News Flash

‘राइस’ महादेवप्पा

महादेवप्पा यांनी तांदळाची किमान नऊ प्रगत वाणे तयार केली होती.

‘राइस’ महादेवप्पा

त्यांचे खरे नाव मदाप्पा महादेवप्पा. तांदळावर केलेल्या संशोधनामुळे त्यांना राइस महादेवप्पा याच नावाने लोक ओळखत! कमी पाण्यात जास्त उत्पादन देणारे तांदळाचे संकरित वाण त्यांनी तयार केले होते. तांदूळ या पिकासाठी पाणी जास्त लागते; त्यामुळे त्यांचे हे संशोधन तांदळाच्या उत्पादनाची दिशा बदलणारे ठरले. धारवाडच्या कृषी विज्ञान विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. कृषी वैज्ञानिक निवड मंडळावरही त्यांनी काम केले. त्यांना पद्माभूषण व पद्माश्रीने गौरवण्यात आले होते. महादेवप्पा यांनी तांदळाची किमान नऊ प्रगत वाणे तयार केली होती. पार्थेनियम या तणाच्या नियमनातही त्यांनी मोठी कामगिरी पार पाडली.

कर्नाटकमध्ये मदापुरा या गावात त्यांचा जन्म १९३७ मध्ये झाला. चामराजनगर येथे त्यांचे शिक्षण पालिकेच्या शाळेत झाले. म्हैसुरूतील शारदा विलास महाविद्यालयातून कृषी विज्ञानात पदवी घेऊन बेंगळूरुहून एमएस्सी व कोइम्बतूर येथून ते पीएच.डी. झाले. भात म्हणजेच तांदळाची संकरित वाणे तयार करण्यामागे त्यांचा कमी पाण्यात जास्त उत्पादन हा उद्देश होता. पाण्यावरून कावेरी तंट्यासारखे वाद झाले. इतरही ठिकाणी असे जलतंटे आहेत. त्यावर पाणी वाचवणे हा उपाय आहे असे त्यांचे मत होते. चीनमधील तांदळाच्या प्रजाती जास्त उत्पन्न देणाऱ्या आहेत व त्याला जमीन व पाणीही कमी लागते. भारतात तांदळाचे उत्पादन एकरी २० क्विंटलपेक्षा कमी आहे. भारतातील संकरित वाणांचे उत्पादन ३२.४ ते ३६.४ क्विंटलच्या आसपास आहे. त्यामुळे एकरी उत्पादन कमी पाणी वापरून वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. एक किलो तांदूळ उत्पादनाला १६४३ लिटर पाणी लागते. तेवढ्या पाण्यात चार एकर क्षेत्रात नाचणी, भुईमूग, सूर्यफूल यांचे उत्पादन घेता येते. संकरित वाणांमुळे बरीच जमीन व अतिरिक्त पाणी इतर पिकांसाठी वापरता येईल हे त्यांनी दाखवून दिले. चीनने हा प्रयोग १९८० मध्येच यशस्वी केला आहे. त्यांनी पुसा व बॅसॉल्टिक १ या तांदळाच्या प्रजाती तयार केल्या. या प्रजाती १५ ते २५ दिवसांत तयार होतात व २५ टक्के पाणी वाचते. हुकर पुरस्कार, कर्नाटक सरकारचा राज्योत्सव पुरस्कार, कन्नड विज्ञान लेखक पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले. इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक्स अ‍ॅण्ड प्लांट ब्रीडिंग, नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सेरीकल्चर, इंडियन सोसायटी ऑफ सीड टेक्नॉलॉजीज, इंडियन सायन्स रायटर्स असोसिएशन या संस्थांचे ते सदस्य होते. कावेरी लवादाच्या तांत्रिक समितीत ते काम करीत होते, त्यांनी कावेरी तंटा सोडवण्यासाठी अनेक प्रस्ताव मांडले होते, पण वैज्ञानिकांच्या मताचा मान राखला जात नाही, असे त्यांचे मत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2021 12:01 am

Web Title: rice mahadevappa profile abn 97
Next Stories
1 शशिकला
2 लॅरी मॅकमट्र्री
3 जय झरोटिया
Just Now!
X