महाराष्ट्राचा वारसा जपणाऱ्या कुस्तीसारख्या क्रीडा प्रकारात राहुल आवारेने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे कांस्यपदक जिंकणे, हे राज्यासाठी अभिमानास्पद आहे. १९५२ मध्ये हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्याच खाशाबा जाधव यांनी कांस्यपदक जिंकण्याची किमया साधली होती. भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून देण्यात महाराष्ट्राचेच योगदान होते! जाधव यांची कुस्तीमधील परंपरा महाराष्ट्राच्या अनेक मल्लांनी पुढे चालवली. परंतु कालांतराने कुस्तीमधील मक्तेदारी पुढे उत्तरेकडील राज्यांकडे गेली. त्यामुळे महाराष्ट्राचा आलेख घसरत चालला असताना राहुलने मिळवलेले हे जागतिक पदक राज्यातील कुस्ती क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

राहुल बीड जिल्ह्य़ातील पाडोदा गावचा. बालपणी राहुल शीघ्रकोपी होता. त्याच्या याच स्वभावामुळे गावकरी तक्रारी घेऊन त्याचे घर गाठायचे. त्याच्या रागाच्या ऊर्जेचा योग्य उपयोग करण्यासाठी कुस्तीची आवड असलेल्या वडिलांनी त्याला कुस्तीकडे वळवले. पुढे राहुललाही या खेळाची आवड निर्माण झाली. ‘रुस्तम-ए-हिंद’ पै. हरिश्चंद्र बिराजदार यांच्या गोकुळे तालमीत प्रशिक्षण घेण्यासाठी २००७ मध्ये तो पुण्यात आला. २००८ मध्ये पुण्यात युवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्णपदक जिंकले. मग २००९ मध्ये कनिष्ठ आशियाई सुवर्णपदकाची कमाई केली. त्यामुळे नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सहभागासाठी तो उत्सुक होता; परंतु त्याची भारतीय संघात निवड न झाल्यामुळे ती संधी गेली. २०११ च्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धामध्ये राहुलने कांस्यपदक जिंकले; परंतु त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्षितिजावरून तो गायबच झाला. देशातील कुस्तीमधील उत्तरेकडील वर्चस्व, राजकारण आणि दुखापतींमुळे त्याच्या कारकीर्दीचे नुकसान झाले. मग २०१४ च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेसाठी त्याने प्रयत्न केले; पण भारतीय कुस्ती महासंघाने निवड चाचणी टाळून आधीच्या कामगिरीआधारे संघनिवड केल्याने पुन्हा राहुलची निराशा झाली. २०१२ मध्ये बिराजदार यांचे निधन झाले. त्यामुळे राहुलने पुण्यातच काका पवार यांचे मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेतला. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकसाठी राहुलचा सहभाग निश्चित मानला जात होता; परंतु संघटनेने संदीप तोमरला ऑलिम्पिक पात्रतेच्या जागतिक स्पर्धेसाठी पाठवून राहुलवर अन्याय केला. संघटनेच्या या धोरणामुळे संतप्त झालेल्या राहुलने निवड समितीवर टीका करीत परदेशातील प्रशिक्षण शिबीर सोडले. त्यामुळे त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. मात्र, २०१८ हे वर्ष राहुलच्या कारकीर्दीसाठी दिलासा देणारे ठरले. दुखापतीवर मात करीत त्याने राष्ट्रकुल सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम दाखवला. त्यानंतर वर्षभरात मिळवलेले हे जागतिक पदक राहुलच्या २०२० ऑलिम्पिकच्या आशा उंचावणारे ठरेल, हीच महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राची आशा आहे.