30 November 2020

News Flash

प्रकाश काकोडकर

स्टेट बँकेच्या १९५७ च्या तुकडीतून प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून दाखल झालेले काकोडकर ३१ मार्च १९९७ रोजी अध्यक्ष म्हणून निवृत्त झाले

प्रकाश काकोडकर

देशातील सर्वात मोठय़ा ‘स्टेट बँके’चे माजी अध्यक्ष म्हणून कारकीर्द केलेले प्रकाश (पी. जी.) काकोडकर, रविवारी पणजी येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने निवर्तले. १९५७ ते १९९७ हा त्यांच्या स्टेट बँकेतील कार्यकाळ. गोव्यात प्रतिष्ठित व्यक्तींना साहेब या आदरार्थाने ‘बाब’ म्हणण्याचा प्रघात आहे. (उदा.- कवी बा. भ. बोरकर गोव्याचे, त्यांना ‘बाकीबाब’ म्हणत.) काकोडकर आप्त-मित्रांमध्ये ‘गुरुबाब’ होते. स्टेट बँकेच्या १९५७ च्या तुकडीतून प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून दाखल झालेले काकोडकर ३१ मार्च १९९७ रोजी अध्यक्ष म्हणून निवृत्त झाले. आपल्या कारकीर्दीचा इतिहास त्यांनी ‘माय फोर्टी इयर्स विथ एसबीआय’ या पुस्तकात नमूद केला आहे. ते भारताच्या ४० वर्षांतील बँकिंग सुधारणांचे एक साक्षीदार होते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या अध्यक्षाची सुखदु:खे सांगणारे एक प्रकरण त्यांच्या या पुस्तकात आहे. त्यांच्या आधीचे अध्यक्ष निवृत्त झाल्यानंतर ठीक एक महिन्यानंतर शनिवारी त्यांना वित्त मंत्रालयातून फोन आला की त्यांनी स्टेट बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारावीत. फोन करणाऱ्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला ते म्हणाले : आज शनिवार असल्याने बँक बंद झाली आहे. तेव्हा तो सचिव दर्जाचा अधिकारी म्हणाला की संबंधितांना याबाबत अवगत करण्यात आले असून अधिकारीवर्ग त्यांच्या स्वागताच्या तयारीत आहे. तेव्हा त्यांनी लवकरात लवकर पदाची सूत्रे हाती घेण्यासाठी अध्यक्षांच्या दालनात जावे. त्यांच्या अध्यक्षपदाचा ३१ मार्च १९९७ या शेवटच्या दिवशी त्यांना असाच दिल्लीहून फोन आला की, त्यांनी आपली सूत्रे एमएस वर्मा यांच्याकडे सोपवावी- परंतु माध्यमांना या संदर्भात माहिती देऊ नये- कारण संबंधित प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयात स्वाक्षरीच्या प्रतीक्षेत आहे!

त्यांच्या कारकीर्दीत स्टेट बँकेने ‘जीडीआर’ विक्री केली. स्टेट बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील जीडीआर विकून भांडवल उभारणी करणारी पहिली बँक होती. याच पुस्तकात त्यांनी बहुचर्चित हर्षद मेहता आणि  नगरवाला प्रकरणांबद्दल स्टेट बँकेची बाजू मांडली आहे. गोवामुक्तीनंतर म्हापसा येथील स्टेट बँकेच्या शाखेचे ते पहिले शाखा व्यवस्थापक होते. जगभरात कुठेही गेले तरी गोव्याशी त्यांची नाळ कधीच तुटली नाही. कुठल्याही गोवेकरासारखे त्यांचे तेथील मासे व नारळावर प्रेम होते. बँकेत उच्च पदावर असतानासुद्धा गोव्यात आल्यावर त्यांची पणजीच्या मासळी बाजारात फेरी चुकत नसे. एखाद्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भाषण देऊन आलेले काकोडकर बाजारात कोळणीशी आत्मीयतेने ‘नुस्त्यां’ची चौकशी करीत. एक बँकर म्हणून ते मोठे होतेच परंतु दुसऱ्याला मदत करण्याच्या वृत्तीमुळे माणूस म्हणून ते अधिक थोर होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 12:01 am

Web Title: prakash kakodkar profile abn 97
Next Stories
1 श्री ठाणेदार
2 हेलेन लॅक्स- गिन्सबर्ग
3 टी. एन. कृष्णन
Just Now!
X