अमेरिकी समाजमाध्यमांमध्ये किंवा समाजमानसात ‘#ऑस्करसोव्हाइट’सारखी, प्रथम सुप्त आणि नंतर व्यक्त प्रतिक्रियात्मक चळवळ सुरू होण्याच्या किती तरी वर्षे आधी जॉन सिंगल्टन या आफ्रिकन अमेरिकन दिग्दर्शकाला ऑस्कर नामांकन मिळाले होते. त्या वेळी त्यांचे वय होते अवघे २४ वर्षे. केवळ पहिला आफ्रिकन अमेरिकन नव्हे, तर ऑस्कर नामांकन मिळणारा सर्वात तरुण दिग्दर्शक हा मानही त्यांना त्या वेळी मिळाला होता. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचे नाव होते ‘बॉय्झ इन द हूड’. पण विशेष म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे नामांकन त्या चित्रपटाला नव्हते. ते तसे मिळायला काहीच हरकत नव्हती, कारण जवळपास पाव शतकापूर्वी म्हणजे १९९२ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट अनेक अर्थानी पथदर्शी ठरला होता. ‘बॉय्झ इन द हूड’ दक्षिण कॅलिफोर्नियातील आफ्रिकन अमेरिकन तरुणांची कथा. टगेगिरी करत भटकायचे आणि कृष्णवर्णीयांविरोधात होत असलेल्या अन्यायाचे स्वयंघोषित प्रतीक म्हणून मिरवायचे हा त्यांचा आवडता उद्योग. पण सिंगल्टन यांच्या या चित्रपटातला एक जण वेगळा ठरतो. ‘भटकू नका, भरकटू नका, त्यापेक्षा शिका’ असा संदेश हा चित्रपट प्रवचनीपणाकडे जराही न झुकता देऊन जातो. त्याच्याही पलीकडे जाऊन, आफ्रिकन अमेरिकन समाजावरील चित्रपटाची नवी दृष्टी देतो.

‘बॉय्झ इन द हूड’ने अनेक युवा आफ्रिकन अमेरिकन अभिनेत्यांच्या कारकीर्दीला वेगळे वळण दिले. क्युबा गुडिंग ज्युनियर, आइस क्यूब हे अभिनेते आजही सिंगल्टन यांच्या ऋणातून मुक्त व्हायला तयार नाहीत. सिंगल्टन यांचे सुरुवातीच्या यशानंतरचे चित्रपट होते ‘पोएटिक जस्टिस’, ‘हायर एज्युकेशन’ आणि ‘रोझवूड’. ‘पोएटिक जस्टिस’द्वारे सिंगल्टन यांनी पडद्यावरील आफ्रिकन अमेरिकनांची साचेबद्ध प्रतिमा चौकट मोडून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. पण त्यांच्या प्रयत्नांना पुरेसे व्यावसायिक यश लाभले नाही. याविषयी सिंगल्टन यांनी एका मुलाखतीत खेद व्यक्त केला होता. विशिष्ट जातकुळीचा चित्रपट तुम्ही बनवलात, की तुम्ही वेगळे काही बनवू शकता यावर हॉलीवूडमधली स्टुडिओ संस्कृती विश्वास ठेवत नाही, असे ते म्हणाले होते. पुढे ‘टू फास्ट टू फ्युरियस’, ‘शाफ्ट’सारखे शैलीदार चित्रपट त्यांनी बनवले. काही दूरचित्रवाणी मालिका बनवल्या. पण ‘बॉय्झ..’ची उंची त्यांना पुन्हा गाठता आली नाही.

अल्पवयात कारकीर्दीची सुरुवात केलेले जॉन सिंगल्टन प्रत्यक्ष जीवनात अल्पायुषी ठरले. पक्षाघाताच्या तीव्र झटक्यानंतर ५१व्या वर्षी त्यांचे नुकतेच निधन झाले.  त्यापूर्वी ‘#ऑस्करसोव्हाइट’ या बंडाची बीजे रोवण्याचे सत्कार्य त्यांच्याकडून अनाहूतपणे घडले हे नाकारता येत नाही.