05 April 2020

News Flash

पी. राघव गौडा

गौडा यांची दूध यंत्रे घेण्यासाठी कर्नाटकात शेतकऱ्यांना अनुदानेही दिली जातात.

आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत दूध उत्पादनाचा वाटा मोठा आहे, पण गाई-म्हशींचे दूध काढणारे कुशल कामगार मिळत नाहीत. हे दूध हाताने काढणे चुकीचे आहे, कारण त्यात अनारोग्याचा धोका असतो. दूध काढण्याची मोठी यंत्रे उपलब्ध आहेत पण ती परवडत नाहीत. अशा परिस्थितीत कर्नाटकचे पी. राघव गौडा यांनी या शेतकऱ्यांसाठी एक यंत्र तयार केले होते, त्यामुळेच त्यांचे नाव ‘मिल्क मास्टर’ म्हणून गाजले. राघव गौडा पलाथडका यांच्या निधनाने एका नवप्रवर्तकाला आपण मुकलो आहोत. दक्षिण कन्नड जिल्ह्य़ातील मुरूल्या गावचे ते शाळामास्तर. इतर लोक करतात तसे, हीच नोकरी करून ते निवृत्त होऊ शकले असते; पण आसपासच्या लोकांच्या समस्या पाहून त्यांनी हे यंत्र तयार केले. आज भारतात ३०० डेअऱ्या या यंत्राचा वापर करीत आहेत. त्याची निर्यातही शेजारच्या देशांना करण्यात आली आहे. गौडा यांच्या घरच्या गाईच्या आचळाला कुठला तरी संसर्ग झाला. तिला स्वच्छ ठेवणे तर आवश्यक होतेच पण दूध काढणे कठीण जात होते. ती गाय त्यांनी विकून टाकली; पण गाय विकावी लागल्याचे शल्य त्यांच्या मनात होते. त्यातून त्यांनी २००१-२००२ मध्ये दूध काढण्याचे यंत्र शोधून काढले. त्यामुळे आरोग्यदायी पद्धतीने दूध काढता तर येत होतेच शिवाय कमी वेळ लागत होता. या यंत्राद्वारे एक व्यक्ती १०० लिटर दूध काढू शकते व मिनिटाला दोन लिटर दूध काढण्याची त्याची क्षमता आहे. नऊ हजार रुपयांच्या आसपास किंमत असलेल्या या यंत्रास वीज लागत नाही. कमी गाई-म्हशी असलेले छोटे शेतकरी ते वापरू शकतात. असेच विजेवर चालणारे यंत्र ८० हजारांचे आहे, ते मोठे शेतकरी घेऊ शकतात. दूध काढण्याच्या यंत्राच्या निमित्ताने ‘क्षीर एंटरप्राइजेस’ हा उद्योग त्यांनी त्यांच्या मुरूल्या गावी उभा केला. त्यामुळे गावातच लोकांना रोजगार उपलब्ध झाला. विशेष म्हणजे वैज्ञानिक व दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी गौडा यांना नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन २००५ मध्ये गौरवले होते. गौडा यांची दूध यंत्रे घेण्यासाठी कर्नाटकात शेतकऱ्यांना अनुदानेही दिली जातात. स्वीडन, केनिया, न्यूझीलंड, मेक्सिको या देशांनीही त्यांची यंत्रे घेतली आहेत. शिक्षकी पेशातील एका व्यक्तीने उभे केलेले हे काम नतमस्तक करणारे ठरले, त्यामुळेच गौडा यांचे निधन चुटपुट लावणारे ठरते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2020 4:29 am

Web Title: milk master p raghav gowda profile zws 70
Next Stories
1 वासिम जाफर
2 षडाक्षरी शेट्टर
3 जोगिंदर सिंग सैनी
Just Now!
X