ज्या काळात तामीळ चित्रपटसृष्टीत दिग्दर्शकांचा वरचष्मा होता त्या काळात गीतकार म्हणून नाममुद्रा उमटवणाऱ्या गीतकारांपैकी मुथुकुमार एक होते; त्यांचे नुकतेच निधन झाले. अगदी कमी आयुष्य वाटय़ाला येऊनही त्यांनी तामीळ चित्रपटांत ठसा उमटवला होता. त्यांना दोनदा चित्रपट गीतांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, त्यात ‘थंगा मिंगल’मधील आनंद याझाइ मीतुकीरल व ‘शैवम’ चित्रपटातील अझागे अझागू या गीतांचा समावेश होता. अवघे ४१ वर्षांचे आयुष्य त्यांच्या वाटय़ाला आले.

तामीळ साहित्यात उंची गाठण्याची मोठी क्षमता असतानाही तामीळ चित्रपटसृष्टीत त्यांच्या सर्जनशीलतेला पुरेसा वाव मिळाला नाही. ‘डम डम डम’ या चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेली गीते विशेष गाजली होती. सेल्वाराघवन यांच्या चित्रपटांसाठीही त्यांनी गाणी लिहिली. त्यात निनियाथू निनियाथू पार्थेन हे सेव्हन जी रेनबो कॉलनी चित्रपटातील गाणे अजूनही मनाला टवटवीतपणा देणारे आहे. अनिल आदुम मुंदरिल ही कविता त्यांनी ‘आनंद विकटन’ या तामीळ साप्ताहिकात लिहिली होती, त्याचेच पुढे हे गीत झाले.

तामीळ भाषेचे सौंदर्य, तेथील जीवनाचे त्यांनी बारकाईने केलेले निरीक्षण यामुळे त्यांची गाणी वेगळी होती. फार थोडय़ा कवींना आधुनिक कवितेतील प्रतिमा चित्रपट गीतात आणता आल्या, त्यातील मुथुकुमार एक होते. कनाळि मासिकाच्या कार्यक्रमात त्यांच्या ‘थूर’ या कवितेची ओळख प्रथम सार्वजनिक मंचावर झाली. ते गीतकार व कवी म्हणून श्रेष्ठ होते. आजच्या स्पर्धात्मक  जगात त्यांनी अगदी कमी काळात मोठी उंची गीतलेखनात गाठली होती. त्यांची गीते म्हणजे केवळ जुळवलेली अदाकारी नव्हती, तर ओठांवर रेंगाळणारी व अर्थगर्भ गीते हे त्यांचे वैशिष्टय़.

दिग्दर्शक होण्याचे स्वप्न घेऊन ते चित्रपटसृष्टीत आले, पण साहित्य व भाषेच्या प्रेमाने त्यांना गीतलेखनाकडे वळवले. दिग्दर्शक  सीमन यांच्या वीरांदाई या चित्रपटासाठी त्यांनी प्रथम गीतलेखन केले. सुरुवातीला ते चित्रपट क्षेत्रात बालुमहेंद्र यांचे सहायक दिग्दर्शक म्हणून काम करीत होते. मूळ कांचीपुरमचे असलेले मुथुकुमार हे द्रमुकचे संस्थापक सी.एन. अण्णादुराई यांचे दूरचे नातेवाईक. त्यांचे शिक्षण पचायप्पा महाविद्यालयात झाले. त्यांचे वडील नागराजन यांना पुस्तक  वाचनाचे मोठे वेड होते, अनेक पुस्तके त्यांच्याकडे होती, त्यामुळे मुथुकुमार यांच्यावर भाषेचे व संस्कृतीचे संस्कार आपोआपच झाले. कीरीदम व वर्णम आयिरम या दोन चित्रपटांचे संवाद लेखनही त्यांनी केले.

मुथुकुमार यांनी त्यांना मिळालेल्या ४१ वर्षांच्या उण्यापुऱ्या आयुष्यातही संधीचे सोने केले. गीतांच्या जगात रमलेल्या या कवीला अधिक आयुष्य लाभण्याचा योग नव्हता. मुथुकुमार यांचे असे मैफल अर्धवट सोडून जाणे चित्रपट रसिकांना चटका लावून गेले एवढे मात्र खरे.