‘विमेन्स वर्ल्ड बँकिंग इंडिया’च्या संस्थापक-मुख्याधिकारी विजयालक्ष्मी दास यांच्या निधनाने भारतातील सूक्ष्म वित्त (मायक्रोफायनान्स) क्षेत्र पोरके झाले. रविवारी, ९ फेब्रुवारीस त्यांची निधनवार्ता आली. देशातील सूक्ष्म वित्त क्षेत्राशी संबंधित सारे जण त्यांना विजी म्हणूनच संबोधत. त्या संस्थापक असलेल्या संस्थेने गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडूतील शेकडो सूक्ष्म वित्तसंस्थांना पतपुरवठा केला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शेतकरी, उत्पादकांना अर्थसाह्य़ासाठी लागणारा चार ते पाच वर्षांचा कालावधी गेल्या काही वर्षांत अवघ्या दोन वर्षांवर आला. महिलांसाठी आणि महिलांच्या छोटय़ा उद्योगांसाठी नियमित पतपुरवठय़ाचे कार्य या संस्थेद्वारे चालते. महिलांचे स्वयंसेवी गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था यांचे आर्थिक गणित त्यामुळेच योग्य रीतीने मांडले जाई. अशा संस्थांच्या आर्थिक सहकार्याबरोबरच त्यांचा चोख ताळेबंद, त्यातील सुशासन यांचीही घडी त्या घालून देत. देशातील आघाडीच्या, जुन्या सूक्ष्म वित्तसंस्था असलेल्या एसकेएस मायक्रोफायनान्स (इंडसइंड बँकेचा भाग असलेली सध्याची भारत फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस), स्पंदना किंवा शेअर मायक्रोफिन यांच्या स्थापनेतही ‘विजीं’चा सहभाग होता.

अर्थशास्त्रात मद्रास विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतानाच, सतत कर्जात असलेल्या अल्पउत्पन्न वर्गासाठी काही तरी ठोस करण्याचा विचार त्या करीत होत्या. प्रसंगी मुलांचे शिक्षण नाकारणारी आणि कर्जासाठी कागदपत्रांची मागणी करणारी तत्कालीन बँकिंग व्यवस्था कष्टकरी महिलांसाठी पर्याय कसा निर्माण करू शकेल या दिशेने त्यांनी टाकलेली पावले यशस्वी ठरली. विजी यांनी हॉर्वर्ड इन्स्टिटय़ूट ऑफ इंटरनॅशनल डेव्हलपमेंट आणि अमेरिकेच्या विमेन्स वर्ल्ड बँकिंगमधून अर्थशास्त्रातील अनेक प्रगत अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यानंतर त्या अनेक संस्थांमध्ये विविध पदांवर कार्यरत होत्या. सुरुवातीपासूनच त्यांना महिलांमध्ये उद्योजकता वाढीस लागावी यासाठी कार्य करण्याची तीव्र इच्छा होती.

सूक्ष्म वित्त क्षेत्रातील अग्रणी व ग्रामीण बँकेचे संस्थापक, अर्थशास्त्रातील नोबेलविजेते मोहम्मद युनूस यांचे भारतातील सहकारी विजय महाजन हेही सूक्ष्म वित्तपुरवठा सुविधेसाठी दास यांच्या मार्गदर्शनाचे लाभार्थी ठरले आहेत. सूक्ष्म वित्त क्षेत्रात सरकारने पुढाकार घेऊन कार्य करण्याची गरज असताना दास यांनी कोणतीही प्रतीक्षा तसेच अपेक्षा न करता अविरत कार्य केल्याचे ते म्हणतात. अनेक नियतकालिके, संस्थांनी विजींचा गौरव सक्षम महिला म्हणून केला होता.