News Flash

अरुण शर्मा

आसामच्या तेजपूर शहरातील बान नाटय़गृहासमोरून तो मुलगा दररोज जात असे.

आसामच्या तेजपूर शहरातील बान नाटय़गृहासमोरून तो मुलगा दररोज जात असे. तेथे त्याला कायम माणसांची वर्दळ दिसे. आतमध्ये काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी तो एका दरवाजातून आत डोकावतो. एक उंचापुरा नट शहाजहान बनून आपल्या भारदस्त आवाजात नाटकातील स्वगते म्हणत असे. अनेक दिवस त्या नाटकाची तालीम बघण्यासाठी तो मुलगा जात असे. तेव्हाच त्या मुलाने बनायचे तर नाटककारच, हे मनाशी ठरवून टाकले. या घटनेनंतर १२ वर्षांनी त्यांनी ते करूनही दाखवले. तो मुलगा पुढे आसामी भाषेतील विख्यात नाटककार आणि कादंबरीकार बनला.. अरुण शर्मा हे त्यांचे नाव!

दिब्रुगढ येथे १९३५ मध्ये जन्मलेल्या अरुण यांचे वडील तिलकचंद्र शर्मा हे ‘द टाइम्स ऑफ आसाम’ या वृत्तपत्राचे संपादक होते. गांधीविचाराने भारलेल्या अरुण यांचे शालेय शिक्षण तेजपूरमध्ये झाले. नंतर ते गुवाहाटी येथील कॉटन महाविद्यालयातून बीए झाले.  महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी नाटय़लेखन सुरू केले. पदवी मिळाल्यानंतर त्यांनी वर्षभर ‘आसाम ट्रिब्यून’ येथे पत्रकारिता करून पाहिली; पण तेथे ते रमले नाहीत. ते पुन्हा आपल्या जन्मगावी आले. या काळात ‘जिंती’, ‘परशराम’, ‘पुरुष’, ‘कुकुरेनिचा मुह’ ही काही नाटके त्यांनी लिहिली. मग ‘श्री निबारन भट्टाचार्य’ हे त्यांचे नाटक आले आणि आसामी रंगभूमीवर ते तुफान चालले. त्यातील पल्लेदार भाषेतील प्रदीर्घ स्वगते ऐकण्यासाठी प्रेक्षक हे नाटक वारंवार बघत. नाटय़ क्षेत्रात त्यांचे नाव गाजू लागल्याने मग आकाशवाणीमध्ये नोकरीचे दार त्यांच्यासाठी खुले झाले. आकाशवाणीच्या सेवेत असताना शर्मा यांनी ४० हून अधिक नभोनाटय़े लिहिली.  नभोवाणी माध्यम तेव्हा लोकप्रिय असल्याने कामाचा प्रचंड ताण असायचा. या तणावाच्या काळातच माझ्याकडून लिखाण व्हायचे,  असे त्यांनी एका लेखात म्हटले आहे.

१९९० च्या दशकात एका आसामी दैनिकाने त्यांच्या पूजा विशेषांकासाठी नाटक लिहिण्याची विनंती शर्मा यांना केली. त्यांनी लिहायला सुरुवातही केली, पण पुढे ते नाटक न होता त्याची कादंबरीच झाली. ‘आसिरबादर रंग’ या नावाने ती प्रसिद्ध झाली. आसामच्या तत्कालीन ग्रामीण जीवनाचे चित्र एका व्यापक सामाजिक परिप्रेक्ष्यातून त्यांनी या कादंबरीत मांडले. समीक्षकांनी अत्यंत मर्मभेदी कादंबरी म्हणून तिचे स्वागत केले. पुढे याच कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला. आकाशवाणीच्या सेवेत ते साहाय्यक निर्माता ते संचालक पदापर्यंत पोहोचले. १७ नाटके व पाच कादंबऱ्या त्यांच्या नावावर आहेत. ‘बुरुंजीपथ’ या पुस्तकाद्वारे आणीबाणीच्या काळ्याकुट्ट पर्वाचा त्यांनी उपरोधिक शैलीत समाचार घेतला. बाल दिनानिमित्त त्यांनी लिहिलेले ‘द सेल्फिश प्रिन्स’ हे बालनाटय़ तर बीबीसी नभोवाणीवरूनही प्रसारित झाले होते. आसामी रंगभूमीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर दोनच वर्षांनी पद्मश्री किताब त्यांना बहाल करण्यात आला. पाच दशकांहून अधिक काळापासून त्यांचे लेखन सुरू असले तरी ‘‘माझी सर्वश्रेष्ठ कलाकृती अजून लिहायची आहे. ते नाटक असेल वा कदाचित कादंबरीही असू शकेल,’’ असे त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले होते. त्यासाठीची जुळवाजुळव चालू असतानाच ते आजारी पडले. बुधवारी  त्यांनी जगाचा निरोप घेतला आणि आसामी साहित्यविश्वातील एका व्यासंगी पर्वाचा अंत झाला..

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2017 3:27 am

Web Title: loksatta vyakti vedh arun sharma
Next Stories
1 प्रा. एच कुमार व्यास
2 अहमद कथराडा
3 टी आर अंध्यारुजिना
Just Now!
X