28 January 2021

News Flash

मंगलेश डबराल

मंगलेश डबराल यांचा जन्म १९४८ सालातला. उत्तराखंडच्या टिहरी गढवालच्या पहाडी भागातला.

मंगलेश डबराल

मराठी साहित्यात ‘साठोत्तरी’ या कालवाचक शब्दाने ओळखला जाणारा प्रवाह आहे. या साठोत्तरी साहित्याने मराठी जनमानसात घुसळण घडवून आणली. हे मराठीत जसे सुरू होते, तसेच हिंदीतही घडत होते. मानवी जगण्याला सर्वागांनी भिडणारी साठोत्तरी साहित्यिकांची पिढी तिथेही लिहिती झाली होती. परंतु मराठीच्या तुलनेत हिंदी साठोत्तरी साहित्याचे ठसठशीतपणे दिसणारे वेगळेपण म्हणजे- त्यातले करकरीत राजकीय भान. ते ज्यांच्या कवितेत सजगपणे, समकाळाला प्रतिसाद देत व्यक्त झाले असे कवी-अनुवादक-पत्रकार मंगलेश डबराल हे बुधवारी निवर्तले. साठोत्तरी साहित्याने घालून दिलेल्या वाटेला पुढील काळात एका निश्चित दिशेला घेऊन जाणाऱ्या या सक्रिय कवीच्या निधनाने आदल्या आणि आताच्या लिहित्या पिढीतील दुवा निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.

मंगलेश डबराल यांचा जन्म १९४८ सालातला. उत्तराखंडच्या टिहरी गढवालच्या पहाडी भागातला. गढवाली भाषेतले व्यंगनाटय़लेखक मित्रानंद डबराल हे त्यांचे वडील. त्यांच्यामुळेच ते साहित्याकडे वळले. गढवालच्या डोंगराळ भागातल्या लोकगीत-संगीताचा प्रभावही त्यांच्यावर पडला. त्यातून लिहिते झालेल्या मंगलेश डबराल यांचे सुरुवातीचे शिक्षण गढवालमध्येच झाले आणि महाविद्यालयीन शिक्षणाच्या शेवटाकडे ते दिल्लीत दाखल झाले. दिल्लीत ‘हिंदी पेट्रिअट’, ‘प्रतिपक्ष’, ‘आसपास’ यांसारख्या नियतकालिकांत त्यांनी नोकरी केली. मग भोपाळ येथील ‘पूर्वग्रह’, लखनौच्या ‘अमृत प्रभात’ या नियतकालिकांत काही काळ त्यांनी संपादनाची जबाबदारी सांभाळली आणि १९८३ साली ‘जनसत्ता’त साहित्य संपादक म्हणून रुजू झाले. तोवर मनोहर श्याम जोशी, कमलेश्वर, ज्ञानरंजन यांसारख्या हिंदीतील मान्यवर लेखकांच्या वर्तुळात ते वावरू लागले होते, काही कथाही त्यांनी लिहिल्या होत्या. पण त्यांना ओळख मिळवून दिली ती ‘पहाड पर लालटेन’ (१९८१) या त्यांच्या पहिल्या कवितासंग्रहाने. त्यातून शहरी जगण्याला, व्यवस्थेच्या निर्ढावलेपणाला गढवालच्या या पहाडी कवीने तिखट प्रतिसाद दिला होता. मार्क्‍सवादाचा प्रभाव उघडपणे मान्य करणाऱ्या डबराल यांनी यानंतर मात्र संयतपणे क्रांतीची भाषा कवितेतून मुखर केली. ‘घर का रास्ता’ (१९८८), येऊ घातलेल्या जागतिकीकरणाची स्पंदने टिपणारा ‘हम जो देखते हैं’ (१९९५), भवतालातल्या जगण्यातील संगीताची संगती लावणारा ‘आवाज भी एक जगह है’, त्यानंतरचा ‘नये युग में शत्रु’ आणि अगदी अलीकडचा ‘स्मृति एक दुसरा समय है’ हे कवितासंग्रह म्हणजे डबराल यांच्यातल्या कवीने समकाळाला दिलेल्या प्रतिसादाची साखळी आहे. या हल्लीच्या कविता माध्यमांचे बदलते स्वरूप, बाजारवादाचा वाढता प्रभाव, हुकूमशहांचे वर्तन यांविषयी असणे स्वाभाविकच होते.

‘एक बार आयोवा’ हे प्रवासवर्णन आणि ‘लेखक की रोटी’ यांसारखे गद्यपर लेखन आणि देशी-विदेशी भाषांतील साहित्य हिंदूीत अनुवादित करणारे डबराल हिंदी भाषा विद्यमान सत्ताधारी ज्या प्रकारे (‘घर में घुस के मारेंगे’ वगैरे) वापरतात, त्याने अस्वस्थ होते. अभिव्यक्तीचे प्रमुख माध्यम असलेल्या भाषेला भ्रष्ट, हिंसक करणे म्हणजे जणू स्वातंत्र्यावर आघात करण्यासारखेच आहे, असे त्यांचे मत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2020 12:04 am

Web Title: manglesh dabral profile abn 97
Next Stories
1 नरेंद्र भिडे
2 सुह् से-ओक
3 डॉ. निरदर सिंग कपानी
Just Now!
X