29 March 2020

News Flash

अरविंद कृष्ण

दाक्षिणात्य नामसाधर्म्य असले तरी अरविंद कृष्ण हे उत्तरेतील देहरादूनचे आहेत.

भारताच्या उद्योग क्षेत्रातील गौरवास्पद घटना गेल्या आठवडय़ात घडली. आयबीएमसारख्या आंतरराष्ट्रीय आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे जागतिक स्तरावरील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून भारतीय वंशाचे अरविंद कृष्ण यांची नियुक्ती करण्यात आली. नव्या वित्त वर्षांच्या प्रारंभापासून ५७ वर्षीय अरविंद या पदाचा कार्यभार हाती घेतील. संगणक तसेच संबंधित तंत्रस्नेही उपकरणांच्या निर्मिती क्षेत्रातील आयबीएम ही जगातील अव्वल कंपनी. तिच्या सॉफ्टवेअर विभागाची जबाबदारीही त्यांनी हाताळली आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निगसारख्या नवतंत्रज्ञानाचे पुरेपूर ज्ञान असलेल्या अरविंद यांनी समूहात यापूर्वी (२०१८ मध्ये) ‘रेड हॅट’या संगणकप्रणाली कंपनीवरील ताबाप्रक्रिया यशस्वी केली. त्यामुळे ‘आयबीएम’चे बळ वाढले होते.

आयबीएमसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल कंपनीच्या मुख्य पदावरील अरविंद यांच्या नियुक्तीमुळे ते आता मायक्रोसॉफ्ट, अल्फाबेट, अ‍ॅडोब सिस्टिीम्ससारख्या अमेरिकी तोंडवळा असलेल्या कंपन्यांच्या प्रमुखपदी असलेल्या भारतीयांच्या पंक्तीत जाऊन बसले आहेत. वर्षांला सुमारे ७९.५९ अब्ज डॉलर महसूल मिळविणाऱ्या आयबीएमच्या छताखाली जगभरात ३.५० लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनीचे दरडोई महसुलाचे प्रमाण हे भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या तब्बल ११३ पट आहे.

दाक्षिणात्य नामसाधर्म्य असले तरी अरविंद कृष्ण हे उत्तरेतील देहरादूनचे आहेत. वडील सैन्यात होते. अरविंद यांचे प्राथमिक शिक्षण दिल्ली तसेच परिसरातच झाले. आयआयटी-कानपूरमधून त्यांनी अभियांत्रिकी पदवी मिळविली. विदेशातून त्यांनी पीएचडीही प्राप्त केली आणि नव्वदच्या दशकात आयबीएम समूहात दाखल झाले. आयबीएमची एक स्पर्धक असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायणमूर्ती हे ज्या वेळी आयआयटी-कानपूरमधून पदवी घेऊन बाहेर पडले तेव्हा अरविंद कृष्ण यांचा त्याच शिक्षण संस्थेत अभियांत्रिकीच्या पदवी शिक्षणाचा प्रारंभ झाला होता.

आयबीएमच्या अंतर्गत व्यवसायातच कार्यरत असलेले अरविंद यांच्याकडे कंपनीच्या क्लाऊड व्यवसायाची जबाबदारी होती. वायरलेस संपर्क यंत्रणेसाठी ओळखले जाणाऱ्या या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर सध्या जवळपास सर्वच क्षेत्रांत होत आहे. नेमके हेच ओळखून अरविंद यांनी नियुक्तीनंतर लगेचच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या प्रचंड मागणी असलेल्या हायब्रिड क्लाऊड बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करण्याचे जाहीर केले आहे. ही बाजारपेठ थोडी-थोडकी नव्हे तर तब्बल एक लाख कोटी डॉलरची आहे. तुलनेत कमी खर्च आणि जलद वापर होऊ शकणाऱ्या या माध्यमाचा कंपनीच्या विकासाकरिता उत्तमरीत्या उपयोग करून घेण्याची मनीषा त्यांनी व्यक्त केली आहे. कंपन्या, देशाच्या सद्य अर्थस्थितीचे चित्र पाहता अरविंद यांनी याबाबत भाष्य करून ‘कमी खर्चा’तील फायद्याची चुणूकच दाखवून दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2020 12:08 am

Web Title: profile arvind krishna akp 94
Next Stories
1 तुषार कांजिलाल
2 बिली आयलिश
3 डॉ. एम. के. भान
Just Now!
X