इंदिरा गांधी यांना ४ ऑक्टोबर १९७७ रोजी संध्याकाळी अटक झाली, तेव्हा माजी पंतप्रधान असलेल्या श्रीमती गांधींनी ‘बेडय़ा कुठे आहेत.. मी बेडय़ांशिवाय तुमच्यासह कोठडीत येणार नाही’ असा जणू हट्टच धरला होता, हे आजवर श्रीमती गांधींच्या अनेक चरित्रकारांनी लिहिले आहे.. अटक करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांना बेडय़ांविनाच बाहेर काढले, हेही सहसा पुढे सांगितले जाते. अटकेचे हे कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव व्ही आर लक्ष्मीनारायणन होते आणि ते भारतीय पोलीस सेवेतील ज्येष्ठ अधिकारी होते, हा तपशील मात्र अनेक पुस्तकांत नसतो..

‘व्हीआरएल’ म्हणून ओळखले जाणारे हे आयपीएस अधिकारी, व्ही आर लक्ष्मीनारायणन, आणीबाणीचा ४४ वा ‘वर्धापनदिन’ साजरा होण्याच्या दोनच दिवस आधी- २३ जून रोजी चेन्नईत निवर्तले. केवळ गांधी यांना अटक एवढेच त्यांचे कर्तृत्व नव्हते. भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी म्हणून एक मोठा काळ त्यांनी पाहिला होता. स्वभावातील ऋ जुता आणि कर्तव्यातील कठोरपणा यांचे अचूक मिश्रण असणारे ज्युलिओ रिबेरोंसारखे अधिकारी देशाने पाहिले आहेत, त्याच मांदियाळीतील व्हीआरएल हे एक होते. त्यांची आणखी एक ओळख म्हणजे, जून १९७५ मध्ये इंदिरा गांधी यांच्या तात्काळ पदमुक्तीचा आदेश न देणारे न्यायमूर्ती व्ही. आर. कृष्णा अय्यर हे ‘व्हीएलआर यांचे सख्खे बंधू!

‘केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) अतिरिक्त संचालक’ हे पद अलीकडे वादग्रस्त झाले असले, तरी त्या पदावर असताना व्हीआरएल यांनी इंदिरा गांधी यांच्या अटकेची कारवाई केली होती. ‘ज्या हातांनी तुमच्याकडून मी माझ्या कामगिरीसाठी पदके स्वीकारली, त्याच हातांनी तुम्हाला बेडय़ा घालणे प्रशस्त नव्हे..’ वगैरे सांगून व्हीआरएल यांनी श्रीमती गांधींचा बेडय़ांचा हट्ट शिताफीने फेटाळला होता. व्हीआरएल हे कायद्याचे शिक्षण पूर्ण करून, वकिली करीत असताना १९५१ मध्ये आयपीएस या सेवेत समाविष्ट झाले. पुढेही कायद्याचे ज्ञान त्यांना उपयोगी पडले. विशेषत: फौजदारी कायद्याचे ते गाढे अभ्यासक समजले जात. तमिळनाडू केडरमध्ये असताना ते दिल्लीत ‘विशेष गुन्हे शाखे’मध्ये प्रतिनियुक्तीवर गेले. मात्र एम. जी. रामचंद्रन यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री झाल्यावर, व्हीआरएल यांना राज्याचे पोलीस महासंचालकपद दिले होते.

निवृत्तीनंतरच्या आयुष्यात राजकारणाशी त्यांनी कमीत कमी संबंध ठेवला. मात्र वकील, पोलीस अधिकारी यांच्या संगतीत ते रमत. अनेकजण त्यांचा सल्लाही घेत. ‘निवृत्तिवेतन मला त्या वेळी मिळणाऱ्या वेतनापेक्षा अधिकच आहे’ म्हणून अनेक संस्थांना देणग्याही व्हीआरएल यांनी दिल्या.