News Flash

ज. शं. आपटे

लोकसंख्याविषयक अनेक विषयांवर त्यांनी ‘लोकसत्ता’मधून लेखन केले होते.

चीनने एकेकाळी सक्तीने कुटुंबनियोजनाची अंमलबजावणी केली व आता तेथील सरकार दोन मुलांच्या जन्माला परवानगी देत असताना कुणालाच दोन मुले नको असल्यासारखी स्थिती आहे. जपानमध्ये वृद्धांची संख्या इतकी आहे की, त्यांची काळजी घेण्याची समस्या गंभीर बनत आहे. भारतात आता तरुणांची संख्या जास्त असली तरी हे मनुष्यबळ खरोखर देशाला प्रगतीकडे घेऊन जाणार की नाही असा प्रश्न आहे.. यावर उत्तरे शोधणारे लोकसंख्याशास्त्र वाटते तेवढे सोपे नाही. या लोकसंख्याशास्त्राचे गाढे अभ्यासक जनार्दन शंकर आपटे यांचे नुकतेच निधन झाले त्यामुळे या क्षेत्रातील जुने जाणते व्यक्तिमत्त्व हरपले आहे.

लोकसंख्याविषयक अनेक विषयांवर त्यांनी ‘लोकसत्ता’मधून लेखन केले होते. लोकसंख्या हा विषय तसा आकडेमोडीशीही निगडित असल्याने त्यात गणिती अचूकता लागते, त्याही खाचाखोचा त्यांना माहीत होत्या. विद्वत्तेचा बडेजाव त्यांनी कधी मिरवला नाही. शेवटपर्यंत त्यांची लेखनाची उमेद कायम होती. ‘फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया’ या संस्थेत ते ४० वर्षांहून अधिक काळ सक्रिय होते. मुंबई येथील टाटा समाज विज्ञान संस्थेतून समाजशास्त्र विषयात पदवी संपादन केलेल्या आपटे यांनी  अनेक पुस्तकांच्या माध्यमातून आपले सामाजिक विचारही मांडले. ‘सलाम व्हिएतनाम’ या त्यांच्या पुस्तकाने लोकप्रियता मिळवली. त्यांनी डॉ. नूरजहाँ साफिया नियाझ यांच्यासह मुंबईतील मुस्लीम स्त्रियांची घुसमट शब्दांतून व्यक्त करणाऱ्या, ‘मोकळ्या श्वासाच्या शोधात’ या पुस्तकाचे लेखन केले. ‘छोटं कुटुंब’ संकल्पनेच्या शिल्पकार आवाबाई वाडिया यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे ‘आवाबाई’ हे पुस्तकही अत्यंत वेगळ्या स्वरूपाचे आहे. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या १६ वर्षे कार्यवाह आणि ३४ वर्षे अध्यक्ष असलेल्या आवाबाई वाडिया यांनी कुटुंबनियोजनाच्या चळवळीत ज्या निष्ठेने व तळमळीने काम केले. ज. शं. आपटे यांनी वाडिया यांच्यासमवेत असोसिएशनमध्ये काम केले. वाडिया यांचे काम त्यांनी जवळून बघितले होते. या छोटेखानी चरित्रात वाडिया यांचे अफाट काम नेमकेपणाने मांडले आहे. ‘कुटुंबनियोजन कार्याची ६० वर्षे’, ‘महाराष्ट्राची लोकसंख्या – नियोजन आणि विकास’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘भारतातील महिला विकासाची वाटचाल’ या पुस्तकातून महिला विकासाचा वेध त्यांनी घेतला.

लोकसंख्याशास्त्रज्ञ या नात्याने त्यांनी लेखन तर केलेच पण प्रत्यक्ष कुटुंबनियोजनाच्या सामाजिक कार्यातही ते अग्रेसर राहिले, त्यांच्या निधनाने एक व्यासंगी लेखक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ता हरपला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 1:41 am

Web Title: profile j s aapte akp 94
Next Stories
1 श्यामकांत जाधव
2 अनुराधा पाटील
3 मरी फ्रेडरिक्सन
Just Now!
X