संयुक्त अरब अमिरातींत, जेथे एकंदर लोकसंख्येत भारतीयांचे प्रमाण ३७ ते ४२ टक्के आहे, तेथील राजदूत म्हणून आता नवदीपसिंग सूरी  यांची नियुक्ती जाहीर झाली आहे. पुढील महिन्यात ते सूत्रे स्वीकारतील. सध्या ते ऑस्ट्रेलियात भारताचे उच्चायुक्त आहेत.

अमृतसर येथील गुरुनानक विद्यापीठातून अर्थशास्त्रातील पदवी घेतल्यानंतर ‘सेल’ या देशाच्या सर्वात मोठय़ा सरकारी उद्योगात काही काळच नोकरी करणाऱ्या सूरी यांनी भारतीय विदेश सेवेत १९८३ मध्ये प्रवेश मिळवला. सूरी यांनी परकीय भाषा म्हणून अरबी निवडली. कैरोतील भारतीय वकिलातीत १९८४ साली त्यांना नियुक्ती मिळाली.  कैरोतीलच अमेरिकन विद्यापीठात अरबीमध्ये रीतसर शिक्षणही घेतले. मग तीन वर्षे जगातील मोजक्या प्राचीन शहरांपैकी असलेल्या दमास्कस, अलेप्पोमध्ये त्यांनी सेवा बजावली. इराक युद्धाला तोंड फुटल्यानंतर सर्वच विदेशी सेवा कार्यालये हलविण्यात आली; तेव्हा पुढचे दोन महिने उत्तरोत्तर तेथील खालावत जाणारी परिस्थिती पाहण्यात आणि त्याचे तपशील देण्यात गेले.

१९९१ मध्ये मायदेशी परतल्यानंतर सूरी यांना आर्थिक समन्वय समितीवर नेमण्यात आले. त्यानंतर काहीच महिन्यांत अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील आर्थिक सुधारणा अमलात येण्यास सुरुवात झाली. भारताच्या आर्थिक मुत्सद्देगिरीची व्याख्या ‘समन्वय समिती’च्या कामातून नव्याने तयार होण्याचीही ती सुरुवात होती. १९९३ मध्ये त्यांची वॉशिंग्टन येथील भारतीय वकिलातीत नियुक्ती झाली. तेथून थेट, १९९७ साली टांझानियातील दार-एस-सलाम येथे त्यांना पाठविले गेले. तेथील निवासस्थानी सुरुवातीच्या दिवसांत १८ तास विजेविना काढावे लागत होते. कधी कधी पाण्याचाही पत्ता नसायचा. २००० साली लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयातील वृत्त विभागाचे प्रवक्ते आणि प्रमुख म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. या वेळी त्यांना गुजरात दंगल, संसदेवरील हल्ला आणि भारत आणि पाकिस्तान यांसारख्या गुंतागुंतीच्या विषयांवर भारताची भूमिका पटवून देण्याची जबाबदारी सांभाळावी लागली.

भारताच्या दृष्टीने दुर्लक्षित असलेल्या पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल, अंगोला, कोंगो या छोटय़ा देशांशी राजनैतिक संबंध सुधारण्याची जबाबदारी सूरी यांच्यावर आली. २००९ मध्ये पुन्हा भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय परराष्ट्र सेवेला फेसबुक, ट्विटर आणि इतर समाजमाध्यमांशी जोडण्याच्या कामात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. त्यानंतर ते ऑस्ट्रेलियात उच्चायुक्तपदी आले, परंतु आफ्रिकेतील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशसेवा बजावणाऱ्या सूरी यांचे या खंडाशी असलेले सख्य अजूनही कायम आहे. त्यांची पर्यावरणतज्ज्ञ कनिष्ठ कन्या जेसलिना ही सध्या दक्षिण आफ्रिकेतील निसर्गाशी मैत्री करून आहे. प्रख्यात पंजाबी कादंबरीकार नानकसिंग हे सूरी यांचे आजोबा. त्यांच्या तीन कादंबऱ्यांचे सूरी यांनी केलेले इंग्रजी अनुवाद त्यांच्या साहित्यिक जाणकारीची साक्ष देणारे आहेत.