गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये यंदा पहिल्यांदाच लौकिकार्थाने एका जागतिक पुरस्काराची घोषणा झाली. यात कौशिक गांगुली यांची ‘सिनेमावाला’ ही बंगाली फिल्म पारितोषिक विजेती ठरली, ही बातमी वेगळ्या प्रकारे सांगायची झाली, तर या पुरस्काराच्या स्पर्धेत असलेला ‘कटय़ार काळजात घुसली’ हा मराठी चित्रपट ( ‘ऐन’ आणि ‘वलिय चिरकुळ पक्षिकळ’ या दोन मल्याळम् चित्रपटांसकट) बाद ठरला.
इटालियन दिग्दर्शक फेड्रिको फेलिनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९९५पासून युनोस्कोच्या वतीने पॅरिसमधील आंतरराष्ट्रीय चित्रपट परिषद आणि दृक्श्राव्य संज्ञापन यांच्या वतीने चित्रभाषेतील कलागुणांना गौरविण्यासाठी या पुरस्काराची निर्मिती करण्यात आली असून, कान चित्रपट महोत्सवात त्याची घोषणा केली जात असे. गोव्यातील भारतीय महोत्सवाला लाभलेल्या वलयानुसार यंदा पहिल्यांदाच या पुरस्काराची घोषणा भारतात करण्यात आली. पहिला मान पटकावल्यानंतरच्या मुलाखतीत कौशिक गांगुली यांनी हा सन्मान केवळ बंगाली सिनेमाचा नसून भारताचा असल्याचे सांगत आपल्या मोठय़ा मनाचे प्रशस्तिपत्रक दिले. अभिनेते, पटकथाकार आणि दिग्दर्शक अशी तिहेरी जबाबदारी पाडून सिनेमा बनविण्याच्या फंदात पडणाऱ्या कौशिक गांगुली यांची एक तपामध्ये १६ सिनेमा इतकी घोडदौड पाहिली, तर आश्चर्य वाटू शकते. तंत्रज्ञानामुळे भारतातील छोटय़ा राज्यांतूनही देखणा- चकचकीत सिनेमा हल्ली तयार होत आहे. पण सिनेमाच्या कलात्मकतेचा घटक आणि सांगायच्या गोष्टीतील परिणामकारकता यांचा ताळमेळ घालणे फार थोडय़ांनाच जमते.
स्त्री समलैंगित्व आणि लिंगपरिवर्तनाच्या विषयाला गंभीरपणे आपल्या सिनेमांमध्ये मांडणाऱ्या कौशिक गांगुली यांचे सिनेमे जागतिकीकरणानंतरच्या बंगालचे रूप दाखवितात. (ईटीव्ही बांगलासाठी त्यांनी केलेल्या टेलिफिल्म्स यूटय़ुबवरही पाहता येऊ शकतात.) ‘सिनेमावाला’ या पुरस्कार-विजेत्या चित्रपटात त्यांनी बंगालमध्ये आजघडीला सुरू असलेल्या सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या दुरवस्थेवर लक्ष्य केंद्रित केले आहे. त्यामुळे त्यांना मिळालेला पुरस्कार यथोचितच म्हणावा लागेल. भारतीय प्रादेशिक सिनेमात ठळकपणा दाखविणारा मराठी सिनेमा या पुरस्कारासाठी मागे पडला.
चित्रपटातील केवळ सौंदर्यश्रीमंती जागतिक निकषांवर खरी ठरत नाही, हे जेव्हा आपल्या चित्रकर्त्यांना स्पष्ट होईल, तेव्हा फेलिनी पुरस्कारांची मराठीत गर्दी होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kaushik ganguly profile
First published on: 03-12-2015 at 00:36 IST