जॉन मॅक्केन हे अमेरिकेच्या राजकारणातील एक वेगळे रसायन होते. त्यामुळेच त्यांच्या जाण्याने तेथील लोकशाही मूल्यांचा खंदा पुरस्कर्ता, लढवय्या राजकारणी गेल्याचे शल्य कुणालाही वाटल्यावाचून राहणार नाही. जॉन मॅक्केन यांची अ‍ॅरिझोनातून पहिल्यांदा १९८६ मध्ये सिनेटर म्हणून निवड झाली. शेवटपर्यंत ते सिनेटर होते इतका लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास होता. २००८ मध्ये अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा बराक ओबामा यांनी पराभव केला होता. जय-पराजय हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नव्हते. प्रसंगी स्वपक्षाच्या विरोधात जाऊन मते मांडली. हे करण्यासाठी जे धाडस लागते ते त्यांच्याकडे होते, त्यामुळेच अमेरिकी राजकारणाची सुसंस्कृत परंपरा त्यांनी आणखी उंचीवर नेऊन ठेवली होती.

त्यांची कारकीर्दही नौदलातूनच सुरू झाली. अमेरिकेच्या प्रभावशाली सिनेटर्सपैकी एक असलेले मॅक्केन हे भारतमित्र होते. त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या २०१६ मधील अमेरिका भेटीवेळी सीएनएनसाठी लिहिलेल्या संपादकीयात एरवी मोजक्या मित्रदेशांना जवळ करणाऱ्या अमेरिकेने भारताला वेगळे स्थान दिल्याचे कौतुक केले होते. व्हिएतनाम युद्धात त्यांचे विमान पाडण्यात आले व नंतर त्यांना कैद करून छळ करण्यात आला. पाच वर्षे ते व्हिएतनाममध्ये तुरुंगात होते, ओबामा यांच्याविरोधातील लढतीच्या वेळी एका महिलेने प्रचाराच्या वेळी ओबामा हे ‘अरब’ आहेत, असे म्हटले होते, त्या वेळी त्यांनी तिच्या हातातला ध्वनिक्षेपक घेऊन ते अतिशय सभ्य, पण काही मूलभूत मुद्दय़ांवर आमच्या पक्षाशी मतभेद असलेले अमेरिकी नागरिक असल्याचे सांगितले होते. ओबामा यांच्या विजयानंतर त्याचे ऐतिहासिक महत्त्व समर्थकांसमोर सांगण्याची दिलदारीही त्यांच्याकडे होती. रिपब्लिकन पक्षाने ओबामा हेल्थकेअर रद्द करण्यासाठी खूप प्रयत्न केल्यानंतरही मॅक्केन यांनी मात्र स्वपक्षाविरोधात मतदान केले होते. मॅक्केन यांनी ट्रम्प यांना कसून विरोध केला होता, कारण त्यांचा अर्धवटपणाचा राष्ट्रवादी बाणा त्यांना कधीच पसंत नव्हता. ट्रम्प यांना तर ते काटय़ासारखे न सलते तरच नवल. मॅक्केन यांनी ट्रम्प यांच्या स्थलांतर धोरणाला विरोध क रताना चुकीच्या धोरणांनी अमेरिका महान होणार नाही हे ठणकावून सांगितले होते. मृत्यू कोणाला टळत नसतो. जीवनात महत्त्वाची असते ती सभ्यता व चारित्र्य, त्यामुळेच आपण सुखी किंवा दु:खी बनतो, असे त्यांनीच एका पुस्तकात म्हटले आहे. गेल्या उन्हाळ्यातच त्यांना मेंदूचा कर्करोग झाल्याचे निदान झाले, पण तरी ते खचले नाहीत. त्यांच्या रूपाने सत्यवचनी राजकारणी व रोनाल्ड रेगन यांच्या राजकीय क्रांतीचा पाईक असलेला निष्ठावान रिपब्लिकन नेता गमावला आहे.