जगातील आघाडीच्या मोटार उत्पादक व ग्राहक देशांमध्ये अलीकडे भारताचे नाव आग्रहाने आणि काही वेळेस अभिमानाने घेतले जाते. अशीच एक यादी आहे, ज्यात जगातील सर्वाधिक रस्ते अपघात बळींचा धांडोळा घेतला जातो. याही यादीत भारताचे नाव पहिल्या पाचात आहे, याचे मात्र विस्मरण होते. तसे ते होऊ नये आणि हा बट्टा पुसला जावा यासाठी तळमळीने झटणाऱ्यांमध्ये रस्ते वाहतूक तज्ज्ञ दिनेश मोहन यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. कोविड-१९ महासाथीने आपल्यातून हिरावून नेलेल्या हजारोंपैकी ते एक. काहीसा ऊग्र चेहरा आणि कठोर वैज्ञानिक दृष्टिकोनाशी आजीवन एकनिष्ठता या गुणांमुळे बहुधा त्यांनी मित्र फार जोडले नाहीत. तरीही दिल्लीतील, मुंबईतील विज्ञानवर्तुळात व जगभरातील वाहतूक तज्ज्ञांमध्ये त्यांचा दरारा होता. मेट्रो व उड्डाणपूल हे बदलत्या भारताचे दोन सर्वाधिक सुपरिचित गुणधर्म. त्यांची काहीही गरज नाही असे छातीठोक पण सप्रमाण दाखवून देणारे दिनेश मोहन म्हणूनच आगळेवेगळे ठरतात. मेट्रो किंवा लाइट-मेट्रोऐवजी सार्वजनिक वाहतुकीच्या बसगाडय़ा, सायकली, पादचारी यांच्यासाठी स्वतंत्र मार्गिकांचे ते खंदे पुरस्कर्ते होते. यातूनच दिल्लीत शीला दीक्षित मुख्यमंत्री असताना  बस मार्गिकांचा (बस रॅपिड ट्रान्झिट – बीआरटी) प्रयोग जन्माला आला. मुंबई आयआयटीतून यांत्रिक अभियांत्रिकीची पदवी घेऊन दिनेश मोहन पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेत मिशिगन विद्यापीठात गेले. तेथून पुढे वॉशिंग्टनमधील एका संस्थेत काम करताना ते जैव-वैद्यकीय अभियांत्रिकीकडे वळले. काही काळानंतर दिल्ली आयआयटीत येऊन अध्यापन करू लागले. वैज्ञानिक दृष्टिकोन या व याच संकल्पनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेणाऱ्या शास्त्रज्ञोत्तमांच्या मांदियाळीशी ते एकरूप झाले. पी. एन. हक्सर, राजा रामण्णा यांसारख्यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. पादचारी, दुचाकीस्वार अशांसाठी रस्ते अधिक सुरक्षित कसे होतील, दुचाकीस्वारांसाठी शिरस्त्राणे (हेल्मेट) कशा प्रकारच्या हव्यात, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोणते उपाय योजावे, अशा अनेक संशोधनप्रकल्पांसाठी दिनेश मोहन यांना निमंत्रित केले जाऊ लागले. स्पष्टवक्तेपणा आणि प्रसंगी पद वा पत यांचा मुलाहिजा न बाळगता समोरच्याला सुनावणे हे त्यांचे खासे गुण पंचक्रोशीत गाजू लागले. रस्ते वाहतुकीसंबंधी समित्यांच्या अध्यक्षांना ते सुनावत – ‘तुमची नियुक्ती मूठभर धनाढय़ांचे हित जपण्यासाठी नव्हे, तर शेतकरी, कामगार व पादचाऱ्यांचे जीवित जपण्यासाठी झाली आहे’! सीएनजीवर चालणारी सार्वजनिक वाहतूक वाहने बनवण्याचा खर्च व त्यांपायी मिळणारे लाभ यांचा मेळ जुळत नाही हेही त्यांनी दाखवून दिले होते. आज तरीही मेट्रो वा सीएनजीवर चालणारी वाहने उदंड दिसतात. पण त्यामुळे दिनेश मोहन व्यथित झाले नाहीत. रस्ते, वाहतूक आणि त्यावर चालणाऱ्यांचे-धावणाऱ्यांचे जीव यांविषयीचे त्यांचे कुतूहल, तसेच संशोधनाधारित मुद्दे मांडण्याचा त्यांचा आग्रहीपणा अखेपर्यंत कायम होता. त्यांचे निधन २१ मे रोजी झाले.