चीन व अमेरिका हे दोन्ही देश सध्या आपापल्या महत्त्वाकांक्षांमुळे व्यापारयुद्धात उतरले आहेत. नेमक्या अशा वेळी आय. एम. पेइ निवर्तले. मानवी महत्त्वाकांक्षेची कमान पैसा, सत्ता यांच्या पल्याड, अगदी ‘राष्ट्रहिता’च्याही पार जायला हवी.. हे जगास दाखवून देणारी सुमारे पाऊणशे वर्षांची कारकीर्द पेइ यांनी केली.. ते वास्तुरचनाकार होते आणि योगायोग म्हणजे, ते ‘चिनी-अमेरिकन’होते!

चीनच्या ग्वांग्झू प्रांतात १९१७ साली जन्मलेले इयो मिंङ् पेइ हे वयाच्या १७व्या वर्षी अमेरिकेत शिकण्यासाठी आले. वास्तुरचनेचे शिक्षण त्यांनी ‘एमआयटी’तून (मॅसाच्युसेट्स इन्स्टिटय़ूट  ऑफ टेक्नॉलॉजी) घेतले आणि दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीनंतर, म्हणजे तिशी गाठता-गाठता त्यांची कारकीर्द बहरू लागली. सुरुवातीला त्यांनी बांधलेल्या इमारती केवळ तांत्रिकदृष्टय़ा सरस होत्या, पण पुढे तंत्रावर इतकी हुकमत आली की त्याला हवे तसे वाकवणे हीच त्यांची खासियत ठरली. अनेक वास्तुरचनाकार हे त्यांच्या बहुतेक इमारतींचे दृश्यरूप कसे एकजिनसी दिसते, त्यांतून त्या-त्या वास्तुरचनाकाराचे दृश्यभान कसे प्रतीत होते, यासाठी नावाजले जातात. पण मनाने ‘विश्वनागरिक’ असलेल्या पेइ यांचे दृश्यभान एकजिनसीपणात मावणारे नव्हतेच! त्या-त्या वास्तूच्या सांस्कृतिक पर्यावरणाला गोंजारत आणि काहीसे धक्के देत त्यांची रचना उलगडत जाई. या शैलीत धक्क्यांचे प्रमाण जरा जास्तच झाल्याची प्रतिक्रिया (लोकांकडून) आली, ती १९८० च्या दशकाअखेरीस ‘लूव्र म्युझियम’च्या आवारात पेइ यांनी काचेचे पिरॅमिड साकारले तेव्हा! हे पिरॅमिड आज लोकांनी स्वीकारले आहेतच, शिवाय या काचेच्या पिरॅमिडखाली तिकिटे, स्मृतिवस्तू आदी विकत मिळतात. अमेरिकेत क्लीव्हलँडच्या ‘रॉक अँड रोल हॉल ऑफ फेम’च्या आवारातही असाच काचेरी पिरॅमिड त्यांनी उभारला. पण त्यापेक्षा तेथील गोल रचनेची प्रशंसा अधिक झाली. अलीकडे (२००९) ‘मकाउ सायन्स सेंटर’ची नरसाळ्याच्या आकारातील इमारत आणि त्याभोवती फेर धरणारी वर्तुळाकार वाट अशी रचना त्यांनी केली. ‘बँक ऑफ चायना’च्या हाँगकाँगमधील मुख्यालय इमारतीवरील फुल्या असोत की सिंगापूरच्या ‘द गेटवे’ या व्यावसायिक इमारतद्वयीचा आकार भरीव न दिसता निमुळताच दिसेल अशी खुबी.. रूढ कल्पनांना जरासा धक्का, हे वैशिष्टय़ त्यांनी अनेक रचनांमध्ये पाळले. मात्र खऱ्या अर्थाने ते रमले संग्रहालयांची रचना करण्यात! केनेडी सेंटर लायब्ररी, क्लीओ रॉजर्स लायब्ररी, कॉर्नेल आणि इंडियाना विद्यापीठांतील कलासंग्रहालये, क्योटो (जपान) येथील टेकडीवरले मिहो म्युझियम, बर्लिनचे जर्मन इतिहास संग्रहालय, अशा अनेक वास्तू त्यांच्या आहेत.

दोहा (कतार) येथील म्युझियम ऑफ इस्लामिक आर्ट या त्यांच्या २००८ मधील रचनेबद्दल, ‘हे ढाका येथील बांग्लादेशी संसदेच्या लुई कान्ह यांनी केलेल्या रचनेवर आधारित वाटते’ अशी टीका झाली. मात्र, कान्ह यांचा प्रभाव मान्य करूनही पेइ यांनी पाण्यातले हे संग्रहालय चारही बाजूंनी नेत्रसुख देणारे बांधले आहे!