भारतात सचेतपटाची म्हणजेच ‘अॅनिमेशन फिल्म’ची सुरुवात १९५६ साली ‘फिल्म्स डिव्हिजन’च्या मुंबईतील स्टुडिओत, अमेरिकी सरकारने भारतास भेट दिलेला ‘अॅक्मे रोस्ट्रम कॅमेरा’ वापरून झाली आणि त्या पहिल्या भारतीय सचेतपटाचे श्रेय जहांगीर (ज्याँ) भावनगरी यांना जाते हे खरे असले; तरी त्या पहिल्यावहिल्या प्रयत्नापासून भारतीय सचेतपटांच्या प्रगतीत मोठा वाटा असणारे म्हणून एकच नाव निर्विवादपणे घेतले जाते : राम मोहन! ‘भारतीय सचेतपटांचे जनक’ असे राम मोहन यांना म्हटले जाते, ते अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले आणि संगणकाच्या काळातदेखील तंत्रावर हुकमत कायम ठेवली म्हणून. या राम मोहन यांचे शुक्रवारी, ११ ऑक्टोबर रोजी निधन झाल्याने भारतीय सचेतपट-सृष्टीत पोरके झाल्याची भावना उमटली.
फिल्म्स डिव्हिजनचा ‘कार्टून फिल्म विभाग’ १९५६ साली सुरू झाला, त्याच वर्षी राम मोहन या संस्थेत रुजू झाले. त्याआधी चित्रपट संकलनाचे प्रशिक्षण त्यांनी घेतले होते. अमेरिकेने केवळ कॅमेरा भेट न देता, भारतात जन्मलेले आणि डिस्ने स्टुडिओत काम करणारे अॅनिमेटर क्लेअर वीक्स यांना प्रशिक्षक म्हणून मुंबईस पाठविले. भावनगरी हे तोवर पॅरिसहून शिकून आले होते. नवे तंत्र राम मोहन यांनी सहज आत्मसात केलेच, पण प्रशिक्षण काळातच डिस्नेच्या ‘बॅम्बी’ हरिणीला भारतीय रूप देऊन, ‘बनयान डीअर’ हा सचेतपट केला. पुढे अगदी ‘कम्पोस्ट खताचा खड्डा कसा खणावा’ याही विषयावर त्यांनी सचेतपट बनविले, पण १९६८ साली ‘मोजीराम के सपने’ या सचेतपटाला लोकांनी हशा-टाळ्यांची, तर महोत्सवांनी पुरस्कारांची दाद दिली. ‘काहीच प्रगती नाही’ म्हणणारा मोजीराम स्वातंत्र्योत्तर २० वर्षांच्या काळातील प्रगती पाहण्यासाठी डोके वर करतो, तर तेव्हा विकासाची झेप पाहताना त्याचे पागोटे गळून पडते, हा दृश्यक्रम (सीक्वेन्स) अजरामर ठरला! त्याच वर्षी (१९६८) त्यांना कॅनडाला जाऊन, सचेतपटकार नॉर्मन मॅक्लॉरेन यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाली. मद्रासच्या एल.व्ही. प्रसाद स्टुडिओत तेव्हाच सचेतपटांची ‘ऑक्सबेरी’ यंत्रणा आयात झाली आणि पहिले पाचारण राम यांना झाले; पण ‘मुंबईच बरी’ म्हणत बडय़ा खासगी नोकरीची संधी त्यांनी नाकारली. मात्र १९७२ सालापासून बाहेरची कामे त्यांनी फावल्या वेळात स्वीकारली. १९९५ साली त्यांनी ‘ग्राफिटी अॅनिमेशन’ हा स्टुडिओ स्थापला, त्यातून ‘ग्राफिटी अॅनिमेशन स्कूल’चीही स्थापना झाली. ‘कम्युनिकेशन आर्टिस्ट्स गिल्ड’च्या कारकीर्द-गौरवाने जाहिरातविश्वाचा सर्वोच्च भारतीय पुरस्कार त्यांना मिळालाच, पण १९९६ साली मुलींना वाढविण्या-शिकविण्यासाठी दक्षिण आशियात जनजागृती करणाऱ्या ‘मीना’ या १३ भागांच्या सचेतपट-मालिकेचे काम युनेस्कोने राम यांनाच दिले. ‘बाप रे बाप’ (१९६९) या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सचेतपटापासून सामाजिक संदेश देणाऱ्या सचेतपटांत राम मोहन यांचे प्रभुत्व वारंवार सिद्ध झाले होते. शिवाय सत्यजित राय (सतरंज के खिलाडी), बी. आर. चोप्रा (पती, पत्नी और वो) या दिग्दर्शकांनी, चित्रपटांतील सचेत-दृश्यक्रम राम यांच्याचकडून बनवून घेतला.
‘रामायण’ या सचेतपट-मालिकेने (१९९२) भारतीय सचेत-पात्रांचे जे रंगरूप घडविले, ते आजतागायत (छोटा भीम आदी) कुणालाही ओलांडता आलेले नाही. ‘पद्मश्री’ किताब त्यांना २०१४ मध्ये मिळाला होता.