बाहेरच्या देशांतून हॉलीवूडमध्ये दाखल झालेल्या ज्या दिग्दर्शकांनी सिनेमांत काटेकोर आणि लक्षणीय कामगिरी केली, त्यांत मिलोश फोर्मन या चेकोस्लोव्हाकियामधील चित्रकर्त्यांला अग्रस्थान लाभेल. त्यांच्या कामाचे महत्त्व यासाठी की, इंग्रजीत ताकदीने काम करीत असताना केवळ राजकीय अन्यायाचा बळी पडून देशापासून आणि भाषेपासून दूर जावे लागल्यानंतरही त्यांनी आपल्यातल्या चित्रपटकाराचा बळी जाऊ दिला नाही. १९७६ साली ‘वन फ्ल्यू ओव्हर कुकूज नेस्ट’ आणि १९८४ साली ‘अमेडय़ुअस’ या त्यांच्या चित्रपटांनी ऑस्करमध्ये इतिहास घडविला. तत्कालीन चेकोस्लोव्हाकिया देशात १९३२ मध्ये जन्मलेल्या मिलोश यांचे आईवडील नाझींच्या सत्ताकांक्षेचे बळी ठरले. महायुद्धाच्या झळीनंतरच्या राजकीय-सांस्कृतिक कलहाच्या काळाने फ्रेंच न्यू वेव्हला जन्म दिला. या लाटेतील सिनेमांनी जगभर कलात्मक चित्रपटांचा प्रारंभ झाला, तशीच क्रांती मिलोश फोर्मन यांच्या ‘फायरमन्स बॉल’ने झेक सिनेमामध्ये घडविली. कम्युनिस्ट सरकारच्या गळचेपीची खिल्ली उडविणाऱ्या या सिनेमावर वादंग निर्माण झाला आणि त्याची परिणती या दिग्दर्शकाला देश सोडावा लागण्यात झाली. न्यूयॉर्कला कर्मभूमी मानणाऱ्या या दिग्दर्शकाने ‘वन फ्ल्यू ओव्हर द कुकूज नेस्ट’ या केन केसी लिखित कादंबरीत, मनोरुग्णालयातील बंडखोरीच्या कथानकात आपल्याच वेदनेचे एक रूप शोधले. या चित्रपटाने पुरस्कारांचे नवे विक्रम प्रस्थापित केले. पुढे संगीतकार मोझार्ट आणि त्याच्या समकालीन तुल्यबळ सॅलिएरी यांच्या जीवनावर आधारित ‘अमेडय़ुअस’ हा फोर्मन यांच्या संगीत चित्रपटांचा कळस होता. त्याही चित्रपटाला ऑस्करची मोहोर हा त्या वर्षीचा सोहळ्यापूर्वी केवळ उपचार उरला होता. नव्वदोत्तरी काळात त्यांनी व्यक्तिवेधी सिनेमांवर भर दिला. जिम कॅरी ज्या काळात विनोदी भूमिकांसाठी म्हणून परिचित होता त्याच काळात त्याच्याकडून अतिगंभीर भूमिका त्यांनी ‘मॅन ऑन द मून’मध्ये यशस्वीपणे करवून घेतली. अ‍ॅण्डी कॉफमन या विनोदकाराच्या आयुष्याचे सार काढणारा हा चित्रपट आहेच, पण शीर्षकगीताची निवडही दिग्दर्शकाची जगण्याची भूमिका सांगणारी आहे. फोर्मन यांनी कुख्यात व्यक्तिरेखेवरही अत्यंत सुंदर सिनेमा काढला. ‘पीपल व्हर्सेस लॅरी फ्लिण्ट’ या चित्रपटात हस्लर या प्लेबॉयमधील नग्नतेला बाळबोध ठरविणाऱ्या मासिकाच्या संस्थापकाचे चरित्र येते. हा चित्रपट हस्लर संस्थापकाचा जीवनप्रवास आणि त्याचे तत्त्वज्ञान मांडून ‘कोणत्या बाजूला राहायचे?’ असा प्रश्न प्रेक्षकांना पाडतो. चित्रकार गोया याच्यावरील चरित्रपटानंतर उतारवयात झेक म्युझिक व्हिडीओज आणि शेवटी झेक भाषेतील म्युझिकल बनविणारे मिलोश फोर्मन दशकभरापूर्वी सिनेनिवृत्त झाले होते. नुकत्याच झालेल्या त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना जगभरातून आदरांजली वाहिली गेली, ती देशात आणि हॉलीवूडच्या दोन भिन्न डगरींवर सारख्याच तेजाने तळपण्याची क्षमता दाखविल्याबद्दल!