अमेरिका हा देश बाहेरून आलेल्या बुद्धिमत्तेला किती संधी देतो (किंवा देई) याचं ठसठशीत उदाहरण म्हणजे जिल केर कॉन्वे. ऑस्ट्रेलियातून आलेल्या जिल, अमेरिकेतल्या स्मिथ कॉलेजच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष (कुलगुरूंच्या समकक्ष पद) झाल्या. ही अमेरिकेतली महिलांना कला शिक्षण देणारी सगळ्यात मोठी संस्था. शतकभर जुनी, पण इथलं अध्यापन-व्यवस्थापन पुरुषांहाती. इतिहासात डॉक्टरेट मिळवलेल्या जिल केर कॉन्वे यांनी अशा संस्थेत सर्वोच्च पदावर काम करताना ही मक्तेदारी मोडून काढत स्त्रियांना अनेक दारं खुली करून दिली. आपल्या कारकीर्दीत त्यांनी तिथं अनेक बदल घडवून आणले.

अमेरिकन कौन्सिल ऑफ एज्युकेशनने २०१७ मध्ये केलेल्या पाहणीनुसार कॉलेज आणि विद्यापीठांत स्त्रियांना फक्त ३० टक्के उच्च पातळीवरच्या संधी मिळतात. या पाश्र्वभूमीवर जिल यांच्या कारकीर्दीचं महत्त्व लक्षात येतं. पण महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मिळालेली संधी आपल्यापुरतीच उपभोगून त्या थांबल्या नाहीत तर वरिष्ठ पातळीवर स्त्रियांना संधी मिळाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या सगळ्याची बीजं त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात दिसतात. सिडनी विद्यापीठात शिक्षण झाल्यानंतर त्या ऑस्ट्रेलियन परराष्ट्र सेवेत नोकरी शोधत होत्या. तेव्हा त्यांच्याबाबतचे शेरे असायचे, ‘दिसायला अतिशय सुंदर’, ‘बौद्धिकदृष्टय़ा अतिशय आक्रमक’, ‘वर्षभरात लग्न होईल’. त्यामुळेच राजनीती, कायदे, शास्त्र, कला तसंच फक्त पुरुषांची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रांमध्ये स्त्रियांना वाव मिळावा यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. स्त्रियांसाठीचं उच्च शिक्षण बाहेरच्या व्यावसायिक क्षेत्रांच्या गरजांशी जोडलं गेलेलं नव्हतं. ते जोडण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं. स्मिथमध्ये अनेक विषयांसाठी पुरुष प्राध्यापकांचीच संख्या एकतृतीयांश होती. याकडे लक्ष वेधून त्यांनी स्त्रियांचा सहभाग वाढवण्यासाठी धोरणात्मक बदल केले. १९८५ मध्ये स्मिथमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी नायकी, मेरिल लिंच, कोलगेट पामोलिव्ह, लेंडलीज अशा बडय़ा कंपन्यांच्या संचालक मंडळावर लक्षणीय काम केलं. याच काळात त्यांच्या आत्मचरित्राचे तीन खंड प्रकाशित झाले. अमेरिकी एमआयटी (मसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी)मध्ये त्या अभ्यागत प्राध्यापक होत्या. तिथं त्यांनी पर्यावरणाच्या प्रश्नांवर तसंच बेघरांना स्वस्त दरात घरं दिली जावीत यासाठी काम केलं.

ऑस्ट्रेलियातील ‘कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा सर्वोच्च सन्मान (२०१३) आणि अमेरिकी सरकारतर्फे ‘नॅशनल ह्य़ुमॅनिटीज मेडल’ असे मान त्यांना मिळाले. अमेरिकी समाजात व्यावसायिक पातळीवर स्त्रियांचं स्थान अधोरेखित करणाऱ्या जिल अलीकडेच- १ जून रोजी निवर्तल्या.