‘बडोदा स्कूल’ म्हणून ओळखली जाणारी भारतीय कलाशैली अगदी नवी, म्हणजे फार तर १९७० च्या दशकापासूनची. या शैलीत प्रामुख्याने ‘नॅरेटिव्ह’ किंवा वर्णनवादी चित्रकारांचा समावेश असला, तरी काही शिल्पकार या शैलीला पुढे नेणारे ठरले, त्यांत नागजी पटेल यांचे नाव महत्त्वाचे. अलीकडल्या काही वर्षांत तर बडोद्याच्या आधुनिक शिल्पकलेचे पितामह म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाई. अखेपर्यंत कार्यरत राहून, गेल्या शनिवारी (१६ डिसेंबर) रात्री वयाच्या ८० व्या वर्षी नागजीभाई निवर्तले.

बडोद्यानजीकच्या जुनी जथराटी या खेडय़ात नागजीभाईंचा जन्म झाला. या वडिलार्जित घरात त्यांनी मोठमोठय़ा शिल्पांसाठी स्टुडिओ उभारला होता. पण शिक्षणासाठी १९५६ साली ते महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या कला विभागात आले, तेव्हापासून बडोदेवासीच झाले होते. या शहराशी त्यांचे नाते बहुविध होते. बडोदे महापालिकेची खूण असलेल्या ‘दोन वटवृक्षां’चे आधुनिकतावादी भारतीय शैलीत नागजीभाईंनी घडवलेले शिल्प शहरातील महत्त्वाच्या चौकात विराजमान होते (पुढे एका पुलासाठी तेथून ते काढण्यात आले), अगदी अलीकडेच बडोदे रेल्वे स्थानकाजवळ ‘कॉलम ऑफ फेथ’ हे नागजी पटेलकृत स्तंभशिल्प उभारण्यात आले आहे. शहरातील अनेक चौकांत नागजीभाईंच्या विद्यार्थ्यांची शिल्पे आहेत ती निराळीच. ‘नजर आर्ट गॅलरी’ हे फतेहगंज भागातील कलादालन उभारले जाण्यामागेही त्यांचीच प्रेरणा होती. रूढार्थाने प्राध्यापक नसूनही, कित्येक विद्यार्थी त्यांनी घडवले. वयाच्या सत्तरीतही ते विद्यापीठाच्या कला विभागात येत, तेव्हा ‘नागजीभाई आले’ हा निरोप पसरे आणि विद्यार्थ्यांची त्यांना भेटण्यास लगबग होई.

हे असे व्यक्तिमत्त्व, हासुद्धा तीन दशकांपूर्वीपर्यंतच्या ‘बडोदे शैली’च्या दृश्यकलावंतांचे व्यवच्छेदक लक्षणच. कलावंतांनी स्पर्धेपेक्षा एकमेकांशी मैत्री करावी, हे त्यामागील साधे तत्त्वज्ञान. सन १९६२ मध्ये नागजीभाई, गिरीश भट, बलबीरसिंग कट्ट असे तरुण दगडात (सँडस्टोन आणि संगमरवर) शिल्पे घडवणारे तरुण, दिल्लीच्या सांखो चौधुरींनी ‘ललित कला अकादमी’मार्फत राजस्थानातील मकरानाच्या दगडखाणींनजीक भरवलेल्या ‘आर्ट कॅम्प’मधून बाहेर पडले ते दगडातल्या पोतसंगीताचे सारे सूरताल हृदयात घेऊनच. अर्थात, १९६१ साली विद्यार्थी म्हणून राष्ट्रीय कलापुरस्कार मिळाल्यामुळेच नागजी यांना या मकराना कॅम्पमध्ये स्थान मिळाले होते. पुढेही युगोस्लाव्हिया, जपान, ब्राझील अशा अनेक देशांत जाऊन, तिथल्या दगडांमध्ये नागजीभाईंनी शिल्पे घडवली. सँडस्टोनला शिल्परूप देताना या दगडातील खडबडीतपणा आणि संस्कारांनी त्याला येणारा लोभस गुळगुळीतपणा या दोहोंचा वापर ते करीत. तुलनेने कणखर असलेल्या लालसर दगडात, यांत्रिक छिन्नी नेमकी फिरवून पानाफुलांचे आणि पक्ष्यांचेही आकार अगदी ड्रॉइंग केल्याच्या सहजतेने करावेत ते नागजीभाईंनीच. ही ‘इन्सिजन’च्या- कोरण्याच्या- तंत्रावरील हुकमत नागजीभाईंचे वैशिष्टय़ ठरल्याची दाद जॉनी एम.एल.सारख्या समीक्षकानेही दिली आहे.

कलासंग्राहकांचे अमाप प्रेम नागजी पटेल यांना मिळाले. इतके की, मोठमोठी शिल्पे घडवण्याचा ध्यास सोडून काही काळ, छोटय़ा शिल्पांचा जणू कारखानाच नागजी यांनी उघडला. अर्थात, या ‘वर्कशॉप’मधून बाहेर पडून कुणाकुणाच्या बागांमध्ये वा घरांमध्ये विराजमान होणाऱ्या शिल्पकृती, हे जणू इथले ‘उप-उत्पादन’ होते. नागजीभाईंचे खरे ‘प्रॉडक्ट’ म्हणजे त्यांच्या हाताखाली काम करताना त्यांच्याकडून शिकावयास मिळालेले अनेक शिल्पकार! यात त्यांचे पुत्र चिराग यांचाही समावेश आहे. मध्य प्रदेशच्या ‘कालिदास सम्मान’ (२००५) सह अनेक मानसन्मान नागजी यांना मिळाले. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक खात्याने त्यांना सुप्रतिष्ठ (तहहयात) फेलोशिप दिली होती. मात्र ‘पद्म’ किताबाने त्यांना हुलकावणीच दिली.