21 September 2018

News Flash

डॉ. अरविड कार्लसन

डॉ. कार्लसन यांचे संशोधन १९५० मध्ये मेंदूतील डोपॅमाइन या रसायनापासून सुरू झाले. त्या

डॉ. अरविड कार्लसन

पार्किन्सन म्हणजे कंपवाताच्या रोगावर अजूनही इलाज सापडलेला नाही. त्यावर थोडेबहुत नियंत्रण ठेवता येईल अशी औषधे आहेत इतकेच. या औषधांमुळे काही प्रमाणात हा रोग नियंत्रित राहतो. या रोगावरील औषधे ज्यांच्या संशोधनातून तयार झाली अशा वैज्ञानिकांपैकी एक म्हणजे डॉ. अरविड कार्लसन. ते स्वीडिश वैज्ञानिक होते. त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना कंपवातावरील संशोधनासाठी नोबेलही मिळाले होते.

HOT DEALS
  • Gionee X1 16GB Gold
    ₹ 8990 MRP ₹ 10349 -13%
    ₹1349 Cashback
  • I Kall Black 4G K3 with Waterproof Bluetooth Speaker 8GB
    ₹ 4099 MRP ₹ 5999 -32%

डॉ. कार्लसन यांचे संशोधन १९५० मध्ये मेंदूतील डोपॅमाइन या रसायनापासून सुरू झाले. त्या काळात डोपॅमाइनचे महत्त्व फारसे समजलेले नव्हते, पण हाच चेतासंवेदक एका न्यूरॉनकडून दुसऱ्या न्यूरॉनकडे संदेश पाठवत असतो. कार्लसन यांनी डोपॅमाइन हे मेंदूच्या बॅसल गँगलिया भागात असते हे प्रथम सांगितले. हाच भाग शरीराच्या हालचाली नियंत्रित करीत असतो. डोपॅमाइन कमी झाले की शारीरिक हालचाली मंद होतात. त्यातूनच एल डोपा या औषधाचा शोध लागला, त्यामुळे मेंदूत डोपॅमाइन वाढवले जाते. कार्लसन यांनी हे सगळे प्रयोग सशांवर केले होते. मेंदूतील संदेशवहनाचे गूढ शोधणाऱ्या डॉ. कार्लसन यांना इ.स. २००० मध्ये डॉ. एरिक कांडेल व डॉ. पॉल ग्रीनगार्ड यांच्यासमवेत नोबेल देण्यात आले.

स्वीडनमधील ल्युंड शहरात ते लहानाचे मोठे  झाले. त्यांची आई एमए झालेली होती. आईचा सामाजिक संशोधनाचा वारसा मुलाने विज्ञानात पुढे नेताना जगातील असंख्य लोकांचे आयुष्य अवघड करून टाकणाऱ्या पार्किन्सनवर संशोधन केले. दोन भाऊ मानव विद्या शाखेकडेच वळले असताना डॉ. कार्लसन यांनी बौद्धिक बंडखोरी करून वैद्यकशास्त्राचा मार्ग निवडला.  दुसऱ्या महायुद्धावेळी ते जर्मनीला गेले, तेथे अनेक ज्यू कैद्यांची मनाची अवस्था पाहून त्यांना आश्चर्य वाटले होते. नंतर १९५१ मध्ये कार्लसन वैद्यकीय डॉक्टर झाले व फार्माकॉलॉजीत डॉक्टरेटही पूर्ण केली. डॉक्टरकी व संशोधन यात त्यांनी संशोधन निवडले. नंतर अमेरिकेत बर्नार्ड ब्रॉडी या फार्माकॉलॉजिस्टच्या प्रयोगशाळेत त्यांनी जे संशोधन केले ते त्यांना नोबेलपर्यंत घेऊन गेले. ब्रॉडी यांच्यामुळेच मी घडलो, असे कार्लसन यांनी नमूद केले आहे. ते अमेरिकेतून मायदेशी आले व नंतर एल डोपा औषधाचे प्रयोग केले, ते यशस्वी ठरले. कार्लसन हे गोथेनबर्ग विद्यापीठात प्राध्यापक होते. रॉयल स्वीडिश विज्ञान अकादमीचे सदस्य बनले. १९८४ मध्ये त्यांना जपानचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी शोधलेले एल डोपा हे औषध आजही कंपवातावर मोठय़ा प्रमाणात वापरले जात आहे, इतके त्यांचे संशोधन शाश्वत राहिले.

First Published on July 9, 2018 1:01 am

Web Title: nobel winning scientist arvid carlsson