News Flash

यशपाल  शर्मा

भारतासमोर त्या सामन्यात विजयासाठी २१४ धावांचे लक्ष्य होते.

भारतीय आणि जागतिक क्रिकेटला नाट्यमय वळण देणाऱ्या, १९८३ मधील विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघाला पुढे ‘कपिल्स डेव्हिल्स’ असे संबोधले जाऊ लागले. कपिलदेव यांच्या नेतृत्वाखालील त्या संघाचा विश्वचषक दिग्विजय अभूतपूर्व आणि पूर्णतया अनपेक्षित असाच होता. परंतु त्या संघात कपिल यांचे सहकारी ‘डेव्हिल्स’ म्हणावे असे नक्कीच नव्हते. कपिलदेव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर गुणसमृद्ध व्यक्तिमत्त्वे; तसेच नैसर्गिक गुणवत्ता असलेले मोहिंदर अमरनाथ, संदीप पाटील, के. श्रीकांत वगळता उर्वरित मंडळी नैसर्गिक गुणवत्तेपेक्षा लढाऊ चिवटपणावर भर देणारी होती. कपिलदेव यांनी त्यांच्यात विश्वास फुंकला, तरी अंतिम वाटचाल त्यांची त्यांनाच करावी लागणार होती. बलविंदरसिंग संधू, रॉजर बिन्नी, मदनलाल, यशपाल शर्मा ही ठळक लक्षात येतील अशी नावे. या यादीतील शेवटचे नाव- यशपाल शर्मा- यांचे परवा आकस्मिक निधन झाले. पूर्णतया संघभावनेशी एकात्म, वलयाच्या वाटेलाही न जाणाऱ्या, बेडर क्रिकेटपटूंची या देशाला एक मोठी परंपरा लाभलेली आहे. यशपाल शर्मा हे त्या माळेतील खणखणीत रत्न! विश्वचषक १९८३ स्पर्धेच्या काही आठवडे आधी भारताचा वेस्ट इंडिज दौरा होता. त्या दौऱ्यात वेस्ट इंडिजच्या तोफखान्यासमोर पहिल्या कसोटीत यशपाल यांनी झुंजार ६३ धावा काढून भारतीय डाव ७ बाद १०८ या अवस्थेतून सावरण्याचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या कसोटी सामन्यात माल्कम मार्शलचा वेगवान चेंडू छातीवर बसल्यामुळे त्यांना जायबंदी निवृत्त व्हावे लागले होते. पण दुसऱ्या डावात न डगमगता त्या तोफखान्यासमोर उभे राहून त्यांनी सामना वाचवला. विश्वचषक सुरू झाल्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यातील भारताचा विजय आत्मविश्वास वाढवणारा होता. त्या सामन्यात मोलाच्या ८९ धावा करणारे होते यशपाल शर्माच. त्यांचे त्याहीपेक्षा अधिक मोलाचे योगदान दिसून आले, त्या स्पर्धेतील उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध.

उपांत्य सामन्यापर्यंतची भारताची मजल हीच स्वप्नवत होती. त्या सामन्यात यजमान संघासमोर खेळताना मानसिक खंबीरपणाची गरज होती. कारण बऱ्याचदा फारशी अपेक्षा नसलेले संघ एखाद्या स्पर्धेत बरीच मोठी मजल मारतात, त्या वेळी त्या आनंदात हुरळून जाऊन पराभूत होण्याचे निसरडे प्रसंग बरेच येतात. भारतासमोर त्या सामन्यात विजयासाठी २१४ धावांचे लक्ष्य होते. लक्ष्य तसे माफक, पण धोकादायक. यशपाल आणि मोहिंदर यांची जोडी मैदानात होती आणि धावांचा वेग वाढवण्याची गरज होती. यशपाल यांनी पॉल अ‍ॅलटच्या गोलंदाजीवर एक षटकार चढवला. पण त्यांचा पुढील षटकार विशेष गाजला. तो होता साक्षात बॉब विलिस यांच्या गोलंदाजीवर. विलिस यांचा यॉर्कर यशपाल यांनी पावलांची चपळ हालचाल करून लाँगलेगवरून भिरकावून दिला. त्या दोन फटक्यांनी भारतावरील दडपण दूर झाले आणि विजयाचा मार्ग सुकर झाला. यशपाल यांची ३३ धावांची कसोटी सरासरी फार देदीप्यमान नव्हती. पण अडीअडचणीत भारताच्या मदतीला धावून जाणारे ‘क्रायसिस मॅन’ ही सुनील गावस्कर यांनी बहाल केलेली उपाधी त्यांच्यासाठी गौरवापेक्षा कमी नव्हती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 12:01 am

Web Title: profile yashpal sharma akp 94
Next Stories
1 पी. के. वारियर
2 श्याम सुंदर जानी
3 डॉ. एशी नेगिशी