27 October 2020

News Flash

अ. र. कुलकर्णी

मराठी विश्वकोशाच्या खंडांचे महत्त्व आजच्या पिढीला कळले आहे.

मराठी विश्वकोशाच्या खंडांचे महत्त्व आजच्या पिढीला कळले आहे. एखादी माहिती अचूक आणि विश्वासार्हतेच्या कसोटीला उतरणारी हवी असेल तर मग विश्वकोशाचे खंडच पाहावे लागतात. विश्वकोशाच्या पहिल्या खंडापासून ते विसाव्या खंडापर्यंत ज्यांनी यात योगदान दिले त्यात अनिल रघुनाथ कुलकर्णी यांचाही समावेश करावा लागेल.

सदा हसतमुख, संवाद साधण्याची उत्तम कला असलेल्या कुलकर्णी यांचा जन्म २३ ऑगस्ट १९३७ चा. मित्रपरिवारात ‘अर’ याच नावाने त्यांची ओळख. मुंबईत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दादरला शिक्षक म्हणून नोकरी केली. अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. आजचे आघाडीचे अभिनेते नाना पाटेकर हे त्यांचेच विद्यार्थी. नंतर काही कारणांनी शाळेतील नोकरी सोडून ते रेल्वेत लागले. मात्र त्यात त्यांचे मन फारसे रमले नाही. मग वाईत विश्वकोशात ते रुजू झाले. त्यातून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या संपर्कात ते आले आणि वाईकरच झाले. मराठीबरोबरच जागतिक साहित्य, धर्म, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र या विषयांवर त्यांनी अभ्यासू लिखाण केले. त्यांनी विश्वकोशात शेकडो नोंदी लिहिल्या, तसेच संपादनही केले. विशेषत: वेद वाङ्मय, भाषा साहित्य आणि थोरा-मोठय़ांच्या चरित्रात्मक नोंदी आहेत. या नोंदीमधून त्यांनी त्या व्यक्तींच्या साहित्य मूल्यांबरोबरच त्यांच्या सामाजिक योगदानाचा चपखल आढावा घेतला. विश्वकोशातील त्यांच्या अनेक नोदींना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मुद्देसूद नोंदी म्हणूनही अभिप्राय दिला होता. मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक तर्कतीर्थ लक्षणशास्त्री जोशी यांच्यासह मे. पुं. रेगे, रा. ग. जाधव, डॉ. श्रीकांत जिचकार, डॉ. विजया वाड यांच्यासमवेत त्यांनी काम केले. मित्र परिवारात कथावेल्हाळ व्यक्ती म्हणूनही त्यांची ख्याती होती. कोणतेही लिखाण करीत असताना, विश्वसनीय संदर्भ शोधण्याचा त्यांचा कटाक्ष असे. त्यामुळेच त्यांचे लेखन महत्त्वाचे ठरते. अनेक वर्षे ते प्रतिष्ठेच्या अशा नवभारत मासिकाच्या संपादक मंडळावर होते. त्यामधून त्यांनी वैचारिक लिखाण केले आहे.

काही ग्रंथांचे त्यांनी संपादन केले असून, त्यापैकी रा.ना.चव्हाण यांच्या ग्रंथावरील त्यांचे संपादन तसेच वाईतील वसंत व्याख्यानमालेच्या ‘वसंतोत्सव’ या शताब्दी स्मरणिकेचे संपादन विशेष उल्लेखनीय आहे. त्यांच्या कथांपैकी काही कथा या ‘उत्तम कथा’ या संग्रहात अंतर्भूत झाल्या आहेत. नामवंत अशा दिवाळी अंकात त्यांच्या कथा नेहमी असायच्या.

आशयपूर्ण मांडणी आणि सारभूत व प्रमाणभूत विवेचन हे त्यांच्या लेखांचे वैशिष्टय़.  संवाद साधण्याची हातोटी तसेच इतरांच्या मतांचाही आदर करण्याच्या वृत्तीमुळे नवागतांना सहजपणे त्यांचे मार्गदर्शन लाभे. सॅलिटरी क्रिपर्स, ऐलतीर, पैलतीर, सांजसूर, तळ्याच्या काठी व नुकताच प्रसिद्ध झालेला कांतार हे त्यांचे प्रसिद्ध कथासंग्रह. तळ्याकाठच्या सावल्या या कथासंग्रहास  शासनाचे पारितोषिक मिळाले. वाईतील लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या कामातही त्यांनी योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने जागतिक साहित्यासह विविध विषयांत रस असलेले अभ्यासू व्यक्तिमत्त्व हरपले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2018 2:07 am

Web Title: loksatta vyakti vedh a r kulkarni
Next Stories
1 नीलम कपूर
2 मदावूर वासुदेवन नायर
3 डॉ. उषा जोशी
Just Now!
X