पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून खासदार म्हणून निवडून आले तेव्हा त्यांनी तेथील प्रसिद्ध हिंदी लेखक मनू शर्मा यांची नवरत्न म्हणून निवड केली होती. त्यांनी साहित्य क्षेत्रातील त्यांचा दबदबा बघून त्यांना वाराणसीच्या स्वच्छता अभियानाचे नेतृत्व करण्यासाठी आवाहन केले, त्यांनीही ते आनंदाने स्वीकारले. कृष्णाची कथा आजच्या कलियुगात अधिक समर्थपणे मांडणारे ते अजोड भाष्यकार, कवी, नाटककार होते. साक्षात सरस्वतीचा वरदहस्त त्यांना लाभलेला होता. त्यांच्या निधनाने साहित्यजगतातील एक तळपता तारा निखळून पडला, अशीच सर्वाची भावना झाली.

‘कृष्ण की आत्मकथा’ ही आठ खंडांची हिंदीतील सर्वात मोठी कादंबरी त्यांनी लिहिली. ही कादंबरी वाचताना मी महत्त्वाची कामेच विसरून गेलो इतका तल्लीन झालो होतो, असे माजी पंतप्रधान व कवी अटलबिहारी वाजपेयी यांनी म्हटले होते. मनू शर्मा यांचा जन्म १९२८ मध्ये फैजाबादमधील अकबरपूर येथे झाला. त्यांनी ‘कर्ण की आत्मकथा’, ‘द्रोण की आत्मकथा’, ‘द्रौपदी आत्मकथा’, ‘के बोले मां तुमि अबले’, ‘छत्रपति’, ‘एकलिंग का दीवाना’, ‘गांधी लौटे’ या त्यांच्या कादंबऱ्या गाजल्या. त्यांच्या ‘मरीचिका’, ‘लक्ष्मणरेखा’, ‘शिवानी का आशीर्वाद’, ‘गुनाहों का देवता’ या कादंबऱ्या व ‘पोस्टर उखड गया’ हा कथासंग्रह लोकप्रिय ठरला. ते सुरुवातीला हनुमानप्रसाद शर्मा या नावाने लेखन करीत होते. भगवान श्रीकृष्णाला पौराणिकतेच्या चौकटीतून बाहेर काढून त्याचे एक वेगळे व्यक्तित्व वाचकांसमोर मांडले. शब्दांचे मायाजाल न फेकता केवळ नायकच आपली कहाणी सांगतो आहे या पद्धतीची कथनशैली त्यांनी दिली, त्यामुळे कथासौंदर्य अधिक खुलत गेले. केवळ कृष्णच नव्हे तर द्रौपदी, द्रोण, गांधारी, कर्ण या महाभारतातील तमाम पात्रांवर त्यांनी लेखन केले. याशिवाय राणा बंगा, बप्पा रावल आणि छत्रपती शिवाजी या महानायकांच्या जीवनकथेलाही त्यांनी नवी ओळख दिली. अठरा कादंबऱ्या, दोनशे कथा व सात हजार कविता ही त्यांची साहित्यसंपदा. त्यांच्यावर गुरू कृष्णदेव प्रसाद गौड यांचा प्रभाव होता. त्यांनी डीएव्ही महाविद्यालयाच्या वाचनालयात काम करताना सगळी पुस्तके वाचलेली होती. तेथे ते त्यांचे गुरू कृष्णदेव प्रसाद गौड यांच्या लेखनाने प्रभावित झाले. त्यांनीच मनू यांना त्या महाविद्यालयात नंतर शिक्षकाची नोकरी दिली. हिंदी समीक्षकांनी त्यांचे योग्य मूल्यमापन केले नाही हे खरे असले तरी त्यामुळे ते साहित्यकार म्हणून कुठेही कमी नव्हते. वाचकांचे प्रेम व श्रद्धा त्यांना भरपूर मिळाली. ‘आज नहीं तो कल, कल नहीं तो परसो, परसो नहीं तो बरसों बाद में मैं डायनॉसॉर के जीवाश्म की तरह पढा जाऊँगा..’ असे ते म्हणत असत. त्यांचे साहित्य हे मनोरंजनापेक्षा आत्मिक सबलता वाढवणारे होते. भारतीय समाज व साहित्यातील प्रत्येक स्पंदन अचूकपणे टिपणाऱ्या साहित्यिकांपैकी ते एक होते. नवीन साहित्यिकांचे ते हक्काचे आदरस्थान व मार्गदर्शक होते. ते जितके मोठे लेखक होते तितकेच मोठे माणूसही होते.  जीवनात बराच संघर्ष केलेला असल्याने त्यांना मागास, शोषित, पीडित यांच्याविषयी सहवेदना होती. त्यांनी वाराणसीतील ‘जनवार्ता’ नावाच्या वृत्तपत्रात दैनंदिन विषयांवर लेखन केले. त्यावर आणीबाणीत बंदी घालण्यात आली होती. त्यात ते कार्टून कविताही देत असत. त्यांना व्यास सन्मान, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, उत्तर प्रदेश सरकारचा यशभारती सन्मान आदी पुरस्कार तसेच गोरखपूर विद्यापीठाची डी. लिट.ही मिळाली होती.