News Flash

मीना वांगीकर

एकूणच मराठी माणसाच्या मनात परभाषांबद्दल फारसे प्रेम असत नाही.

साहित्याने अतिशय समृद्ध असलेल्या कन्नड भाषेतील उत्तमोत्तम कलाकृतींना मराठी भाषेचा रंग चढवून त्या मराठी वाचकांपर्यंत पोहोचवणाऱ्या अनुवादकांमध्ये मीना वांगीकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. एकूणच मराठी माणसाच्या मनात परभाषांबद्दल फारसे प्रेम असत नाही. त्यातून दक्षिणी भाषांबद्दल तर अनेकदा तिटकाऱ्याचीच भाषा केली जाते. त्यामुळे त्या प्रांतांमधील उत्तमोत्तम साहित्य मराठीत आणणे हा भाषांच्या सहोदरत्वाचा अपूर्व अनुभव होऊ शकतो. कन्नडला मराठीपेक्षा अधिक ज्ञानपीठ पारितोषके मिळाली आहेत आणि तरीही मराठी माणसाला त्या भाषेबद्दल इंग्रजीएवढी प्रीती नाही, हे नाकारण्यात अर्थ नाही.

मीना वांगीकर यांनी स्वत: साहित्य निर्माण केले नसले, तरीही त्यांची साहित्याची जाण अतिशय वरच्या दर्जाची होती. त्यांचे वडील व्ही. एम. इनामदार हे कन्नडमधील एक महत्त्वाचे साहित्यिक होते. त्यामुळे बालपणापासूनच साहित्याशी झालेली ओळख आणि धारवाडसारख्या कर्नाटकातील अस्सलपणासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरात झालेले शिक्षण, यामुळे मीनाताईंना या क्षेत्रात काही करावेसे वाटणे स्वाभाविक होते. कोणत्याही साहित्याचा अनुवाद किंवा भाषांतर करताना, नेहमी भेडसावणारा प्रश्न त्या त्या प्रांताच्या संस्कृतीशी ओळख असण्याचा असतो. मीनाताईंबाबत ती संस्कृती अतिशय जवळची होती. मराठी वाचकांना जी. ए. कुलकर्णी यांच्या साहित्यातून कर्नाटकातील लोकसंस्कृतीचा जो परिचय झाला, तसाच तो अनेक कलाकृतींच्या अनुवादामुळेही झाला. मीनाताईंचा व्यासंग दांडगा असल्याने त्यांना कन्नड, मराठी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व प्रस्थापित करता आले. डॉ. शिवराम कारंथ यांच्या ‘मुकज्जी’ या कादंबरीचा त्यांनी केलेला अनुवाद गाजला, याचे कारण नेमके हेच होते. भाषा मराठी असली, तरीही आपण जणू कर्नाटकाचेच रहिवासी आहोत, असे वाटण्याएवढा गडद अनुभव मीना वांगीकर यांच्या अनुवादातून येतो. दोन संस्कृतींचा हा मिलाफ केवळ आदान-प्रदानानेच वाढू शकतो, हे जाणवल्यामुळे आणि मराठी साहित्यावर अगदी संत ज्ञानेश्वरांपासून कन्नड साहित्याचा असलेला प्रभाव लक्षात घेतल्याने या भाषांतराला आणखी उंची प्राप्त होते.
‘ब्रह्मांड’, ‘धूमकेतू’, ‘स्त्री माझे नाव’, ‘बंड’ यांसारख्या अनुवादामुळे मराठी साहित्य अधिक समृद्ध झाले आणि त्याचे श्रेय मीना वांगीकर यांच्यासारख्या साहित्यिकालाच द्यायला हवे. त्यांच्या निधनाने कन्नड-मराठी स्नेहसंवर्धनातील एक महत्त्वाचा पूल कोसळला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2015 12:55 am

Web Title: profile of meena wangikar
Next Stories
1 जुगल किशोर
2 शमशाद हुसेन
3 डॉ. रॉबर्ट व्हाईट
Just Now!
X