पंजाबी रंगमंचावर गेली सुमारे चार दशके कार्यरत असणारे केवल धालीवाल हे आता ‘बलवंत गार्गी पुरस्कारा’चे मानकरी ठरले आहेत. पंजाब विद्यापीठात नाटय़शास्त्र विभागाची स्थापना करून किरण व अनुपम खेर यांच्यापासून पूनम धिल्लाँपर्यंत अनेकांना शिकवणारे- त्याही आधी ‘आधुनिक पंजाबी रंगमंचाचे आधारस्तंभ’ ठरलेले गार्गी (१९१६-२००३) यांच्या स्मृत्यर्थ कॅनडातील पंजाबी-भाषकांच्या संस्थेतर्फे हा पुरस्कार दिला जातो. धालीवाल यांना ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ २०१३ सालीच मिळालेला असल्याने त्यानंतरचे हे पुरस्कार कमी महत्त्वाचे खरे; पण धालीवाल यांच्यासाठी गार्गीच्या नावाचा पुरस्कार जिव्हाळय़ाचा आहे, तसेच अन्य पुरस्कारदेखील ‘नवी माणसे जोडण्याची संधी’ म्हणून ते स्वीकारत.

माणसे जोडण्याचे हे काम धालीवाल गेली अनेक वर्षे करीत आले आहेत. अमृतसरमध्ये ७ ऑक्टोबर १९६४ रोजी जन्मलेल्या धालीवाल यांनी वयाच्या १५-१६ व्या वर्षांपासूनच रंगमंचावर काम सुरू केले, तेव्हा त्यांचे गुरू होते भाजी (भाईजी) गुरशरण सिंग. माणसे जोडण्याची कलादेखील केवल यांना भाजींकडून शिकायला मिळाली. भाजी हे भाक्रा-नांगल धरण प्रकल्पावरचे अभियंता. त्यांनी नांगल येथे एक रंगमंचही बांधला आणि तेथे स्वतच नाटय़प्रयोग करणे सुरू केले. मात्र पंजाबी रंगमंचावरची एक पिढी त्यांनी घडवली! केवल धालीवाल हेही त्याच पिढीतले. अधिकच नाटय़वेडे. त्यामुळे ‘भाजी’ आणि गार्गी या गुरूंकडे न थांबता, दिल्लीच्या ‘राष्ट्रीय नाटय़ विद्यालया’त प्रवेश घेऊन तेथून स्नातक होऊन ते अमृतसरला परतले. तेव्हापासून आजवर, शंभरहून अधिक नाटके त्यांनी रंगमंचावर आणली आहेत. या नाटकांत कबीर आहे, सआदत हसन मण्टो आहे, ‘दास्ताँ-ए-गुरशरण’ हे भाजींना रंगमंचीय आदरांजली आहे.. गिरीश कर्नाडांचे ‘तुघलक’ आहे.. पथनाटय़े आहेत.. पंजाबच्या लोककलांचा वापर आजचा राजकीय-सामाजिक आशय सांगणाऱ्या नाटकांत कसा करायचा याचे वस्तुपाठ आहेत.. आणि बालनाटय़ेही आहेत! इतकी की, त्यामुळे केवल धालीवाल यांना पंजाबीतील एक बालसाहित्यकार पुरस्कारही मिळाला आहे.

ही सारी नाटके ‘मंच रंगमंच’ या स्वतच स्थापलेल्या संस्थेतर्फे धालीवाल यांनी लोकांसमोर आणली. अन्य पंजाबी नाटय़संस्थांशीही संपर्क कायम ठेवून असणारे धालीवाल पंजाबी संगीत-नाटक अकादमीचे अध्यक्षही होते. त्यांनी त्या सार्वजनिक पदाचा वापर पंजाबच्या जिल्ह्या-जिल्ह्यांपर्यंत आजचे नाटक पोहोचवण्यासाठी करून घेतला. मात्र धालीवाल यांचे खरे योगदान म्हणजे ‘वीरसा विहार’ या संस्थेची उभारणी! अमृतसरमध्ये धालीवाल यांच्या पुढाकाराने साकार झालेल्या या प्रांगणात तालमींपासून प्रयोगांपर्यंत, नाटकाची सर्व रूपे घडू शकतात. नाटकाखेरीज नृत्याचे आणि संगीताचे वर्ग तसेच कार्यशाळा चालतात. या कार्यशाळेत सीमेपारच्या पंजाबातून- लाहोरहूनदेखील २००४ सालापासूनच दरवर्षी चार-पाच युवा अभिनेत्यांचा सहभाग धालीवाल यांच्या कार्यशाळांत असतो. धालीवाल यांना कॅनडातील पंजाबी-भाषकांकडून मिळालेला पुरस्कार हा त्यांचे काम दुसऱ्या खंडात पोहोचवणारा ठरणार आहे.