X
X

लेफ्ट. कमांडर वर्तिका जोशी

READ IN APP

भारतीय नौदल हे नेहमीच साहसाची साथ करीत आले आहे.

भारतीय नौदल हे नेहमीच साहसाची साथ करीत आले आहे. उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, माऊंट एव्हरेस्टवर नौदलाच्या मोहिमांनी नव्या यशोगाथा लिहिल्या आहेत. रविवारी भारतीय नौदलातील महिलांची अशीच एक साहसी मोहीम पणजीतून जगाच्या सफरीवर मार्गस्थ झाली तो क्षण इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा असाच. या मोहिमेत सर्व महिला अधिकारी आहेत. या मोहिमेची तयारी त्यांनी बरीच आधीपासून सुरू केली होती. नाविक सागर परिक्रमा या मोहिमेचे सारथ्य करीत आहेत लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी.

आयएनएसव्ही तारिणी या देशी बनावटीच्या बोटीतून या सहा जणी निघाल्या तेव्हा त्यांना पाठीवर थाप देण्यास संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होत्या, त्यामुळेही या सहा जणींना या साहसासाठी आणखी ताकद मिळाली असणार हे नक्की. एकूण १६५ दिवसांच्या या प्रवासात तारिणी बोट फ्रेमँटल (ऑस्ट्रेलिया), लिटलटन (न्यूझीलंड), पोर्ट स्टॅनले (फॉकलंड), केप टाऊन (दक्षिण आफ्रिका) या ठिकाणांना  भेट देणार आहे. यापूर्वी ठाण्यात एसएचएम शिपकेअर येथे झालेल्या कार्यक्रमात या  मोहिमेचे सारथ्य करणाऱ्या लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले नसते तरच नवल. त्या उत्तराखंडमधील गढवालच्या पर्वतीय प्रदेशात जन्मलेल्या, त्यामुळे साहस म्हणजे काय हे वेगळे शिकवायची गरजच नव्हती.  त्यांचे बालपण हृषीकेश येथे गेले. पण नंतर त्यांच्या शिक्षक असलेल्या आई-वडिलांच्या कामानिमित्ताने बदल्या झाल्या. एअरोस्पेस अभियांत्रिकीत त्यांनी शिक्षण घेतले पण त्यात पदव्युत्तर पदवी म्हणजे ‘मास्टर्स’शिवाय फार कमी वाव असतो. त्यामुळे वर्तिका यांनी महाविद्यालयात जाऊन सेवा निवड मंडळाच्या मार्फत या अभ्यासक्रमासाठी प्रयत्न केले व त्यात त्यांची निवड झाली. त्यांनी ‘नेव्हल कन्स्ट्रक्शन’ हा विषय निवडला.  दिल्ली आयआयटीतून त्यांनी एमटेक पदवी घेतली आहे. २०१० मध्ये वर्तिका या नौदलात आल्या, पण महिला म्हणून नव्हे. नौदलात महिला व पुरुष असे काही नसते. २०१२ मध्ये वर्तिका यांची नेमणूक विशाखापट्टणम येथे झाली. त्या तिथे ‘कन्स्ट्रक्टर’ म्हणून काम करीत होत्या. नौदलाने त्या वेळी महिलांना सागरात पाठवण्याचा विचारही सुरू केला नव्हता तेव्हाचा हा काळ.

२०१३ मध्ये मात्र महिलांच्या प्रवेशाची चिन्हे दिसू लागली. कमांडर अभिलाष टॉमी यांनी आयएनएस म्हादेईमधून जगप्रदक्षिणा केल्यानंतर महिलांचा चमू जगप्रवासासाठी पाठवण्याची कल्पना पुढे आली होती. महिलांची मोहीम ठरली तेव्हापासून वर्तिका या स्वेच्छेने पुढे आल्या. याच संधीची मी वाट पाहत होते, असे त्या सांगतात. मग सराव मोहिमा सुरू झाल्या. त्यात भारतीय द्वीपकल्प प्रदक्षिणेत वर्तिका सहभागी झाल्या. या मोहिमांतून वर्तिका व त्यांच्या चमूचा आत्मविश्वास वाढला. वर्तिका यांना रिओ डी जानिरो ते केपटाऊन या पाच हजार नाविक मैल सागरी प्रवासाचा मोठा अनुभव आहे.

२०१५ मध्ये अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते तेव्हा नौदल तुकडीच्या संचलनाचे नेतृत्व वर्तिका यांनी केले होते. वर्तिका यांच्या आई-वडिलांनी सागर कधी बघितला नव्हता त्यामुळे आपल्या मुलीच्या साहसाची त्यांना फारशी कल्पना नसली तरी त्यांना सागराच्या रौद्र रूपाच्या कहाण्या ज्ञात होत्या. एकदा वर्तिका यांनी आई-वडिलांना मॉरिशसला बोलावून बोटीची साहसी सफर घडवली. त्यात  वडिलांना तर ती जे काही करते आहे ते मनापासून पटले, पण आईच्या मनात काहीशी भीती कायम होती. आता जेव्हा वर्तिका या जगप्रदक्षिणेचे सारथ्य करीत आहे तेव्हा मात्र या माता-पित्यांना  भरून आले असेल..

22
X