येल विद्यापीठाच्या सिंगापूर येथील महाविद्यालयात प्राध्यापक व साहित्यिक अशी पराशर कुलकर्णी यांची ओळख. त्यांना नुकतेच राष्ट्रकुल लघुकथा पारितोषिक मिळाले आहे. हे पारितोषिक प्रथमच भारतीय लेखकाला मिळाले हे विशेष.
कुलकर्णी हे समाजशास्त्राचे प्राध्यापक असून त्यांनी शैक्षणिक पातळीवरही संशोधन केले आहे. त्यांचा मुख्य विषय हा वसाहतकालीन भारतातील महिलाविरोधी हिंसाचार व धर्म हा आहे. समाजशास्त्रातील संशोधन करतानाच साहित्यिक लेखन करताना त्यांनी ‘काऊ अँड कंपनी ’ ही पहिलीच लघुकथा लिहिली. ती राष्ट्रकुल लघुकथा स्पध्रेत ४ हजार स्पर्धकांना मागे टाकून निवडली गेली. ही लघुकथा मुंबईत स्थित्यंतराच्या काळात म्हणजे १९०५ च्या सुमारास घडते असे कल्पिले आहे. चार व्यक्ती च्युइंगमच्या जाहिरातीत वापरण्यासाठी गाईचा शोध घेत असतात. गोमाता को भाता.. अशी चपखल टिप्पणी यात गोमातेला आवडणाऱ्या च्युइंगमविषयी केली आहे. गाय सतत रवंथ करीत असते, हा मोठा धागाच येथे विनोदी अंगाने गुंफला आहे. हिंदूंना गाय प्रिय. त्यामुळे गाईचा च्युइंगमच्या जाहिरातीत वापर योग्यच आहे, त्यामुळे ही जाहिरात देशी लोकांना जास्त रुचेल अशीच आहे असा युक्तिवाद व्यवस्थापकीय संचालकांपुढे केला जातो, असे लघुकथेचे काहीसे कथानक. एकूणच गंभीर विषयाला खुमासदार व हलक्याफुलक्या शैलीत लेखकाने हाताळले आहे. पराशर सांगतात की, मी आधी राज्यशास्त्रज्ञ आहे, मग लेखक. धर्म व राजकीय अर्थशास्त्र हे त्यांचे अभ्यासाचे विषय. त्यातील संशोधनात बरेच संदर्भसाहित्य शोधावे लागते, असे ते सांगतात. या संदर्भातील काही भाग संशोधन निबंधात वापरला जात नाही, पण तो त्याज्य नसतो. त्या माहितीलाच मी कथारूपाने मांडले आहे, असे त्यांचे म्हणणे. शैक्षणिक संशोधन हे विचारसरणीच्या निष्कर्षांप्रत जाऊ शकते, पण साहित्यात तुम्हाला कशाचे समर्थन करत बसावे लागत नाही. त्यामुळे एक मुक्ततेचा अनुभव येतो. तो पराशर कुलकर्णी यांनी साहित्यातून घेतला. शैक्षणिक संदर्भातील काही दुवे घेऊन कथांची गुंफण करताना एक वेगळा अर्थ शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. पराशर कुलकर्णी मूळ मुंबईचे. त्यांना यापूर्वी राजकीय संशोधनासाठी ब्रिटिश अकादमीचा ब्रायन बॅरी पुरस्कार मिळालेला आहे. साहित्यलेखन त्यांनी औपचारिकता म्हणून सुरू केले, पण नंतर त्याची नसíगक घडण होत गेली. त्यांच्या अप्रकाशित लघुकथेची ४८ देशांतून आलेल्या प्रवेशिकातून निवड झाली हे विशेष. त्यांची लघुकथा ही अनेक वाचकांच्या मनावर मोहिनी टाकणारी तर आहेच, शिवाय त्यांनी खुमासदार शैलीत वाचकांना हसवलेही आहे. त्यांना चित्रपटनिर्मितीतील सहभागात रस आहे. मुंबई व न्यूयॉर्कमधील अनेक फिल्म व टेलिव्हिजन सेट्सवर त्यांनी काम केले आहे. त्यांची ‘काऊ अँड कंपनी’ या कथेतील शैली पु.ल. देशपांडे यांच्या ‘म्हैस’ व ‘पानवाला’ या कथांचा प्रभाव असलेली जाणवते.