‘द व्हेरी हंग्री कॅटरपिलर’ हे त्यांचे बालपुस्तक १९६९ पासून किमान दोन पिढ्यांनी वाचले.  या एका पुस्तकाच्या पाच कोटींहून अधिक प्रती खपल्या. हे पुस्तक ४० भाषांत अनुवादित झाले… पण एरिक कार्ल यांचे कर्तृत्व अर्थातच या एका पुस्तकापुरते नव्हते. १९६७ ते २००७ या ४० वर्षांत ५० हून अधिक चित्रपुस्तके त्यांनी लिहिली, आणखी काही पुस्तकांसाठी केवळ चित्रकार म्हणून काम केले.  इयत्ता पहिलीपर्यंतच्या मुलांसाठी चित्रे अधिक आणि मजकूर कमीतकमी असलेली पुस्तके लिहिण्यात- चित्रमय करण्यात त्यांची प्रतिभा रमली. स्वत:ला ‘चित्रलेखक’- पिक्चर रायटर- म्हणवून घेणारे एरिक कार्ल २३ मे रोजी निवर्तल्याची बातमी २५ मे रोजी प्रसारित झाली.

अंडे- अळी- कोष- फुलपाखरू या अवस्थांवर आधारित ‘द व्हेरी हंग्री कॅटरपिलर’ हे त्यांचे पुस्तक सर्वाधिक गाजले, ते त्याच्या साध्या कल्पनेमुळे. अंड्यातून सोमवारी बाहेर आलेल्या अळीची ही गोष्ट. ती अळी सोमवार ते रविवार, नुसती खात सुटते. एक सफरचंद ते  दहा पाने असा तिचा आहार वाढत जातो.  ही खादाड अळी, मुलांना वारांची आणि अंकांची तसेच फळांची ओळख करून देते आणि वर, फुलपाखराच्या जीवनचक्राचीही माहिती देते! या पुस्तकातील चित्रांसाठी एक खास पद्धत एरिक यांनी वापरली, तीच पुढे त्यांच्या बोधचित्रांची (इलस्ट्रेशन्सची) ‘शैली’ ठरली. रंग लावण्यापेक्षा त्यांनी उपलब्ध रंगीत तुकड्यांचा वापर ‘कोलाज’ पद्धतीने केला. फुलपाखराच्या हिरव्या अळीचे अंग त्यामुळे, तिने खालेल्या पानांचे झाले! या हिरव्या रंगातही किती प्रकार असतात, हेही त्यातून दिसले.

एरिक कार्ल यांचा जन्म अमेरिकेतला, न्यू यॉर्क इथलाच; पण त्यांचे जर्मन वडील हिटलरच्या नादाने १९३५ साली सहकुटुंब मायदेशी आले. तेव्हा एरिक होते सहा वर्षांचे. आधी १९३० ची मंदी आणि मग दुसऱ्या महायुद्धाचे सावट, यांतच गेलेले त्यांचे बालपण, त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘करड्या छटांनीच भरलेले’ होते. ही अतिशयोक्ती नव्हे; खरोखरच युद्धकाळातील इमारती करड्या असत, धूरही पुष्कळ दिसे आणि युरोपीय थंडी तर तेव्हाही रोगट राखाडी रंगाचीच असे. लोकांना अशक्य स्वप्ने दाखवणाऱ्या, अहंमन्य आणि हिंसावादी नेत्यामागे जाणाऱ्यांची जी परवड होते ती एरिकच्या वडिलांची- पर्यायाने कुटुंबाचीही झाली. एरिक कसाबसा, लहान गावात राहू लागल्याने वाचला, पण अवघ्या १५व्या वर्षी त्याला खंदक खोदण्याचे काम करावे लागले. १९४७ मध्ये वडील रशियाच्या कैदेतून सुटल्यावर, जर्मनीच्या फाळणीनंतर १९५२ साली एरिक यांनी पुन्हा अमेरिकेत येऊन जम बसवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र आवडते, चित्रे काढण्याचे काम मिळेस्तोवर वयाची चाळिशी उजाडली!

बालपणी ज्या आनंदाला एरिक मुकले, तो जणू दामदुपटीने वसूल केल्यागत त्यांच्या चित्रपुस्तकांनी स्वत: मिळवला आणि हजारो बालकांना दिला.अस्वल, मांजर, वाघ, माकड, कांगारू, कोकरू, अनेक पक्षी हे तर त्यांच्या पुस्तकांत आलेच पण  रातकिडा, ऑक्टोपस, खेकडा, साप आदी – एरवी मुले ज्यांना घाबरतील अशा- कीटक वा सरिसृपांनाही त्यांनी मुलांचे जानी दोस्त केले! उत्तरायुष्यात, अगदी नव्वदी उलटल्यावरही ते कागदावर चित्रे काढत. eric-carle.com वर आवर्जून पाहावीत अशी ती चित्रे, जणू लहानग्या कल्पक मुलांनी काढलेलीच वाटतात!