News Flash

रवींद्र साळवे

शिक्षणासाठी पुण्या-मुंबईत ते आले आणि पुढे विख्यात चित्रकर्ती प्रफुल्ला डहाणूकर यांचे स्टुडिओ-सहकारी झाले.

‘तुमची चित्रे पाहून आधी वाटले तुम्ही बंगाली असाल!’ यासारख्या स्तुती-म्हणू-की-निंदा प्रकारच्या अभिप्रायानंतर, चित्रकार रवींद्र साळवे यांचा मूळचा हसतमुख चेहरा अधिक हसरा होई. हा अभिप्राय देणाऱ्याकडे खटय़ाळ, पण जरबदार कटाक्ष त्या हसऱ्या डोळ्यांतून टाकला जाई. प्रकृती खालावत असताना, वजन उतरले असतानाही अशा नजरेमुळे रांगडेच भासणारे रवींद्र साळवे रविवारी, ७ मार्च रोजी अल्प आजाराने निवर्तले.

कलाशिक्षण जरी महाराष्ट्रातच घेतले असले, तरी देशभरातील कला पाहून, अनुभवून मगच रवींद्र साळवे यांच्या स्वतंत्र कारकीर्दीला सुरुवात झाली होती. हेही एक कारण असेल; पण शैलींचे प्रभाव कसे टाळावे हे त्यांना माहीत होते. त्यामुळेच त्यांच्या चित्रांतील मानवाकृतींचे ओठ, नाक,  डोळे हे बंगाली कलावंतांची आठवण करून देणारे, पण लयदारपणाला अलंकारिकतेची जोड देताना जराही न कचरण्याचा गुण थेट दाक्षिणात्य नवचित्रकारांशी जुळणारा. तुटक रेषांचा वापर अलंकरणासाठी- किंबहुना सजावटीसाठी रवींद्र साळवे यांनी जरूर केला; पण मुख्य आकृती मात्र सलग रेषेने चित्रित करून दिवंगत मोहन सामंतांची आठवण दिली. पांढऱ्या पार्श्वभूमीवर ठळक रेषा आणि तजेलदार रंगांमध्ये रंगवलेली रवींद्र साळवे यांची चित्रे जरी कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक रंगांनी रंगवलेली असली, तरी भिंतीवरील उठावदार चित्रे (म्यूरल्स) चा भास या चित्रांच्या एकंदर रचनेतून होई. रवींद्र साळवे यांचा जन्म १९५६ सालचा, श्रीरामपुरातला. शिक्षणासाठी पुण्या-मुंबईत ते आले आणि पुढे विख्यात चित्रकर्ती प्रफुल्ला डहाणूकर यांचे स्टुडिओ-सहकारी झाले. ‘जहांगीर आर्ट गॅलरी’त त्यांची एकल प्रदर्शने १९८२ पासून साधारण दर दोन-तीन वर्षांनी भरली आणि याच काळात त्यांना बॉम्बे आर्ट सोसायटी, महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शन आदी वार्षिक प्रदर्शनांत बक्षिसेही मिळत राहिली. मात्र खासगी कलादालनांत ते  १९९९ नंतरच आले. तोवर मुंबईतील बॉम्बे आर्ट सोसायटी आर्टिस्ट्स सेंटर या कलासंस्थांखेरीज, दिल्लीच्या (केंद्रीय) ‘ललित कला अकादमी’चे कार्यकारिणी सदस्यपदही त्यांना मिळाले होते. या संस्थाजीवनात एरवी भल्याभल्यांचा श्वास कोंडतो, पण रवींद्र साळवे यांनी गांभीर्य किती पाळायचे आणि किती ‘लाइटली’ घ्यायचे, याचा समतोल राखून सारेच निभावून नेले. इतके की, सत्तापालटानंतरही ते ‘ललित कला अकादमी’साठी महत्त्वाचेच राहिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2021 1:02 am

Web Title: ravindra salve profile zws 70
Next Stories
1 शोवन चौधुरी
2 पालघाट पी. वैद्यनाथन
3 प्रभात शर्मा
Just Now!
X