‘कलेतील भारतीयता’ हा विषय विसावे शतक सुरू झाले तेव्हापासूनच चर्चेचा ठरला आणि मग स्वातंत्र्यपूर्व काळात त्यावर उत्तर म्हणून, अजिंठा हा आदर्श ठरला आणि लघुचित्रांच्या भारतीय शैलींनीही वाट दाखवली! त्याच सुमारास राजा रविवर्मा यांनी दाखवलेला पाश्चात्त्य शैलीने भारतीय विषयांच्या चित्रणाचा मार्गही रुंदावला. पण भारतीय हस्तकला आणि लोककला यांपासून हे मार्ग फटकूनच राहिले होते. विषय कोणतेही असोत, पण भारतीय लोककलांचे व हस्तकलांचे (क्राफ्ट) मर्म जाणून आधुनिक काम करावे, हा रस्ता अनेकांच्या पायवाटांनी रुळत गेला… त्यांपैकी एक पायवाट शोधली होती विश्वनाथ सोलापूरकर यांनी! ८ जून रोजी, वयाच्या नव्वदीत ते निवर्तले, ही वार्ता मुंबईचे ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’ आणि म्हैसूरचे ‘कावा’ (चामराजेंद्र अ‍ॅकॅडमी ऑफ व्हिज्युअल आर्ट्स) या दोन संस्थांतील दोन पिढ्यांना चुटपुट लावणारी ठरली.

सोलापूरकर सर ‘जेजे’त रंगकला विभागात प्रामुख्याने स्थिरचित्रण आणि निसर्गचित्रण हे विषय शिकवत. कधी व्यक्तिचित्रणाचेही मार्गदर्शन करत. त्यांचे त्या वेळचे विद्यार्थी आज साठीपार गेले आहेत, पण यांपैकी बहुतेकांना सर आठवतात दोन कारणांसाठी : एक म्हणजे प्रोत्साहन देण्याची त्यांची पद्धत आणि दुसरे म्हणजे, ‘चित्र कधी थांबवावे?’ ‘चित्र पूर्ण झाले असे कधी समजावे?’ याबद्दलची अचूक समज विद्यार्थ्यांनाही देण्यातली त्यांची हातोटी! १९८२ मध्ये ‘कावा’चे संस्थापक- अधिष्ठाता होण्यासाठी त्यांना खास मुंबईहून म्हैसूरला बोलावले गेले (महाराष्ट्रीय कलेतिहासात याआधीचे असे उदाहरण म्हणजे, रंगसम्राट ना. श्री. बेन्द्रे हे बडोद्यात महाराजा सयाजीराव विद्यापीठाचा दृश्यकला विभाग घडवण्यासाठी निमंत्रित झाले होते). सोलापूरकर मूळचे विजापूरच्या द्वैभाषिक कुटुंबातले, त्यामुळे त्यांनी म्हैसुरातही विद्यार्थ्यांशी सहज-संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या नकळत त्यांचे प्रोत्साहन मिळत असे, दृश्यकलेची कोणतीही शैली त्यांना वर्ज्य नसे, अशा आठवणी ‘कावा’तून शिकून मोठे झालेल्या अनेकांकडे आहेत. ‘जेजे’चे ममत्व सोलापूरकरांना असल्याने, मुंबईच्याही अनेक चित्रकारांना ‘कावा’त निमंत्रणे मिळत. वारली चित्रकला-अभ्यासक भास्कर कुलकर्णी यांनी स्वत:च्या नोंदवह्या विश्वासाने त्यांच्याकडे सुपूर्द केल्या होत्या. निवृत्तीनंतर त्यांच्या कलेस बहर आला. म्हैसूरच्या प्रसिद्ध ‘वूड इन्ले’ (लाकूड खोदून, त्यात विविधरंगी लाकडाचे तुकडे बसवून प्रतिमांकन) या हस्तकलाशैलीत त्यांनी स्थिरचित्रे, निसर्गचित्रे आणि रचनाचित्रे (कॉम्पोझिशन) केली. ही चित्रे आधुनिकतावादी कलेच्या भारतीय रूपाचा नवा साक्षात्कार घडवणारी ठरली.