28 February 2021

News Flash

डॉ. जी.सतीश रेड्डी

संरक्षण संशोधन व विज्ञान क्षेत्रात डॉ. रेड्डी यांचे नाव कुणालाच अपरिचित नाही.

देशाच्या संरक्षणसिद्धतेशी निगडित असलेली संरक्षण संशोधन व विकास संस्था ही देशातील एक नामांकित संस्था. माजी राष्ट्रपती व वैज्ञानिक ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासह अनेकांनी ती घडवण्यात मोठे योगदान दिले आहे. लष्करी संशोधन व विकास ही उद्दिष्टे साध्य करणाऱ्या या संस्थेच्या प्रमुखपदी नुकतीच ‘रॉकेटमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेले वैज्ञानिक डॉ. जी. सतीश रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता ते आधीचे अध्यक्ष एस. ख्रिस्तोफर यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील. त्यांचा कार्यकाल दोन वर्षांचा राहणार असल्याने अल्पावधीत त्यांना नेतृत्वाचा ठसा उमटवण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.

संरक्षण संशोधन व विज्ञान क्षेत्रात डॉ. रेड्डी यांचे नाव कुणालाच अपरिचित नाही. देशाचा क्षेपणास्त्र कार्यक्रम पुढे नेण्यात ज्यांनी आतापर्यंत मोठी कामगिरी केली त्यात त्यांचा समावेश आहे. डॉ. रेड्डी यांचा जन्म आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्य़ात महिमलारू येथे झाला. ते जवाहरलाल नेहरू तंत्रज्ञान विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून तेथून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकीत पदवी घेतली. दिशादर्शन विज्ञानात त्यांची तज्ज्ञता असून भारतीय क्षेपणास्त्र प्रणालीत त्यांनी अग्नि ५ या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीत मोठी भूमिका पार पाडली होती. सध्या ते ए.पी.जे. अब्दुल कलाम क्षेपणास्त्र संकुलाचे नेतृत्व करीत होते. संरक्षण संशोधन व विकास प्रयोगशाळेचे ते संचालक होते. क्षेपणास्त्रांसाठी वेगवेगळ्या प्रणाली विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमातही रेड्डी यांचा मोठा वाटा होता. त्याच वेळी त्यांची संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून नेमणूक झाली होती व यापुढेही ते पद त्यांच्याकडे राहणारच आहे. लंडनच्या रॉयल इन्स्टिटय़ूट ऑफ नॅव्हिगेशन या संस्थेची फेलोशिप मिळालेले ते देशातील पहिले संरक्षण वैज्ञानिक आहेत. त्याच संस्थेचे रजतपदक त्यांना २०१५ मध्ये मिळाले होते. इंडियन नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ इंजिनीयरिंग, कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया, एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया, इन्स्टिटय़ूशन ऑफ इंजिनीयरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी (ब्रिटन), अमेरिकन इन्स्टिटय़ूट ऑफ एरोनॉटिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोनॉटिक्स या संस्थांचे ते मानद सदस्य आहेत.

आयईआय (इंडिया) आयईईई (यूएसए) या संस्थांचा संयुक्त पुरस्कारही त्यांना अभियांत्रिकीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात आला होता. होमी भाभा स्मृती पुरस्कार, विश्वेश्वरय्या पुरस्कार, असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले आहेत. मध्यंतरी क्षेपणास्त्रनिर्मिती कार्यक्रमात काहीशी शिथिलता आली होती, ती दूर करण्यावर ते जास्त भर देतील अशी अपेक्षा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 2:26 am

Web Title: g satheesh reddy
Next Stories
1 एस. के. अरोरा
2 नील सायमन
3 जॉन मॅक्केन
Just Now!
X