‘अ‍ॅथलेटिक्समधील भीष्माचार्य’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राम भागवत यांनी जवळपास ४० वर्षांपूर्वी अ‍ॅथलेटिक्समधील नियमावली मराठीत भाषांतरित केली. त्या वेळी काळाची गरज असल्याचे ओळखून भागवत आणि रमेश तावडे यांनी या नियमांची बारीकसारीक माहिती क्रीडा शिक्षकांपर्यंत या पुस्तकाद्वारे पोहोचवली. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसून आला. राज्यातील क्रीडाशिक्षकांना जटिल अशा या नियमांची मायबोलीतून माहिती मिळाल्याने त्यांच्याकडूनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम होऊ लागले. महाराष्ट्रातील पदकांची संख्याही वाढू लागली. जागतिक दर्जाच्या खेळाडूंची माहिती असलेले त्यांचे पुस्तक यावर्षी प्रकाशित होणार होते. पण त्याआधीच, वयाच्या ९१व्या वर्षी त्यांचे निधन  झाले.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
curiosity about indians performance in paris olympic
अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला

पतियाळातील राष्ट्रीय क्रीडा संस्थेचे (एनआयएस) ते पहिल्या तुकडीचे प्रशिक्षक. अ‍ॅथलेटिक्स मार्गदर्शक, प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय पंच, समीक्षक आणि लेखक अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडून भागवत यांनी अ‍ॅथलेटिक्ससाठी संघटनात्मक कार्यही केले. पुण्यात अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्याचबरोबर २००८साली पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या युवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनातही त्यांनी भरीव कार्य केले. स्वत: शिस्तबद्ध आणि शिस्तीचे भोक्ते असलेल्या भागवत यांनी अनेक खेळाडू घडवले. त्याचबरोबर क्रीडा मार्गदर्शकांना वेळोवेळी मार्गदर्शनही केले. लहानमोठ्यांचा खूप आदार करणारे भागवत अनेक शिबिरे, व्याख्याने व परिसंवादांसाठी हजर राहात. तेही अनेकदा, कोणत्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता. आपल्याकडील ज्ञानाचा ठेवा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी भागवत सदैव तत्पर असत.

शिस्तीसोबतच साधेपणाही त्यांच्या स्वभावात होता. खेळाडूंनी विशिष्ट प्रकारचा आहार घेण्यासाठी अडून बसण्यापेक्षा आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पदार्थांवर भर द्यावा, या मताचे भागवत होते. आहाराविषयीची इत्यंभूत माहिती ते खेळाडूंना देत असत. वयाच्या नव्वदीतही त्यांचा कामाचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. वयाच्या ८५व्या वर्षीपर्यंत ते दररोज चालण्याचा सराव करत.  बोलणे कमी असले तरी अ‍ॅथलेटिक्सचा क्रीडाज्ञानकोषकार आणि तांत्रिक खेळाची खडान्खडा माहिती असलेला जाणकार म्हणून ते ओळखले जात. महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेने त्यांच्या या कार्याची दखल घेत जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित केले होते.