केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून वैद्यक वा अभियांत्रिकीची पदवी घेतलेले तरुण-तरुणी या आव्हानात्मक परीक्षेत चांगले यश मिळवू लागले, यालाही बराच काळ लोटला. राज्यातील मुंबई-पुणेव्यतिरिक्त धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, जालना, बुलढाणा या जिल्ह्य़ांतील तरुणही या परीक्षेत उत्तीर्ण होऊन देशाच्या विविध भागांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. यंदा या परीक्षेत देशात अकरावी आणि राज्यात अव्वल आलेली विश्वांजली गायकवाड ही तरुणी तर मूळची उस्मानाबाद जिल्ह्य़ातील होती. याचप्रमाणे देशभरातून निवडलेल्या भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून मीरारोड येथील समीर अस्लम शेख या अधिकाऱ्याने यंदा नवा अध्याय लिहिला आहे. या अधिकाऱ्यांनी प्रशिक्षण काळात बजावलेल्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाते. दीक्षान्त समारोहात समीर शेख याला अष्टपैलू कामगिरीबद्दल विशेषत्वाने गौरवण्यात आले.

ठाणे जिल्ह्य़ातील मीरा रोड येथील शांती पार्क भागात राहणाऱ्या मध्यमवर्गीय शेख कुटुंबातील समीर हा थोरला मुलगा. तेथील सेंट झेवियर्स शाळेत शिकलेला. सर्वसाधारण मुलांसारखाच तोही होता. वाचनाची प्रचंड आवड होती. महाविद्यालयीन जीवनात कधी तरी मुंबईचे धडाडीचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो आणि अन्य अधिकाऱ्यांच्या शौर्यगाथा वाचल्यानंतर समीरनेही भविष्यात पोलीस अधिकारी बनून देशसेवा करण्याचे ठरवले. दहावीत चांगले गुण मिळाल्याने विलेपार्ले येथील नावाजलेल्या साठय़े महाविद्यालयात विज्ञान शाखेत त्याने प्रवेश घेतला. त्याचे वडील अभियंता असल्याने त्याने अगोदर अभियांत्रिकीची पदवी घेण्याचे ठरवले. उत्तम गुण मिळाल्याने बिट्स पिलानीसारख्या नामांकित संस्थेत तो दाखल झाला. इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशनसारखी शाखा त्याला मिळाली.

पदवीधर होत असतानाच त्याने यूपीएससीच्या परीक्षेची तयारी सुरू केली होती. मात्र पहिल्या प्रयत्नात तो अपयशी ठरला. या अपयशाने खचून न जाता त्याने अधिक गांभीर्याने या परीक्षेकडे पाहिले. सनदी व पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांच्याशी चर्चा करून आपल्या अभ्यासाची दिशा ठरवली. मित्रांनी सुचवल्यानुसार या परीक्षेच्या तयारीसाठी काही महिने तो दिल्लीत गेला. दिवसातले आठ ते दहा तास अभ्यास केला. मुख्य परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर प्रत्यक्ष मुलाखतीसाठी त्याने विशेष सराव केला. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसोबत चालू घडामोडींमधील एखाद्या विषयाचा विविध अंगाने कसा विचार होऊ शकतो, याचा सराव केला. कठोर परिश्रम केल्याने मग त्याला यश मिळाले आणि पसंतीची पोलीस सेवाही मिळाली.

हैदराबाद येथील सरदार पटेल अ‍ॅकॅडमी तसेच देशाच्या विविध भागांत १३६ अधिकाऱ्यांच्या तुकडीला प्रशिक्षण दिले गेले. जातीय दंगलींपासून ते मतदानासारख्या संवेदनशील घटनांच्या वेळी परिस्थिती कशा प्रकारे हाताळावी याचा यात समावेश होता. ४५ आठवडय़ांचे हे प्रशिक्षण संपल्यानंतर अ‍ॅकॅडमीत या अधिकाऱ्यांचा दीक्षान्त समारोह झाला. या काळात अष्टपैलू कामगिरी बजावल्याबद्दल समीर शेख याला ‘पंतप्रधानांचे बॅटन’ तसेच ‘केंद्रीय गृहमंत्र्यांचे रिव्हॉल्व्हर’ प्रदान करण्यात आले. आयपीएसच्या प्रशिक्षण काळात असा गौरव होणे करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. या तुकडीला निरोप देण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.  रिबेरोंना आपला आदर्श मानणाऱ्या समीरवर या गौरवामुळे जबाबदारीही वाढली आहे..