १९५६ च्या मेलबर्न ऑलिम्पिक स्पर्धेसाठी बलबीर सिंग यांच्या नेतृत्वाखाली भोला यांची भारतीय संघात निवड झाली. भारताने साखळी आणि उपांत्य फेरीवर निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर अंतिम फेरीत पाकिस्तानला १-० अशी धूळ चारून सलग सहाव्यांदा ऑलिम्पिक सुवर्णपदकावर कब्जा केला.

१९६० च्या रोम ऑलिम्पिकमध्ये तब्बल सहा गोल नोंदवणाऱ्या भोला यांनी डेन्मार्कविरुद्ध हॅट्ट्रिक साजरी केली. अंतिम फेरीत पाकिस्तानने सुरुवातीलाच १-० अशी आघाडी घेतल्यानंतर भारताने बरोबरी साधण्यासाठी जिवाचे रान केले. अखेरची चार मिनिटे शिल्लक असताना उजव्या बाजूने आगेकूच करीत पाकिस्तानच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारणाऱ्या भोला यांनी डाव्या हाताने मारलेला फटका अवघ्या सहा इंचांनी गोलजाळ्याच्या बाजूने गेला आणि भारताला पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. निवृत्तीनंतर जवळपास नऊ वर्षे राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष, पाच वर्षे आंतरराष्ट्रीय पंच, भारताच्या अनेक आंतरराष्ट्रीय दौऱ्यांमध्ये व्यवस्थापक तसेच ९० च्या दशकापर्यंत सरकारी निरीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतरही त्यांनी स्वखर्चाने हॉकीच्या कार्यशाळा आणि परिसंवाद आयोजित केले. अशा महान हॉकीपटूची कामगिरी युवा खेळाडूंसाठी नक्कीच प्रोत्साहन देत राहील.