माणगंगेच्या तीरावर वसलेला माणदेशी माणसांचा माणदेश. या माणदेशाने शब्दप्रभू गदिमा आणि व्यंकटेश माडगूळकर, शंकरराव खरात यांच्यासारखी साहित्यरत्ने दिली. याच माणदेशी मातीत नारायणराव रंगनाथ देशपांडे यांच्यासारखे शेतीनिष्ठ प्रयोगशील व्यक्तिमत्त्व बहरले. नैसर्गिक अवकृपेवर पाय देऊन माणूस जगावा यासाठी शेळीपालनाला शास्त्रीय पाठबळ देण्याबरोबरच सामान्य, गरिबाहाती चार पैसे पडावेत, त्याच्या गरजांची पूर्तता त्याला स्वबळावर आणि उपलब्ध नैसर्गिक साधनांवर करता यावी यासाठी शेळीपालनाची दिशा निश्चित करण्याचे काम नारायणरावांनी केले. यामुळेच त्यांना ‘बकरी पंडित’ असे म्हटले जाई. माणदेशातील आटपाडी, खटाव, माण, सांगोला, मंगळवेढा हे तालुके कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखले जातात. तरीसुद्धा १९७२ च्या दुष्काळझळा या भागाने किंचित जास्तच अनुभवल्या. परतीचा मान्सून बऱ्यापैकी बरसत असला तरी शेतीत पीक घ्यायचे तर सातबारा उताऱ्यावर पाच-दहा एकरांपासून पाच-पन्नास एकर जमीन; मात्र पेरणीयोग्य असायची ती अवघी दोन-चार एकर. उरलेले सारे माळरान. अशा स्थितीत पेरायचे कसे आणि सालबिजमी चालायची कशी, हा प्रश्न कायमचाच. देशपांडे यांनी यावर उपाय शोधण्याचे ठरविले. १९७६ मध्ये एक शेळी घेतली. चार वर्षांत एका शेळीचा विस्तार ५० पर्यंत गेला. या व्यवसायाला व्यावसायिकपणा देण्यासाठी प्रयोग करण्याचे त्यांनी ठरविले. स्वत:च्या शेतात त्यांनी शेळी सुधार योजना हाती घेतली. प्रसिद्ध असलेल्या उस्मानाबादी जातीच्या शेळीमध्ये जुळी करडे देण्याचे प्रमाण ४९ टक्के होते, ते देशपांडे यांनी प्रयोग करून ७० टक्क्यांपर्यंत नेले. स्वस्तातील संतुलित चारा उपलब्ध करण्यासाठीही त्यांनी प्रयोग केला. शेतकऱ्यासह भूमिहीनांनाही कमी गुंतवणुकीत हा प्रयोग करता आला. राज्य नियोजन मंडळाचे तत्कालीन सदस्य प्रा. एच. एम. देसरडा यांनी या योजनेचा राज्य योजना म्हणून समावेश केला. ग्रामीण भागातील अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसह भूमिहीनही या प्रयोगाकडे आकर्षिले गेले. यातून बंदिस्त शेळीपालनाचा व्यवसाय सुरू झाला. यासाठी शासनानेही अनुदान सुरू केले. यातून ग्रामीण भागातील आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्नही यशस्वी झाला. ऊस शेतीतही पाचट न जाळता पाच वर्षे खोडवा घेण्याचा प्रयोग, वसंतदादा पाटील यांच्या आदेशाने संकरित ज्वारीचे बीजोत्पादन, कपाशीचे बीजोत्पादन हे प्रयोगही यशस्वी केले. त्यांनी वनशेती व बंदिस्त शेळीपालन अशी दोन पुस्तकेही लिहिली. शेतकऱ्यांना आर्थिक शिस्त लागावी यासाठी कृषी नारायणी ही दैनंदिनीही सुरू केली. त्यांच्या निधनाने कर्ता शेतीसुधारक हरपला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Dec 2019 रोजी प्रकाशित
नारायण देशपांडे
शेतकऱ्यांना आर्थिक शिस्त लागावी यासाठी कृषी नारायणी ही दैनंदिनीही सुरू केली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 27-12-2019 at 01:11 IST
मराठीतील सर्व व्यक्तिवेध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan deshpande profile zws