07 July 2020

News Flash

प्रदीप सचदेवा

चाँदनी चौकचा जास्तीत जास्त भाग ‘केवळ पादचाऱ्यांसाठी’ असावा, हे स्वप्न अपुरे ठेवूनच ते गेले.

प्रदीप सचदेवा

हे शहर परक्यांनी बांधले- आता मी त्याचा मध्यभागच नव्याने बांधवून भारतीय करेन, असे कुणा सत्ताधाऱ्याने ठरवल्यामुळे शहराची ओळख बदलत नसते. माणसे आणि त्यांचे व्यवहार यांमुळे शहर आकारत जाते, बिघडतेसुद्धा. बिघडत्या शहरांना घडवण्यासाठी सार्वजनिक जागा अत्यंत महत्त्वाच्या. अशा जागांचे अभिकल्पक- म्हणजे पब्लिक स्पेस डिझायनर- अशी ओळख असलेले प्रदीप सचदेवा वयाच्या ६३ व्या वर्षी, हृदयविकाराने गेले. ते दिल्लीत स्थायिक आणि दिल्ली/परिसरावर प्रेमही करणारे. चाँदनी चौकचा जास्तीत जास्त भाग ‘केवळ पादचाऱ्यांसाठी’ असावा, हे स्वप्न अपुरे ठेवूनच ते गेले. पण दिल्लीत असे मोकळे फिरण्याचा नितांतसुंदर अनुभव देणारी त्यांनी केलेली एक रचना, दिल्लीस भेट देणाऱ्या अनेकांना आजही भुरळ पाडते.. ती म्हणजे ‘दिल्ली हाट’!

या ‘दिल्ली हाट’च्या धर्तीवर पुढे अनेक शहरांत ‘हाट’ किंवा ‘रात्री बाजार’ झाले. तोवर प्रदीप सचदेवा आणखी पुढे गेले. गंगटोकच्या मुख्य रस्त्यावरपासून ते लक्षद्वीपच्या वनस्पती उद्यानापर्यंत अनेक जागा त्यांनी बांधल्या किंवा ‘सांधल्या’. मोकळी जागा, निसर्ग, माणसे – त्यांना हवा असलेला अनुभव आणि मानवी सुविधा यांचा सांधा प्रदीप सचदेवा जुळवीत. तोही असा की, ‘आधी का नाही कुणाला सुचले हे?’ असे बहुतेकांना वाटावे!

याचे महाराष्ट्राला जवळचे एक उदाहरण म्हणजे मरिन ड्राइव्हच्या पदपथाचे रुंदीकरण. त्यात नवे ते काय, या प्रश्नाचे उत्तर प्रदीप सचदेवांनी दिले. मरिन ड्राइव्ह होताच ‘आपला’; पण त्याच्या कठडय़ाला दोन पातळय़ा देऊन सचदेवांनी थकल्याभागल्यांना मुंबईचा आधार दिला, कमीअधिक उंचीच्या माणसांना या ‘कंठहारा’शी समपातळीत आणले. पदपथ रुंद झालाच, पण लाटा जिथे जास्त तिथे अधिक रुंद झाला! अशाच प्रकारे नांदेडच्या गोदावरीचा काठ सचदेवांमुळे प्रेक्षणीय, रमणीय झाला. दिल्लीतील ‘गार्डन ऑफ फाइव्ह सेन्सेस’ ही देखील सचदेवांची निर्मिती.

ते मूळचे वास्तुरचनाकार, पण रुडकीच्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थेत (आयआयटी) शिकले. लॉरी बेकर आणि जेफ्री बावा यांच्या देशीवादी आधुनिक रचनांनी प्रभावित झाले, पण पुण्यात ख्रिस्टोफर बेनिंजर यांच्यामुळे शहररचनेची दिशा त्यांना मिळाली. ‘प्रदीप सचदेवा डिझाइन असोशिएट्स’ ही स्वत:ची संस्था त्यांनी १९९० च्या दशकात स्थापली. अनेक हॉटेलांची कामेही त्यांनी केली होती, पण त्यांचा खरा रस होता तो सार्वजनिक जागांचा लोकांसाठी, लोकजीवनासाठी कायापालट घडवण्यात. त्यांच्या निधनाने आपण एका उत्तम अभिकल्पकाला अंतरलो आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 12:01 am

Web Title: pradeep sachdeva profile abn 97
Next Stories
1 मुज्मतबा हुसैन
2 लॅरी क्रेमर
3 गोपाल शर्मा
Just Now!
X