31 October 2020

News Flash

शंतनू कांबळे

सांस्कृतिक स्वरूपामुळे त्या अधिक प्रभावी ठरल्या.

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो वा १९६०-७०च्या दशकातील परिवर्तनवादी चळवळी असोत, सांस्कृतिक स्वरूपामुळे त्या अधिक प्रभावी ठरल्या. त्यातील शाहिरांनी, कलापथकांनी जाणीवजागृतीचं- कॉन्शन्टायझेशनचं कार्य केलं आहे. मात्र पुढे चळवळींचंही एनजीओकरण झालं आणि कार्यकर्तेपणाची आसही उणावली, तसं या सांस्कृतिक अंगाचं सोयरसुतक कुणाला राहिलं नाही! अशा ‘उतरत्या’ काळात जन्माला आलेले आणि तरीही आपल्या गाण्यांनी कॉन्शन्टायझेशन करू पाहणारे ऐन चाळिशीतील शाहीर शंतनू कांबळे यांचं बुधवारी निधन झालं. त्यांच्या जाण्याने परिवर्तनवादी चळवळींतील बिनीचा शिलेदार गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील शेतफळे या गावी शेतमजूर कुटुंबात जन्मलेल्या शंतनू कांबळे यांना श्रम आणि शोषणाचं गणित आकळायला वेळ लागला नाही. त्यात शाहीर अण्णा भाऊ  साठे, वामनदादा कर्डक, विलास घोगरे आदींच्या लेखणीचा प्रभाव त्यांच्यावर पडला. त्यामुळे पुढे मुंबईतील वडाळ्याच्या कामगार वस्तीत वास्तव्याला येऊन, सुरुवातीला काही काळ ‘मीडिया मॅटर्स’ या स्वयंसेवी संस्थेत उमेदवारी करून लवकरच ते परिवर्तनवादी चळवळींशी पूर्णवेळ जोडले गेले. विद्रोही सांस्कृतिक चळवळीत आणि धारावीत भरलेल्या ‘विद्रोही साहित्य संमेलना’तही ते सक्रिय राहिले. ‘कबीर कला मंच’ आणि पुढे ‘रिपब्लिकन पँथर्स’ अशा विद्रोही सांस्कृतिक संघटनांच्या स्थापनेतही त्यांनी पुढाकार घेतला होता. नव्वदच्या दशकाअखेर घडलेलं मुंबईतल्या घाटकोपर येथील रमाबाईनगर गोळीबार प्रकरण, शाहीर विलास घोगरे यांची आत्महत्या, तसेच पुढील काळात घडलेल्या जातीय अत्याचाराच्या घटनांविषयीचा राग, नकार शंतनू कांबळे यांच्या गाण्यांतून व्यक्त झाला आहे. जातीय अत्याचाराची भीषण घटना घडते आणि देशाचे राष्ट्रपती त्यावर मौन बाळगतात, याबद्दल त्यांनी तत्कालीन राष्ट्रपती कलाम यांना गाण्यातून विचारलेला जाब हा त्या वेळी वादाचा विषय ठरला होता. खैरलांजीच्या अमानुष घटनेनंतर ‘दलिता रं हल्ला बोल ना, श्रमिका रं हल्ला बोल ना..’ हे गाणं लिहिणारे शाहीर शंतनू कांबळे ‘पळू नका, दुनिया सारी बदला’ असं आवाहन तरुणांना करत होते. कांबळे यांनी इथल्या मिल कामगारांच्या वाताहतीवर लिहिलं होतं- ‘कामगार कामगार ओरडणारे कुठे गेले बाई, आणि लालबागचा रंग भगवा कुणी केला बाई..’; या विद्रोहाबरोबरच रोजगार हमीवर काम करणाऱ्या स्त्रियांचं दु:ख मांडणाऱ्या ‘बाळ रडलं रडलं, बाळ उपाशी झोपलं..’ या गाण्यासारखी अभिव्यक्तीही त्यांनी केली. अनेक परिवर्तनवादी तरुण कांबळे यांची गाणी गातात आणि अनेक तरुण शाहिरांवर त्यांचा प्रभाव जाणवतो. एकीकडे पुरेसे माध्यमस्नेही झाल्यावर विद्रोह बाजूला सारणारे शाहीर आजूबाजूला दिसत असताना शा. कांबळे मात्र तडजोड न करता गात-लिहीत राहिले. तडजोडीचा धूर्तपणा नसला की जे जे होणार असतं ते ते शाहीर कांबळे यांच्या वाटय़ाला आलं : नक्षलवादाच्या आरोपाखाली अटक आणि पुढे निर्दोष सुटकाही झाली. अर्थात, अभिव्यक्तीचा त्यांचा मार्ग अखेपर्यंत अबाधित राहिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2018 3:21 am

Web Title: loksatta vyakti vedh shantanu kamble
Next Stories
1 अ‍ॅड्. शांताराम दातार
2 टॉमी थॉमस
3 डॉ. आशिक महंमद
Just Now!
X